अतिशीला अटक : केजरीवालांची भीती

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

केंद्र सरकार कोणत्या ना कोणत्या खोट्या गुन्ह्यात अडकवून दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना अटक करण्याची शक्यता आहे, अशी भीती दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना वाटत आहे. मनीश सिसोदिया, संजय सिंग इत्यादी आम आदमी पक्षाच्या नेत्यांना अशा प्रकारे अटक करण्यात आली आहे. तसाच प्रकार आतिशी यांच्यासंदर्भात होण्याची शक्यता केजरीवाल यांनी बोलून दाखविली आहे. एका पत्रकार परिषदेत त्यांनी हे विचार व्यक्त केले.

दिल्लीच्या वाहतूक विभागामधील काही व्यवहारांच्या संदर्भात केंद्र सरकार आतिशी यांच्या विरोधात बनावट प्रकरण तयार करीत आहे, अशी माहिती आम्हाला मिळाली आहे. या माहितीच्या आधारावर या आम्हाला ही चिंता वाटते. केंद्र सरकार काहीही करु शकेल, असे प्रतिपादन केजरीवाल यांनी केले.

भारतीय जनता पक्षाची टीका

भारतीय जनता पक्षाने केजरीवाल यांच्या या भीतीची खिल्ली उडविली आहे. केजरीवाल यांच्या मनात अशी भीती का उत्पन्न व्हावी ? जर आतिशी यांनी काहीही केलेले नाही, तर केजरीवाल यांना भीती वाटण्याचे काही कारणच नाही. तसेच केंद्र सरकार काय करणार आहे, ही माहिती केजरीवाल यांना कशी मिळाली, असा प्रश्नही भारतीय जनता पक्षाने विचारला आहे. आधीच चिंता व्यक्त करुन केजरीवाल हे संशयात भरच घालत आहेत, अशीही टिप्पणी पक्षाने केली आहे.

Comments are closed.