रॉबिन उथप्पाविरुद्ध अटक वॉरंट जारी
कर्मचाऱ्यांचा पीएफ जमा न केल्याचा फटका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्याच्यावर ‘ईपीएफओ’मध्ये फसवणुकीचा आरोप आहे. उथप्पाने आपल्या मालकीच्या कंपनींतर्गत कर्मचाऱ्यांच्या पगारातून 23 लाख रुपये कापले. पण ही रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा केलेले नाहीत. याप्रकरणी त्याला नोटीस जारी करून संपूर्ण रक्कम भरण्यासाठी 27 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात वेळेवर पैसे जमा केले नाहीत तर त्याला तुरुंगात जावे लागू शकते. सध्या उथप्पा दुबईमध्ये असल्याचे समजते.
रॉबिन उथप्पा बेंगळूर येथे कपड्यांची कंपनी चालवतो. सेंच्युरी लाइफस्टाइल ब्रँड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत त्याची संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. पीएफ आयुक्तांच्या म्हणण्यानुसार, या कंपनीला आपल्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात 23 लाख 36 हजार 602 रुपये जमा करायचे होते. पण पैसे कापूनही कंपनीने सदर रक्कम ईपीएफओमध्ये भरलेली नाही.
Comments are closed.