दिल्लीत अटक, शस्त्रे आणि ड्रग्ज जप्त.
नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कठोर कृती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लवकरच 2026 या नव्या वर्षाचा प्रारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी समाजकंटकांवर केलेल्या धडक कारवाईत 450 हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून अनेक शस्त्रे आणि अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आहेत. नववर्षदिनी कोणताही अवांछित प्रकार देशाच्या राजधानीत घडू नये, यासाठी ही कार्यवाही करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.
या अभियानाला पोलिसांनी ‘आघात अभियान 3.0’ असे सांकेतिक नाव दिले आहे. या अभियानाचे नेतृत्व आग्नेय दिल्ली पोलीस दलाने केले. शनिवारी सकाळपासूनच या अभियानाला प्रारंभ करण्यात आला. एकाचवेळी पोलिसांच्या अनेक पथकांनी अनेक स्थानी धाडी घातल्या. यावेळी सर्व पोलीस पथकांमध्ये योग्य प्रकारे समन्वय राखला गेल्याने समाजविघातक व्यक्तींना सावरण्यास वेळ मिळाला नाही. बेसावध असतानाच अनेकांना पकडण्यात आले. गुन्हे करण्याची सवय जडलेल्या अनेकांना, तसेच अनेक सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले आहे.
लक्ष्य केंद्र क्रिया
पोलिसांनी यावेळी प्रथमपासूनच या कार्यवाहीसाठी सज्जता केली होती. कुठे आणि कोणावर धाड घालायची, याचा व्यवस्थित अभ्यास करण्यात आला होता. एका वृत्तानुसार पोलिसांनी शनिवारी संध्याकाळपर्यंत 500 हून अधिक जणांची धरपकड केली आहे. 116 परिचित गुंडांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
अनेक शस्त्रे जप्त
पोलिसांनी या कार्यवाहीच्या माध्यमातून अनेक शस्त्रे जप्त केली आहेत. त्यांच्यात 21 देशी बनावटीची पिस्तुले, बंदुका आणि सुऱ्या तसेच चाकू हस्तगत केले. नववर्षाच्या रात्री विक्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जमा केलेले अंमली पदार्थही यावेळी जप्त करण्यात आले. बेकायदेशीर दारूचे साठेही ताब्यात घेण्यात आले आहेत. अनेक समाजकंटकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. चोरट्यांनी चोरलेले 310 मोबाईल फोन्सही पोलिसांच्या हाती लागले आहेत. अनेक प्रक्षोभक कागदपत्रेही हस्तगत करण्यात आली आहेत, अशी चर्चा केली जात आहे
वाहने ताब्यात, चौकशीस प्रारंभ
शस्त्रे आणि अमली पदार्थांखेरीज इतरही वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी मध्यरात्रीच्या नंतरही कारवाई करण्यात आली असून 1 हजार 306 जणांना चौकशीसाठी पकडण्यात आले होते. त्यांच्यापैकी काही जणांची सुटका नंतर करण्यात आली होती. मात्र, अद्यापही 400 ते 500 समाजकंटक पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची सखोल चौकशी केल्यानंतरच पुढची कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या प्रवक्त्याने दिली आहे.
नववर्षदिनी गुन्ह्यांमध्ये वाढ
नववर्षाच्या प्रथम रात्री जेव्हा विविध कार्यक्रम साजरे केले जात असताना आणि युवकांच्या उत्साहाला उधाण आलेले असते. याच काळात दिल्ली आणि इतर महानगरांमध्येही गुन्ह्यांच्या संख्येत वाढ दिसून येते. गेल्या दोन दशकांमध्ये अशा गुन्ह्यांमध्ये उत्तरोत्तर वाढच होत आहे. विशेषत: महिलांची छेडछाड, विनयभंग किंवा महिलांविरोधात गंभीर गुन्हेही घडण्याचे प्रमाणात प्रत्येक वर्षी वाढत आहे. त्यामुळे यावर्षी नववर्षाच्या प्रारंभापूर्वीच ही कारवाई करण्यात आली आहे. तिचा परिणाम म्हणून नववर्षाचे आगमन साजरे करण्याच्या कालावधीत गुन्ह्यांचे प्रमाण मर्यादित राहील, अशी शक्यता व्यक्त होते. मात्र, पोलिसांनी सर्व शक्यता गृहित धरुन जोरदार सज्जता केली आहे, अशी माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली. ही कारवाई नववर्षआगमनाचा सोहळा पूर्ण होईपर्यंत चालविली जाणार आहे. नागरिकांनाही पोलिसांनी महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. नववर्षारंभाचा सोहळा मुक्तपणे साजरा करत असताना नियमांचे भान ठेवण्याचे आवाहन केले गेले आहे.
नववर्षांच्या प्रारंभी धडक कारवाई
ड दिल्लीत नववर्षाच्या प्रारंभी अनेक कुख्यात समाजकंटक ताब्यात
ड मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि अमली पदार्थ केले गेले हस्तगत
ड नववर्षारंभाचा सोहळा सुरळीतपणे साजरा करता येण्यासाठी कृती
ड नववर्ष साजरे करत असताना नियम पाळण्याचे अवाहन
Comments are closed.