क्रिकेटनामा – हर्षित-अर्शदीपची अप्रतिम!

>>संजय कऱ्हाडे

विजयाचा नाद मधुर असतो. तो मृदंगासारखा घुमतो अन् पाहणाऱ्याला डोलावतो! काल साऱयाच क्रिकेटप्रेमींना अभिषेकच्या दणदणीत खेळीने असंच डोलावलं! त्याचे चौकार मैदानावरच्या गवताचा भांग पाडून गेले अन् षटकार ढगांच्या काचा  फोडून आले! अठरा चेंडूंत पस्तीस धावांची त्याची धडाकेबाज खेळी संपली ती मार्करमने घेतलेल्या तेवढ्य़ाच चित्तथरारक झेलामुळे. बारा पंधरा यार्ड उलटं धावत जाऊन त्याने तो चेंडू तोल सांभाळत झेलला.

शुभमनची फलंदाजी चाचपडली अन् सूर्या दोन लागोपाठ चौकार मारून तिसरा मारण्याच्या धुंदीत बाद झाला. सूर्याने अधिक सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं आवश्यक आहे. त्याच्या जागी मुंबईचा दुसरा खेळाडू असता तर त्याने अधिक खडूस वृत्ती दाखवून नाबाद राहण्याचा प्रयत्न केला असता!

अर्थात, आपल्या कालच्या विजयाचं सार होतं ते मात्र अर्शदीप आणि हर्षितची धुवांधार गोलंदाजी. दोघांनी सातत्याने एकशे चाळीसपेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी केली. त्यांनी कमाल केली.

छान खेळपट्टी. किंचित हिरवी. धर्मशाला समुद्रसपाटीपासून उंचावर असल्याने हवामान हलपं! सूर्याने टॉस जिंकला. आफ्रिकेला प्रथम फलंदाजी दिली. जणू अर्शदीप आणि हर्षितच्या वेगवान वादळासमोरच फेकलं. हेंड्रिक्स, डीकॉक आणि ब्रेव्हिस केवळ सात धावांत कस्पटासमान सैरावैरा उडून गेले! त्यानंतर कप्तान मार्करम सोडला तर बाकीचे आफ्रिकन फलंदाज आले अन् गेले. आफ्रिकेच्या फलंदाजांनी जणू हिंदुस्थानी गोलंदाजांसमोर ‘ग्रोव्हेल’ केलं! पार शरणागतीच पत्करली.

कप्तान मार्व्रमने मात्र ताठ मानेने ड्राईव्हज् मारले, पुल खेचले. त्याने हर्षितला लगावलेला एक ऑफ ड्राईव्ह डोळ्यांना मुस्कुरावून गेला! सेहेचाळीस चेंडूंत विणलेली त्याची एकसष्ट धावांची खेळी बेधडक होती. बेदरकार होती. सहा सुंदर चौकार आणि दोन उत्तुंग षटकार!

सामन्यात हार्दिक पांडय़ाने त्याच्या टी ट्वेंटी कारकिर्दीत एक हजार धावा आणि शंभर बळींचा टप्पा पार केला. हार्दिकची कामगिरी सातत्याने उंचावतेय हे उल्लेखनीय आहे असं म्हणावंच लागेल. विश्वचषक स्पर्धेत तोच कळीचा मुद्दा ठरला तर आश्चर्य वाटायला नको. बर्थ-डे-बॉय कुलदीपने पहिल्याच षटकात दहा धावा दिल्या, पण डावाच्या शेवटच्या आणि त्याच्या दुसऱया षटकात त्याने फक्त दोन धावा देऊन नॉर्टजे आणि बार्टमनचे बळी घेऊन आपला वाढदिवस साजरा केला!

आता या टी ट्वेंटी मालिकेचा निकाल उद्याच लागणार की पाचव्या सामन्यापर्यंत वाट पाहावी लागणार तेच बघायचं!

Comments are closed.