सैफ अली खानला धमकी, वाँटेड आरोपीचे नाव समोर
मुंबई बॉलिवूड कलाकारांना धमक्या मिळण्याचा ट्रेंड थांबत नाही आहे. आता अभिनेता सैफ अली खानला धमकी मिळाल्याची बातमी समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी बाबा सिद्दीकी हत्याकांडातील वाँटेड आरोपी झिशान अख्तरचे नाव या धमकीमागे समोर आले आहे. मुंबई पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र ही धमकी प्रत्यक्षात जीशान अख्तरने दिली आहे की त्याच्या नावाचा वापर केला आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
ही बाब गांभीर्याने घेत पोलीस या धमकीची सत्यता आणि त्यासंबंधीचे डिजिटल पुरावे तपासत आहेत. सध्या या प्रकरणी सैफ अली खानकडून कोणतेही जाहीर वक्तव्य आलेले नाही.
याआधीही बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना धमकीचे मेसेज आणि ऑडिओ क्लिप आल्या आहेत. अलीकडेच अभिनेता तुषार कपूर आणि आयुष्मान खुराना यांना धमक्या मिळाल्याचे प्रकरणही खूप चर्चेत आले होते.
या प्रकरणांच्या तपासादरम्यान मुंबई पोलिसांनी ३० वर्षीय वैभव मिश्रा याला बेंगळुरू येथून अटक केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी कलाकारांना धमकावण्याचा आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचा दावा करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, प्राथमिक तपासात तो कोणत्याही टोळीशी संबंधित असल्याचे पुरावे मिळाले नाहीत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, वैभव मिश्रा आयटी इंजिनिअर आहे. धमकी देण्यासाठी त्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (एआय) मदतीने आवाज तयार केल्याचा पोलिसांना संशय आहे. ऑनलाइन सर्चद्वारे त्याने कलाकारांचे संपर्क क्रमांक गोळा केले आणि नंतर त्यांना धमकीचे संदेश पाठवले.
तुषार कपूरला पाठवलेल्या ऑडिओ मेसेजमध्ये ५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. मेसेज पाठवणाऱ्याने स्वत:चे वर्णन गुंड हॅरी बॉक्सर असे केले होते, परंतु पोलिसांनी आवाजाच्या नमुन्याची तपासणी केली असता त्याचा आवाज हॅरी बॉक्सरशी जुळला नाही.
Comments are closed.