पौलखुना – पल्लवांचे वैभव, कैलासनाथ मंदिर
>> आशुतोष बापट, [email protected]
पल्लव राजवंश आणि त्यांनी निर्माण केलेल्या स्थापत्याची ओळख करून घेण्यासाठी आपल्याला पल्लवांच्या राजधानीचे शहर असलेल्या कांचीपुरमला जावे लागेल. कांचीपुरम हे भारतातील 7 पवित्र स्थानांपैकी एक स्थान आहे. कांचीपुरम इथे आपल्याला पल्लवांचे बांधीव स्थापत्य बघायला मिळते. त्यातही पल्लवांचे स्थापत्य वैभव बघायचे असेल तर कांचीपुरमचे कैलासनाथ मंदिर हे त्याचे ठसठशीत उदाहरण आहे.
कैलासनाथ मंदिर हे पल्लवांच्या मंदिर स्थापत्यातले सर्वात प्राचीन मंदिर समजले जाते. पल्लव स्थापत्याचे भूषण समजले जाणारे कैलासनाथ मंदिर हे कांचीपुरम मधल्या शिवकांची या भागात वसलेले आहे. द्राविड मंदिर स्थापत्याचा एक अजोड नमुना. या मंदिराच्या बांधणीवरून प्रेरणा घेऊन अशीच दोन भव्य मंदिरे पुढे भविष्यात निर्मिली गेली. त्यातले एक म्हणजे कर्नाटकातील पट्टदकल इथले विरुपाक्ष मंदिर, तर दुसरे एकमेवाद्वितीय असे आपल्या महाराष्ट्रात वेरूळ इथले एकाच पाषाणातून खोदून काढलेले कैलास लेणे. पल्लवांच्या स्थापत्यात या कैलासनाथ मंदिराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कांचीपुरम इथले हे कैलासनाथ मंदिर हे शिवालय आणि दुसरे वैकुंठ पेरुमल हे असेच देखणे विष्णुमंदिर. ही दोन्ही मंदिरे कांचीपुरमचे वैभव आहेत. कांचीपुरम इथली मंदिरे पल्लव राजांचे कर्तृत्व आणि सामर्थ्य यांची जणू साक्ष देत तसेच आपल्याला आजही त्या राजवटींचे ऐश्वर्य दाखवत उभी आहेत. त्यातही कैलासनाथ मंदिर हे पल्लव स्थापत्य कलेचा एक मानबिंदू समजले जाते.
पल्लवांचा सामर्थ्यशाली राजा नरसिंहवर्मन दुसरा (राजसिंह पल्लवेश्वरम) याच्या काळात इ.स. 680 ते 705 या कालखंडात कैलासनाथ मंदिराची निर्मिती झाली. देवाधिदेव महादेवाचे निवास असलेले हे शिवालय शिवाच्या असंख्य मूर्तींनी आणि त्याच्या पुराणातील विविध कथांनी शिल्पांकित केलेले आहे. तसेच या मंदिरावर असलेल्या सोमास्कंदाच्या अनेक प्रतिमा आपले लक्ष वेधून घेतात. पूर्वाभिमुख असलेले हे मंदिर वसले आहे वेगवती नदीच्या काठावर. कांचीपुरम ही पल्लवांची राजधानी होती. त्यामुळे आपल्या राजधानीच्या ठिकाणी इतक्या देखण्या मंदिरांची निर्मिती नसती तरच नवल. आधीच्या काळात मंदिरांचे बांधकाम हे एकतर लाकडात होत असे अन्यथा दगडात खोदून लेण्यांच्या स्वरूपात केले जात असे. कैलासनाथ मंदिर हे त्यामुळे दक्षिण भारतातले दगडात बांधलेले आद्य मंदिर समजले जाते. त्यानंतर दक्षिण भारतात अशी मंदिरे बांधण्याचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर वाढल्याचे दिसून येते.
कैलासनाथ मंदिर हे मंदिर स्थापत्याच्या दृष्टीने सर्व बाबतीत परिपूर्ण आहे. गर्भगृह, अंतराळ, मंडप, अर्धमंडप, प्राकार भिंत, प्रवेशद्वार आणि गोपुर असे मंदिराचे सगळे घटक इथे बघायला मिळतात. मंडपाच्या खांबांमध्ये पौराणिक सिंहाची शिल्पे वारंवार आलेली दिसतात. मंदिराचे मुख्य शिखर चौकोनी स्वरूपाचे खास द्राविड पद्धतीचे आहे. ते वरच्या बाजूला जाताना निमुळते होत जाते. सर्वात शेवटी गोल आकाराची स्तूपी आहे. शिखराच्या बाह्यभागावर लहान लहान देवकोष्ठे केलेली आहेत. तसेच द्राविड शैलीतील घटक असलेले शाला, कूट आणि पंजर हे घटक इथे अगदी ठसठशीतपणे केलेले दिसून येतात. मंदिराच्या गाभाऱयात ग्रॅनाईटमध्ये घडवलेले आणि सोळा बाजू असलेले शिवलिंग आहे. तसेच इथल्या भिंतीवर एक मुख्यपीठ असून त्यावर नंदीसहित काही देवतांच्या मूर्ती आहेत.
कैलासनाथ मंदिराला चारही बाजूनी प्राकार भिंत असून त्या भिंतीच्या आतल्या बाजूला देवकोष्ठे केलेली आहेत. यातल्या अनेक देवकोष्ठांमध्ये सोमास्कंद म्हणजे शिव-पार्वती आणि स्कंद म्हणजे कार्तिकेयाच्या मूर्ती आहेत.
मूर्तिशास्त्राचा दैनंदिन जीवनात उपयोग करून घेणे यावरून त्या काळात स्वत राजा तसेच स्थपती, मूर्तिकार यांचा या शास्त्राचा किती सखोल अभ्यास होता हे दिसून येते. प्राकार भिंतीला आतल्या बाजूने ही एकूण 58 देवकोष्ठे असून ती एक सलग मंदिराच्या तीनही बाजूंनी व्यापलेली आहेत. ही देवकोष्ठे पूर्वी रंगवलेली होती. आजही याच्या आतून किंवा दोन देवकोष्ठांच्या मध्ये असलेल्या भागात चित्रकारी केलेली दिसते. हजारो वर्षांपूर्वीची ही चित्रकारी आणि रंगकाम आपल्याला थक्क करते. मुख्य मंदिर आणि ही देवकोष्ठे यांच्यामध्ये आपोआपच एक मार्गिका तयार झालेली आहे. त्यावरून मंदिराला प्रदक्षिणा घालताना मंदिरावर केलेले सुबक शिल्पकाम मनसोक्त न्याहाळता येते.
दक्षिण भिंतीवर असलेली शिवाची ‘दक्षिणामूर्ती’ अतिशय देखणी आहे. ज्ञान देणारी आणि अतिशय शांत अशी शिवाची मुद्रा यामुळे ही मूर्ती खूप प्रेक्षणीय झालेली आहे. याव्यतिरिक्त मंदिरावर ज्येष्ठा किंवा अलक्ष्मीची दुर्मिळ अशी मूर्ती आहे. त्याच सोबत अकरा रुद्रांच्या मूर्ती इथे आहेत. दक्षिण भारतात आणि त्यातही पल्लवांच्या या मंदिरात अगदी दुर्मिळ आणि वेगळ्या मूर्तींचे शिल्पांकन केलेले आहे. तसेच मूर्ती कोरताना त्यात त्या व्यक्तिमत्त्वाचे बारकावे कोरलेले दिसतात. भिक्षाटन शिवाची मूर्ती कोरताना त्याचे केस तसेच त्याने काठीला बांधून पाठीवर घेतलेली पोतडी यांचे शिल्पांकन अगदी बारीकसारीक तपशिलासह कोरलेले आहे. हे मंदिर जरी शैव धर्माशी संबंधित असले तरीही वैष्णव, शक्ती आणि वैदिक देवतांच्या अनेक मूर्ती आपल्याला या मंदिरावर कोरलेल्या दिसून येतील. गर्भगृह, अंतराळ, महामंडप, मोठे आवार आणि गोपुर अशी या मंदिराची एकूण रचना आहे. मंदिरावर काही शिलालेख असून त्यात शैव संतांची नावे आढळतात.
शांत रमणीय वातावरण आणि त्यासमोर उभे असलेले हे द्राविड शैलीतील प्राचीन शिवालय बघितल्यानंतर एक समाधानाची अनुभूती नक्कीच लाभते. इथे लोकांची गर्दी, गोंगाट, कलकलाट असे काहीही नसून शांत निवांतपणे आपल्याला देवाच्या विविध रूपांचे मनसोक्त दर्शन घेता येते. कितीही वेळा निरखले तरीही कायम काहीतरी अपूर्ण राहिल्याची भावना इथे कायमच होत असते. पल्लव स्थापत्याचा मेरुमणी असलेले हे मंदिर निवांत वेळ काढून बघितले पाहिजे.
Comments are closed.