पंचलाइन – समकालीन अस्वस्थता

>> अक्षय शेलार, [email protected]

डिजिटल युगात वाढलेल्या एका संवेदनशील मनाची उक्रांती दर्शवणारा बो बर्नहॅमचा विनोद एका पिढीचा मानसिक नकाशा समोर मांडतो.

बोबर्नहॅमच्या कामाबद्दल लिहिताना एक गोष्ट सतत जाणवत राहते ती म्हणजे तो कधीच केवळ स्टँड-अप कॉमेडियन नव्हता. तो सुरुवातीपासूनच एक मल्टिमीडिया परफॉर्मर, गीतकार, लेखक, दिग्दर्शक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या पिढीच्या अस्वस्थतेचा दस्तऐवजकार होता. त्याच्या कारकीर्दीकडे एकत्रितपणे पाहिलं, तर ती डिजिटल युगात वाढलेल्या एका संवेदनशील मनाची उक्रांती दाखवते.

पौगंडावस्थेत असताना यूटय़ूबवर अपलोड केलेल्या विनोदी गाण्यांपासून बर्नहॅमची सुरुवात झाली. त्या सुरुवातीच्या व्हिडीओंमध्ये शब्दकळेची चपळता, विडंबनाची तीक्ष्णता आणि किशोरवयीन उर्मटपणा स्पष्ट दिसत होता, पण त्यातच एक आत्मजाणीवही होती. तो केवळ मजेशीर गाणी लिहीत नव्हता, तर तो त्या गाण्यांच्या माध्यमातून इंटरनेट संस्कृती, लोकप्रियता आणि परफॉर्मन्सच्या कृत्रिमतेवर भाष्य करत होता. लवकरच त्यातून त्याचं स्टेजवरचं व्यक्तिमत्त्व विकसित झालं. ‘वर्ड्स, वर्ड्स, वर्ड्स’, ‘व्हॉट’ आणि ‘मेक हॅपी’पर्यंत त्याने स्टँड-अपला एक दृश्यात्मक, संगीतमय व वैचारिक स्वरूप मिळवून दिलं.

बर्नहॅमच्या स्टँड-अपची सर्वात महत्त्वाची खूण म्हणजे त्याची रचना. तो नुसते विनोद सांगत नाही, तर एक तपशीलवार कार्यक्रम उभा करतो. प्रकाशयोजना, ध्वनी, प्रोजेक्शन आणि अचूक लय यांचा वापर करून तो स्टेजला जणू प्रयोगशाळा बनवतो. त्याच्या प्रत्येक स्पेशलमध्ये एक मेटा स्तर असतो. त्यात तो परफॉर्म करत असतानाच परफॉर्मन्स या संकल्पनेवर प्रश्न उपस्थित करतो. प्रेक्षक हसत असताना तो त्यांना ते एका कृत्रिम क्षणाचा भाग असल्याची जाणीव करून देतो. या आत्मपरीक्षणामुळे त्याची कॉमेडी अनेकदा अस्वस्थ करते. कारण ती मनोरंजनाच्या चौकटीला उघड करते.

‘मेक हॅपी’मध्ये हा ताण अधिक स्पष्ट झाला. प्रसिद्धी, प्रेक्षकांची अपेक्षा आणि स्वतच्या मानसिक आरोग्याशी चाललेला संघर्ष यांचा त्याने तिथे उघडपणे उल्लेख केला. स्पेशलच्या शेवटी आलेला त्याचा दीर्घ, जवळ जवळ कबुलीजबाबासारखा मोनोलॉग कलाकार आणि प्रेक्षक यांच्यातील नात्यावर भाष्य करणारा होता. त्याच्या साऱया कामात पुष्कळ विडंबनं आणि सांगीतिक विनोद असल्यानं प्रथमदर्शनी त्यातलं गांभीर्य जाणवतही नाही.

यानंतर आलेल्या ‘इनसाइड’ या कोविडदरम्यानच्या स्पेशलमधून मिलेनियल आणि जनरेशन झेडच्या सामूहिक मानसिक अवस्थेचं चित्र सादर होतं. एका खोलीत एकटय़ानं तयार केलेल्या त्या प्रकल्पात बर्नहॅमने कॅमेरा, प्रकाश, एडिटिंग आणि संगीत यांचा वापर करून स्वतचं विखुरलेलं मन मांडलं. विनोद, उदासी, आत्मवंचना आणि डिजिटल अतिरेक या सगळ्यांचं मिश्रण तिथे दिसतं. ‘इनसाइड’मध्ये तो इंटरनेट संस्कृतीची खिल्ली उडवतो, पण त्याच वेळी त्याच्या मोहात अडकलेलाही दिसतो. ही द्वंद्वात्मकता त्याच्या संपूर्ण कामाचं वैशिष्टय़ आहे.

बर्नहॅमचं वैशिष्टय़ म्हणजे तो स्वतवरही तितक्याच कठोरतेने हसतो. त्याला त्याच्या प्रिव्हिलेजची जाणीव आहे. त्यामुळे तो स्वतच्या ढोंगीपणावर प्रकाश टाकतो आणि सामाजिक भाष्य करताना स्वतलाही त्या चौकटीत सामील करतो. त्यामुळे त्याची टीका उपदेशात्मक वाटत नाही, उलट ती आत्मचिंतनात्मक वाटते. त्याच्या गाण्यांमध्ये शब्दांचा खेळ असतो, पण त्या खेळामागे तत्त्वज्ञानाची छटा असते. ‘आर्ट इज अ लाय’ किंवा ‘कॅन एनीवन शट द फक अप अबाऊट एव्हरीथिंग?’ यासारखी वाक्यं केवळ विनोदी ओळी नसून ती आधुनिक जगातील माहितीच्या अतिरेकावरची प्रतिक्रिया ठरतात.

स्टँड-अपच्या पलीकडे ‘एट्थ ग्रेड’सारख्या चित्रपटातून बर्नहॅमने दिग्दर्शक म्हणूनही स्वतची ओळख निर्माण केली. त्या चित्रपटातही डिजिटल जगातील किशोरवयीन असुरक्षितता आणि आत्मप्रतिमेचा प्रश्न मध्यवर्ती होता. म्हणजेच माध्यम बदललं तरी त्याची चिंता बदलली नाही. परफॉर्मन्स, ओळख (आयडेंटिटी) आणि प्रेक्षकांच्या नजरेत स्वतला सिद्ध करण्याची धडपड हा त्याच्या कामात सातत्यपूर्ण आढळणारा धागा आहे.

बो बर्नहॅमच्या एकूण कामाकडे पाहिलं, तर ते एका कलाकाराच्या प्रसिद्धीच्या प्रवासापेक्षा एका पिढीच्या मानसिक नकाशासारखं वाटतं. त्याच्या विनोदात गोंधळ आहे, आत्मसंशय आहे आणि एक प्रकारचा थकवा आहे, पण त्याच वेळी त्यात प्रामाणिकपणा आहे. तो प्रेक्षकांना हसवतो, पण त्यात नेहमीच एक पोकळी असते. जणू आपण सगळे एका मोठय़ा डिजिटल रंगमंचावर वावरत आहोत आणि त्याची जाणीव आपल्याला सतत टोचत असावी, अशी ही पोकळी.

बर्नहॅमचा वारसा केवळ काही स्पेशल्स किंवा गाण्यांपुरता मर्यादित नाही. त्याने स्टँड-अपला एक वैचारिक, तांत्रिक आणि भावनिक उंची दिली. स्टँड-अप कॉमेडी ही केवळ हसवण्याची कला नसून ती आत्मपरीक्षणाची, तांत्रिक प्रयोगांची आणि सांस्कृतिक विश्लेषणाचीही जागा असू शकते, हे त्याच्या कामाने दाखवून दिलं. आधुनिक स्टँड-अपच्या इतिहासात बो बर्नहॅम हा एक असा कलाकार आहे, ज्याने रंगमंचावर उभं राहून त्या रंगमंचाचंच स्वरूप बदलून टाकलं.

(लेखक चित्रपट समीक्षक आहेत.)

Comments are closed.