पंचलाइन – भावनिक खोलीचा ध्यास
>> अक्षय शेलार, [email protected]
डॅनियल स्लॉस… चिंतनशील, कथनात्मक विचार करणारा कॉमेडियन ज्याने एक वेगळा प्रवाह तयार केला. त्याच्या स्टँड-अपमध्ये एक नेमकी, तीक्ष्ण आणि अनेकदा अस्वस्थ करणारी विनोदी टिपणी असते.
डॅनिअल स्लॉस हा समकालीन स्टँड-अप कॉमेडीमधील सर्वात वेगळा, धाडसी आणि अस्वस्थ करणारा ताजा आवाज आहे. स्कॉटलंडमध्ये वाढलेला हा तरुण कॉमेडियन दीर्घ, अचूकपणे रचलेल्या कथांमधून विनोद तयार करतो. त्याच्या स्टँड-अपमध्ये विनोदनिर्मिती ही एक तपशीलवार प्रक्रिया असते. प्रश्न विचारणारी, मन ढवळून काढणारी आणि प्रेक्षकांना अंतर्मुख करणारी प्रक्रिया.
‘जिगसॉ’ आणि ‘एक्स’ या त्याच्या स्पेशल्समुळे स्लॉसची ही ठळक ओळख निर्माण झाली. ‘जिगसॉ’मध्ये स्लॉसने नात्यांतील आत्मवंचनेचे, भावनिक परिपक्वतेचे आणि प्रेमाच्या नावाखाली आपण स्वतलाच फसवण्याचे सत्य इतक्या नेमकेपणाने उलगडले की, अनेकांना आपल्या आयुष्यातील नाती पुन्हा तपासावी लागली. स्लॉसच्या कॉमेडीने इथे एक विलक्षण प्रकारची भावनिक खोली प्राप्त केली.
त्याच्या शब्दरचनेत साधेपणा आहे, पण त्या साधेपणामागे अवघड विषयांना सोप्या भाषेत उलगडण्याची क्षमता दडलेली असते. स्लॉसची पंचलाइन एखाद्या अस्तित्ववादी निरीक्षणाच्या रूपात येते. तो क्लासिक सेटअप-पंचलाइन धोरण वापरतो, पण ते इतके ताणून, इतके हळुवार गतीने मांडतो की, पंचलाइन येईपर्यंत प्रेक्षक स्वतच त्या कथेत खोलवर अडकत जातात आणि मग अचानक जिथे एखादे गंभीर वाक्य अपेक्षित असतं, तिथे एक नेमकी, तीक्ष्ण आणि अनेकदा अस्वस्थ करणारी विनोदी टिपणी येते.
स्लॉसच्या कॉमेडीत त्याच्या वैयक्तिक जीवनाची छाप खोलवर दिसते. बहिणीच्या आजारपणापासून बालपणातील वेदनांपर्यंत स्वततील तुटलेपणा तो प्रामाणिकपणे मांडतो. विनोदाच्या आड तो या वेदना लपवत नाही, उलट त्या अधिक जिवंत करतो. त्यामुळे स्टेजवरील त्याचे व्यक्तिमत्त्व अतिशय मानवी वाटते. तो खरे बोलणाऱया एखाद्या जवळच्या मित्रासारखा वाटू लागतो.
आजच्या डिजिटल युगात जिथे 15 सेकंदांच्या रीलला मागणी आहे, तिथे स्लॉससारखा चिंतनशील, कथनात्मक विचार करणारा कॉमेडियन एक वेगळा प्रवाह तयार करतो. त्याचे सेट्स अधिक नाटय़मय, अधिक भावनिक आणि स्वाभाविकरीत्या अनेकदा अधिक जड असतात. मात्र त्यातूनच त्याची स्वतंत्र ओळख निर्माण होते. तो प्रेक्षकांचे मनोरंजन करतो, पण त्याहून अधिक महत्त्वाचं म्हणजे तो त्यांना बदलतो.
स्लॉसच्या कॉमेडीचा सर्वात मोठा प्रभाव त्याच्या शांततेत आहे. तो एखादी कथा उलगडून सांगताना मध्येच एक विराम घेतो. या लांब, जाणीवपूर्वक, जवळपास अस्वस्थ करणाऱया विरामात प्रेक्षक दोन भूमिकांमध्ये अडकून पडतात. एकीकडे आपण विनोद पाहत आहोत हे माहीत असते, पण दुसरीकडे त्याने उघड केलेले सत्य इतके वैयक्तिक वाटते की, आपण आता प्रेक्षक नसून त्या कथेतले पात्र झाल्याचा भास होतो. स्लॉस ही जागा किती सावधपणे, किती नेमकेपणाने रचतो, हे त्याच्या कौशल्याचे द्योतक आहे.
त्याच्या स्टँड-अपमध्ये एक प्रकारचे भावनिक स्थापत्य दिसते. प्रत्येक बिट हे एखाद्या इमारतीतल्या मजल्यासारखे भासते. त्यातल्या भावनिक सुराचा हळूहळू चढत जाणारा आलेख, त्यासोबत वाढत जाणारी खोली आणि शेवटाकडे पंचलाइनमध्ये अचानक आलेला धक्का हा अनुभव थोडा सुंदर व नेहमीच अविस्मरणीय वाटतो. निर्माण होणाऱया शांततेतून प्रत्येक जण आपल्या आयुष्याच्या तुकडय़ांकडे पुन्हा पाहू लागतो.
स्लॉसने बो बर्न्हमसारख्या त्याच्या समकालीन कॉमेडियनप्रमाणेच दाखवून दिले की, विनोद फक्त मनोरंजन नसून ती एक गंभीर कला आहे. ही कला नात्यांची, संस्कृतीची आणि माणसांच्या कमकुवतपणाची उकल करू शकते. हा विचार नवीन नाही, परंतु स्लॉससारख्या तरुण कॉमेडियनकडून तो इतक्या प्रामाणिकपणे ऐकणे हे आजच्या प्रेक्षकांसाठी ताजा आणि प्रभावी अनुभव ठरतो.
स्लॉसची ताकद यातच आहे की, त्याची कॉमेडी आपल्या आयुष्यातील अस्वस्थ जागा उघड करते. जे लोक हे स्वीकारायला तयार नसतात, त्यांच्यासाठी त्याचा विनोद अतिप्रखर, तीक्ष्ण वाटू शकतो. परंतु जे प्रेक्षक या अस्वस्थतेला सामोरं जातात त्यांच्यासाठी स्लॉस एक वेगळाच अनुभव बनतो. त्याचे सेट्स एखाद्या थेरपी सत्रासारखे नसतात, पण ते तिथे जाणारी दिशा जरूर दाखवतात. हास्य आणि कटू सत्य एकत्र कसे अस्तित्वात असू शकतात हे तो सतत दाखवत राहतो.
Comments are closed.