पंचलाइन – दररोज कॉमिक
>> अक्षय शेलार, [email protected]
रोजच्या आयुष्यातील लहानसहान विसंगतींमधून सहज आणि `रिलेटेबल’ वाटणारा राहुल सुब्रमणियनचा विनोद एक प्रकारची अंडरस्टेटमेंट करणारा. म्हणूनच तो `एव्हरी डे कॉमिक’सारखा जाणवतो.
राहुल सुब्रमणियन हा समकालीन भारतीय स्टँडअपमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा आवाज आहे. तो मोठय़ा राजकीय विधानांपेक्षा किंवा धक्कादायक विषयांपेक्षा रोजच्या आयुष्यातल्या लहानसहान विसंगतींमधून विनोद निर्माण करतो. त्याचा विनोद बाह्यदृष्टय़ा हलकाफुलका, सहज आणि `रिलेटेबल’ वाटतो, पण त्यामागे एक अचूक टायमिंग, भाषेवरची पकड आणि परिस्थितीला विनोदात रूपांतरित करण्याची विलक्षण क्षमता दडलेली असते.
राहुलच्या स्टँडअपमधील सर्वात ठळक वैशिष्टय़ म्हणजे त्याचा संवादात्मक टोन. त्याच्या कामात तो स्टेजवर उभा राहून `परफॉर्म’ करत असल्याचा भास कमी असतो. त्याऐवजी एखाद्या मित्राशी गप्पा मारत असल्याची भावना निर्माण करतो. या सहजतेमुळे प्रेक्षक लगेच त्याच्याशी जोडले जातात. तो आपल्या आयुष्यातील किरकोळ प्रसंग, जसे की, ऑफिसमधील अनुभव, प्रवासातील त्रास, सोशल मीडियावरच्या सवयी इ. इतक्या नैसर्गिकपणे मांडतो की, ते अनुभव सार्वत्रिक वाटू लागतात. `कल मै उडेगा’ (2018) आणि `हू आर यू’ (2026) या दोन्ही स्पेशल्समधून ही सारी वैशिष्टय़े समोर येतात.
त्याच्या विनोदात मोठे ट्विस्ट किंवा धक्कादायक पंचलाइन नसतात. उलट तो परिस्थिती हळूहळू उलगडत नेतो आणि एखाद्या साध्या निरीक्षणातून हास्य निर्मिती करतो. ही शैली क्लासिक निरीक्षणपर विनोदाच्या परंपरेशी जोडलेली आहे, पण राहुल त्यात स्वतचा खास भारतीय, शहरी, मिलेनियल संदर्भ मिसळतो. त्याचे विनोद अनेकदा `ओळखीचे’ वाटतात, पण त्यातली अचूकता त्यांना वेगळं बनवते.
राहुलच्या परफॉर्मन्समध्ये टायमिंग हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. तो विरामांचा वापर अतिशय नेमकेपणाने करतो. एखादी ओळ सांगून थांबणं, प्रेक्षकांच्या प्रतिािढयेची वाट पाहणं आणि मग पुढची ओळ टाकणं या प्रािढयेत तो एक लय तयार करतो. ही लयच त्याच्या विनोदाला धार देते. जाणीवपूर्वक साधी शैली नाटय़मयतेपेक्षा शब्दांवर आणि परिस्थितीवर अधिक लक्ष केंद्रित करते.
सोशल मीडियाच्या युगात राहुलने स्वतची ओळख वेगळ्या पद्धतीने निर्माण केली. कुमार वरुणसोबतच्या `रँडम चिकीबम’च्या स्केचेसमधून त्याने डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्किट कॉमेडी हा प्रकार रुळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या स्केचेसमध्ये अब्सर्ड, पुनरावृती आणि डेडपॅन डिलिव्हरी यांचा वापर करून ते विनोद निर्मिती करत असत. स्टँडअपमधील त्याची निरीक्षणप्रधान शैली आणि स्केचेसमधील त्याची प्रयोगशीलता यांच्यात एक उपजत मनोरंजकता दिसतो.
राहुलच्या कॉमेडीत एक प्रकारची अंडरस्टेटमेंट आहे. तो स्वतच्या गोंधळावर, आळशीपणावर किंवा सामाजिक ऑकवर्डनेसवर विनोद करतो. या आत्मविनोदामुळे त्याची कॉमेडी अधिक मानवी, सहज नातं सांगता येण्याजोगी वाटते. मात्र, त्याच्या या सहजतेमुळे काही वेळा त्याच्या विनोदात जोखीम कमी असल्याचे वाटू शकते. तो फार क्वचितच तीव्र राजकीय किंवा सामाजिक मुद्दय़ांवर थेट भाष्य करतो. त्यामुळे त्याची कॉमेडी सुरक्षित आणि हस्तिदंती मनोऱयातील वाटण्याची शक्यता असते, पण ही त्याची जाणीवपूर्वक निवड आहे. तो मोठय़ा विधानांपेक्षा सूक्ष्म निरीक्षणांमध्ये रस घेतो आणि त्या निरीक्षणांमधूनच एक रंजक विनोदी अनुभव निर्माण करतो.
समकालीन भारतीय स्टँडअपच्या संदर्भात राहुल सुब्रमणियन हा एक महत्त्वाचा `एव्हरी डे कॉमिक’ आहे. त्याची कॉमेडी सातत्याने, शांतपणे आणि अचूकपणे हसवत राहते. राहुल सुब्रमणियनचा विनोद हा मोठय़ा, चमकदार विधानांचा नसून छोटय़ा, मार्मिक क्षणांचा आहे आणि कदाचित म्हणूनच तो सहजपणे भावतो आणि लक्षात राहतो.
(लेखक चित्रपट समीक्षक आहेत.)
Comments are closed.