न्यू हॉलीवूड – भय आणि श्रद्धा यांचा संगम

>> अक्षय शेलार, [email protected]

70 च्या दशकातील अमेरिकेतील सामाजिक, सांस्कृतिक परिस्थितीचे चपखल चित्र दर्शवणारा ‘दी एक्सॉर्सिस्ट’ हा चित्रपट भयपटाच्या इतिहासातही तितकाच मोलाचा ठरला.

विल्यम फ्रिडकिन दिग्दर्शित ‘दी एक्सॉर्सिस्ट’ हा न्यू हॉलीवूड काळातील असा सिनेमा आहे, ज्याने भयपटाची व्याख्या बदलून टाकली. 1970 च्या दशकात सामाजिक, राजकीय अस्थिरता होती आणि व्हिएतनाम युद्ध, वॉटरगेट स्कँडल, सांस्कृतिक बदल यामुळे अमेरिकन प्रेक्षकांमध्ये एक अस्वस्थता निर्माण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर ‘दी एक्सॉर्सिस्ट’ने धर्म, विश्वास, विज्ञान आणि दुष्टशक्ती यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. हा सिनेमा 70 च्या दशकातील सामाजिक, सांस्कृतिक परिस्थितीचे चपखल चित्र आहे.

चित्रपटाची कथा साधी वाटली तरी त्याचे परिणाम खोलवरील दिसतात आहेत. रेगन नावाची 12 वर्षांची मुलगी अचानक विचित्र वर्तन करू लागते, तिच्या आईकडून आधुनिक वैद्यकीय उपचारांचा प्रयत्न होतो, पण काहीच निष्पन्न होत नाही. शेवटी चर्चचा आधार घेतला जातो आणि दोन पाद्रींवर तिच्या अंगातील दुष्टशक्तीशी सामना करण्याची जबाबदारी येते. वरकरणी ही एक्झॉर्सिझमची पारंपरिक कहाणी असली तरी तिच्या मांडणीत फ्रिडकिनने जो वास्तववाद आणला, ते भयपटाच्या इतिहासात मोलाचे आहे.
फ्रिडकिन आणि लेखक विल्यम पीटर ब्लॅटी यांनी हा सिनेमा फक्त अंधश्रद्धा किंवा गॉथिक भयावर आधारलेला ठेवला नाही, तर त्यांनी धर्मशास्त्र, मानसशास्त्र आणि शरीरशास्त्र यांचा संगम घडवून प्रेक्षकांना अस्वस्थ केले. हॉलीवूडमध्ये भयपट सहसा दुय्यम प्रकार मानला जात असे, पण ‘दी एक्सॉर्सिस्ट’ने हा प्रकार मुख्य प्रवाहात आणला. एखाद्या भयपटाने बेस्ट पिक्चरसह दहा ऑस्कर नामांकने मिळवली, असे पहिल्यांदाच घडले.

फ्रिडकिनचा दृष्टिकोन पूर्णपणे डॉक्युमेंटरी शैलीकडे झुकलेला होता. वैद्यकीय तपासणीचे प्रसंग, त्यात रेगनच्या शरीरावर होणाऱया चाचण्या, सुई टोचण्याचे क्लोज-अप यामुळे भय ‘परलौकिक’ वाटण्याऐवजी ‘खऱया’ जीवनात शिरते. त्याच वेळी रेगनच्या अंगातून येणारा वेगळा आवाज, पलंग हवेत तरंगणे, थंड हवेत धुराचे ढग ही सगळी दृश्ये सिनेमाच्या भयपट-परंपरेतील आयकॉनिक प्रतिमा बनली. मात्र ‘दी एक्सॉर्सिस्ट’ इतका प्रभावी ठरला यामागे केवळ तांत्रिक कौशल्य नाही, तर सांस्कृतिक प्रश्नही होते.
या सिनेमावर प्रेक्षकांची प्रतिक्रिया अत्यंत तीव्र होती. काही जण थिएटरमध्ये बेशुद्ध पडले, काहींना उलटय़ा झाल्या, अनेक चर्च व त्यासंबंधित संस्थांनी हा चित्रपट दाखवणं बंद करण्याची मागणी केली. पण याच विवादामुळे ‘दी एक्सॉर्सिस्ट’ अधिक लोकप्रिय ठरला. हा सिनेमा अमेरिकन संस्कृतीतील ‘दुष्टता’ या संकल्पनेवर नवा विचार करायला भाग पाडतो- दुष्टता बाहेरून येते की आपल्या आतच दडलेली असते? त्यामुळेच तर हा चित्रपट आजही प्रभावी ठरतो. कारण तो मानवी भयाचा, श्रद्धेच्या ढासळण्याचा आणि असहायतेचा शोध घेतो. या साऱयातून हा केवळ भूतबाधा दाखवणारा चित्रपट न राहता तो आधुनिक समाजाने आपला आत्मा गमावल्याची भीती दृश्य रूपात सूचकरीत्या दाखवतो.

न्यू हॉलीवूड चळवळ प्रामुख्याने वास्तववाद, सामाजिक राजकारण आणि पात्रांच्या गुंतागुंतीवर आधारित होती. ‘दी एक्सॉर्सिस्ट’ने भयपट या प्रकाराला त्यात सामील करून घेतले. एका अर्थाने हा सिनेमा न्यू हॉलीवूडचा धाडसी प्रयोग होता. कारण त्याने भयपटाला बौद्धिक चर्चेचा विषय बनवले. पुढच्या काळात ‘हॅलोवीन’ (1978), ‘द शायनिंग’ (1980) यांसारख्या चित्रपटांना सिनेमाच्या इतिहासात जे स्थान मिळाले, त्याची पायाभरणी ‘दी एक्सॉर्सिस्ट’ने केली. ‘दी एक्सॉर्सिस्ट’चा प्रभाव केवळ सिनेमापुरता मर्यादित राहिला नाही. पुढच्या दशकात भयपटाचे स्वरूपच बदलले. या सिनेमामुळे पहिल्यांदा हॉरर सिनेमा गंभीर प्रेक्षक व समीक्षकांकडूनही मान्यता मिळवू शकतो, हे सिद्ध झाले. ‘हॅलोवीन’, ‘द शायनिंग’, ‘पोल्टरगाईस्ट’ (1982) यांसारख्या सिनेमांनी या पायवाटेवर चालत वेगळे प्रयोग केले.

याखेरीज या सिनेमाचा परिणाम सांस्कृतिक पातळीवर आणखी खोलवर गेला. 70 च्या दशकात अमेरिकन समाज जे प्रश्न विचारत होता, ते प्रश्न ‘दी एक्सॉर्सिस्ट’ने थेट पडद्यावर आणले. ते प्रश्न म्हणजे- धर्मावर विश्वास ठेवायचा की नाही? विज्ञानाने सर्वकाही समजावून सांगता येते का? दुष्टशक्ती खरोखर बाहेर आहे की ती आपल्या आतल्या भीतीतूनच जन्म घेते? म्हणूनच तो सिनेमा एका काळाचा आणि सिनेमाच्या इतिहासातील महत्त्वाच्या संक्रमणाचा दस्तऐवज ठरतो. न्यू हॉलीवूड चळवळीने समाजशास्त्राrय, राजकीय वास्तवाला स्पर्श करणारे सिनेमे दिले, तर ‘दी एक्सॉर्सिस्ट’ने या मालिकेत भय आणि श्रद्धा या शाश्वत विषयाला हात घालून स्वतचे वेगळे स्थान निर्माण केले.

(लेखक चित्रपट समीक्षक आहेत.)

Comments are closed.