जागर – 25 गिधाडांचा बळी, मृतांच्या टाळूवरचे विष

>> भावेश ब्राह्मणकर

उत्तर प्रदेशच्या दुधवा व्याघ्र प्रकल्पात एकाच वेळी तब्बल 25 गिधाडांचे मृतदेह सापडले आहेत. त्यांचा मृत्यू कशामुळे झाला? या घटनेची देशभर एवढी चर्चा का होत आहे? एकीकडे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वन्यजीव संवर्धनाचे मोठे दावे केले जातात, तर दुसरीकडे उत्तर प्रदेशातील दुधवा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधून एक अत्यंत विदारक स्थिती समोर आली आहे. कडाक्याच्या उन्हात, आकाशात उंच भरारी घेणारी आणि निसर्गाचे सफाई कामगार म्हणून ओळखली जाणारी 25 गिधाडे मृतावस्थेत आढळली आहेत. ही गिधाडे हिमालयन ग्रिफन (Himalayan Griffon) या दुर्मिळ प्रजातीची आहेत. या घटनेने केवळ उत्तर प्रदेशच नव्हे, तर संपूर्ण देशातील पर्यावरणप्रेमी आणि पक्षीशास्त्रज्ञांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

दुधवा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील एका शेतात 25 ते 26 गिधाडांचे सांगाडे आणि मृतदेह विखुरलेल्या अवस्थेत सापडले. प्राथमिक तपासणीनुसार, या मृत्यूचे कारण दुय्यम विषबाधा (सेकंडरी पॉयझनिंग) असल्याचे मानले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील काही भटक्या कुत्र्यांचा मृत्यू झाला होता, ज्यांच्या मृतदेहांमध्ये विष कालवण्यात आले होते. या विषारी कुत्र्यांचे मांस खाल्यामुळे या दुर्मिळ गिधाडांना आपला जीव गमवावा लागला. ही घटना केवळ अपघात नसून मानवी निष्काळजीपणा आणि वन्यजीव व्यवस्थापनातील त्रुटींचे जळजळीत उदाहरण आहे.

हिमालयन ग्रिफन गिधाडे ही आययूसीएन (IUCN) या जागतिक संस्थेच्या लाल यादीत धोक्याच्या छायेत (Near Threatened) म्हणून वर्गीकृत आहेत. हे पक्षी प्रामुख्याने हिमालयाच्या उंच भागात आढळतात, परंतु अन्नाच्या शोधात आणि स्थलांतरादरम्यान ते दुधवासारख्या तराई प्रांतात येतात. गिधाडे ही निसर्गचक्रातील स्वच्छता दूत (Scavengers)  आहेत. मेलेल्या प्राण्यांचे अवशेष खाऊन ते परिसर स्वच्छ ठेवतात आणि एंथ्रॅक्स, रेबीज यांसारख्या महाभयंकर रोगांचा प्रसार रोखण्यास मदत करतात. जेव्हा अशा मोठय़ा संख्येने गिधाडांचा मृत्यू होतो, तेव्हा संपूर्ण परिसंस्थेचे आरोग्य धोक्यात येते.
भारतातील गिधाडांच्या संख्येतील घसरणीचा इतिहास पाहिला तर 90 च्या दशकात ‘डायक्लोफेनॅक’ या औषधामुळे गिधाडांची संख्या 99 टक्क्यांनी घटली होती. त्यानंतर सरकारने या औषधावर बंदी घातली आणि हळूहळू गिधाडांची संख्या स्थिरावू लागली होती. मात्र, आता समोर आलेले ‘सेकंडरी पॉयझनिंग’चे संकट त्याहूनही भयानक आहे. अनेकदा गावकरी आपल्या पाळीव प्राण्यांना मारणाऱया वाघ, बिबटय़ा किंवा भटक्या कुत्र्यांपासून वाचण्यासाठी किंवा सूड उगवण्यासाठी मेलेल्या प्राण्यांच्या शरीरात विष कालवतात. दुधवामधील घटनेतही कुत्र्यांना मारण्यासाठी टाकलेले विष गिधाडांच्या जिवावर बेतले आहे. हे ‘कोलेटरल डॅमेज’ निसर्गाचे अपरिमित नुकसान करणारे आहे.

दुधवा व्याघ्र प्रकल्प हा गिधाडांच्या संवर्धनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. भारतात आढळणाऱया गिधाडांच्या 9 प्रजातींपैकी 8 प्रजाती येथे आढळतात. यात अतिशय दुर्मिळ समजल्या जाणाऱया ‘व्हाईट रम्प्ड’ (White
rumped)  आणि ‘रेड हेडेड’ (Red headed) गिधाडांचाही समावेश आहे. गेल्या काही वर्षांत येथे प्रजनन करणाऱया जोडय़ांची संख्या वाढल्याने संवर्धकांना आशेचा किरण दिसू लागला होता. मात्र, एकाच घटनेत 25 गिधाडांचा बळी गेल्याने संवर्धनाचे अनेक वर्षांचे प्रयत्न एका झटक्यात मातीत मिळाले आहेत.

दुधवा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनचे उपसंचालक कीर्ती चौधरी म्हणाले की, ‘आम्हाला असा संशय आहे की, कुत्र्यांनी विषारी तांदूळ खाल्ला आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर, ज्या गिधाडांनी या कुत्र्यांचे मांस खाल्ले, ती जवळच्या शेतात कोसळू लागली. एकूण 25 गिधाडे मृतावस्थेत आढळली, तर 6 गिधाडांना बेशुद्धावस्थेत वाचवण्यात यश आले. त्यांना आवश्यक ती इंजेक्शन्स देण्यात आली असून, त्यापैकी 4 गिधाडे शुद्धीवर आल्यानंतर उडून गेली आहेत. उर्वरित पक्ष्यांवर सध्या वनपरिक्षेत्राच्या आवारात उपचार सुरू आहेत. नजीकच्या काळात आम्ही अशी घटना पाहिलेली नाही. या घटनेत केवळ कुत्र्यांनाच लक्ष्य करण्याचा हेतू होता का, याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत,’ असेही चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.

या घटनेनंतर उत्तर प्रदेश वन विभागाने आणि दुधवा बफर झोनच्या कर्मचाऱयांनी तातडीने तपास सुरू केला आहे. मृत गिधाडांचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले असले तरी, प्रश्न केवळ शिक्षेचा नाही तर जनजागृतीचा आहे. ग्रामस्थांना विषबाधेच्या परिणामांबाबत शिक्षित करणे आणि अशा घटना घडू नये म्हणून पाळीव प्राण्यांच्या मृत्यूची विल्हेवाट लावण्याची योग्य यंत्रणा उभारणे गरजेचे आहे.
पक्षीशास्त्रज्ञांच्या मते, गिधाडांचा मृत्यू हा केवळ एका प्रजातीचा ऱहास नसून तो भविष्यातील साथीच्या रोगांना दिलेले आमंत्रण आहे. गिधाडे नसतील तर मेलेली जनावरे कुजतील, त्यामुळे भूगर्भातील पाणी दूषित होईल आणि भटक्या कुत्र्यांची संख्या वाढून रेबीजसारख्या रोगांचा धोका वाढेल.

दुधवातील ही दुर्घटना ही केवळ 25 पक्ष्यांचा मृत्यू नसून ती मानवी स्वार्थ आणि निसर्ग यांच्यातील संघर्षाचे लक्षण आहे. व्याघ्र प्रकल्पाप्रमाणेच आता गिधाड प्रकल्प अधिक गांभीर्याने राबवण्याची गरज निर्माण झाली आहे. वन विभागाने केवळ जंगलाचे रक्षण न करता, जंगलाबाहेरील शेतजमीन आणि मानवी वस्तीत होणाऱया अशा विषप्रयोगांवरही लक्ष ठेवणे आवश्यक आहे. हिमालयन ग्रिफन गिधाडांचा हा मूक आक्रोश सरकार आणि समाजाने ऐकला नाही, तर भविष्यात पर्यावरणाचे रक्षण करणे अशक्य होईल. सर्वांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, गिधाड दिसायला सुंदर नसेलही, पण त्याचे असणे हे मानवाच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. दुधवामधील ही शोकांतिका पुन्हा घडू नये, हीच अपेक्षा.
(लेखक पर्यावरण अभ्यासक आणि मुक्त पत्रकार आहेत)
[email protected]

Comments are closed.