कलारंग – आगला 'श्रुजन' सोहाला

आपली कलानिर्मिती सादर करीत कलेच्या माध्यमातून एकमेकांना भेटत, स्मरणरंजन करणारे, एल. एस. रहेजा स्कूल ऑफ आर्ट या कलासंस्थेच्या माजी विद्यार्थ्यांचे आगळे चित्रप्रदर्शन मुंबईतील नेहरू कलादालन येथे सुरू आहे. त्यानिमित्त…

सृजन म्हणजे नवनिर्मिती. कलाक्षेत्रातील मंडळी तर नवनिर्मितीचा लेणं लेऊन आलेली असतात. शिल्पकला, चित्रकला असो किंवा गायन, वादन कला. कलाकाराचं आयुष्याला व्यापून राहिलेली त्यांची कला नवनिर्मितीचे अनेक सोहळे साजरे करते. अशी निर्मिती आपल्यातील कलासक्त रसिकालाही तितकेच लुभावते आणि म्हणूनच चित्रकारांनी रेखाटलेल्या रंगरूपांच्या देखण्या प्रदर्शनांना कलारसिक आवर्जून उपस्थिती दर्शवतो.

निर्मितीतून आकारास आलेलं कोणतंही प्रारूप म्हणजे त्या त्या कलाकाराच्या निपुणतेची, त्याच्यातील गुणतत्वांची ओळख. कलाकाराचा हा प्रवास घडण्यामागे उपजत जाण, कलात्मक दृष्टी जितकी महत्त्वाची तितकीच त्याला मिळालेले कलेचे शिक्षणही. कलासंस्कृतीचा अतुलनीय वारसा लाभलेल्या आपल्या भूमीत अशा अनेक कलासंस्थांनी जाणकार कलाकार घडवले. त्यापैकीच एक एल. एस. रहेजा स्कूल ऑफ आर्ट ही कलाशिक्षण देणारी संस्था. याच रहेजामधील माजी विद्यार्थ्यांचे चित्रप्रदर्शन नेहरू कलादालन येथे आयोजित करण्यात आले असून रसिकांचा उत्फूल्ल प्रतिसाद लाभत आहे.

कै. प्रा. दत्ता परुळेकर सर यांनी पाच विद्यार्थ्यांना घेऊन सुरू केलेले बांद्रा स्कूल ऑफ आर्ट नंतर एल. एस. रहेजा स्कूल ऑफ आर्ट झाले. आता रहेजा स्कूल ऑफ आर्ट बंद झाले आहे. पण त्यातील माजी विद्यार्थी अर्थात कलाक्षेत्रातील चित्रकार, कलावंत आणि काही कला शिक्षक जे रहेजात शिकले आणि तिथेच प्राध्यापक म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला. अशा सगळ्यांनी मिळून ‘सृजन’ हे चित्रप्रदर्शन आयोजित केले आहे. पावसाळा याच संकल्पनेवर आधारित चित्रांचा आनंद देण्यासाठी भरविलेले प्रदर्शन उद्यापर्यंत नेहरू कला दालन, वरळी येथे सुरू आहे. निसर्गचित्र, रचनाचित्रे, व्यक्तिचित्रे, अमूर्त चित्रे, शिल्प असे विविध विषयांवरील चित्रं इथे प्रदर्शित केली आहेत. कॅनव्हास, जलरंग, तैलरंग अॅक्रॅलिक रंग अशा विविध माध्यमांत व विविध शैलीतील ही चित्रे आहेत.

सुप्रसिद्ध सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव यांच्या हस्ते 30 जुलै रोजी या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी रहेजा स्कूल ऑफ आर्टचे माजी प्राचार्य प्रा. श्रीधर बांदेकर यांनी पालव सरांचा ‘पद्मश्री’ मिळाल्याबद्दल सत्कार केला. अच्युत पालव यांचा सुलेखन क्षेत्रातील प्रवास अचंबित करणारा आहे. यावेळी कलाकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, ‘आपल्या कलाकृतीतून नावीन्य जपत विविध प्रयोग केले गेले पाहिजेत. वर्षानुवर्षे तशीच निर्मिती साधणारी कला आणि कलाकार रसिकाला आनंद देऊ शकत नाही. म्हणूनच कलाकारांनी एकत्र येत, एकत्र काम करावे. चर्चा करावी. कार्यशाळा घ्याव्यात. त्यातून संवाद घडेल अन् यातून जी विचारांची देवाणघेवाण होईल, कलानिर्मिती होईल ती नक्कीच रसिकांना आवडेल. प्रयोगशीलता जपणारा कलाकार नेहमी यशस्वी ठरतो.’

एकूण 24 कलाकारांच्या कलाकृती या प्रदर्शनात आहेत. त्यापैकी प्रा. बांदेकर व प्रा. प्रतिभा वाघ हे दोन माजी विद्यार्थी. रहेजा कला महाविद्यालयातच शिक्षक म्हणून त्यांनी कलेची सेवा केली. हे केवळ चित्रप्रदर्शन नसून एक आगळे स्नेहसंमेलनच असल्याने सर्वजण भारावून गेले.

यावेळी प्रा. प्रतिभा वाघ यांनी स्वतचा अनुभव मांडला. ‘अलीकडे माजी विद्यार्थांची स्नेहसंमेलने अनेक होत असतात. पण आमचे स्नेहसंमेलन वेगळ्या रूपातले आहे. आम्ही आपली कलानिर्मिती सादर करून कलेच्या माध्यमातून आम्ही एकमेकांना भेटलो.’ त्यांनी व्यक्त केलेली भावना सर्वांचीच असावी. नेहरू कलादालन आनंदी, उत्साही वातावरणाने भारले होते. पु. ल. देशपांडे कलाअकादमीच्या वर्षा कराळे या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्यांनी आपण नक्कीच एखादी कार्यशाळा घेऊन त्यात केलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन करूया, असे मनोगत व्यक्त केले.

कलानिर्मिती सादर करीत घडलेली भेट सहभागी असणार्या प्रत्येकासाठी आनंददायी वाटणारी आहे. म्हणूनच माजी विद्यार्थी, शिक्षकांच्या कलाकृतींचे सादरीकरण असणारा हा सोहळा स्मरणरंजन करणाराही ठरला.

Comments are closed.