वारसावैभव – नागपूरचा चिटणवीस वाडा

>> प्रणव पाटील, [email protected]
तीन मोठय़ा कालखंडांचा साक्षीदार असलेला नागपूरकर भोसल्यांच्या काळातील चिटणवीस वाडा, त्यातील कलात्मक स्थापत्यशैलीतून वारसावैभवाचे आगळे महत्त्व दर्शवतो.
नागपूरच्या महाल भागात चिटणवीस पुरा हा प्रसिद्ध भाग आहे. या भागातच प्रसिद्ध असा चिटणवीस वाडा अडीचशे वर्षांनंतरही दिमाखात उभा आहे. या वाडय़ाचं उत्तरेकडे असलेलं एक मजली प्रवेशद्वार पाहिलं की, ब्रिटिश काळातली एखादी हवेली असल्याचं वाटतं. आजही वाडय़ाचा लाकडाचा मजबूत दरवाजा या प्रवेशद्वाराला आहे. प्रत्यक्षात मूळ वाडा हा नागपूरकर भोसल्यांच्या काळातला आहे. रखमाजी गणेश रणदिवे हे इ. सन 1744 साली रघुजी भोसल्यांचे चिटणवीस होते. चिटणवीस हा अधिकारी राज्याची कागदपत्रं लिहिण्याचं आणि त्यांची देखभाल करण्याचं काम करायचा. त्यामुळे चिटणवीसाचा वाडा म्हणजे मध्ययुगातली ती एक सरकारी कचेरीच. इथे सरकारी अधिकाऱयांची आणि लोकांची सतत वर्दळ असली पाहिजे. ब्रिटिश काळातही चिटणवीस वाडय़ाचा उपयोग कृषी आणि बँकांचं कार्यालय म्हणून उपयोग केला गेला. त्यामुळे मूळ वाडय़ाच्या भोवती ब्रिटिश काळातील इमारतींचं बांधकाम झाल्याचं दिसतं.
मूळ चिटणवीस वाडा हा तीन चौकी प्रकारातील एक मजली वाडा आहे. वाडय़ाच्या मुख्य भागात जाण्याआधी पडवी आहे. या भागात बसून लिहिण्याकरिता वापरण्यात येणारा एक जुना लाकडी बाक, मोठा लाकडी पेटारा दिसतो. शिवाय नागपूरच्या बैलपोळ्याचे आकर्षण असलेल्या बैलाच्या लहान लाकडी मूर्ती दिसतात. वाडय़ाचा पहिला चौक हा वरून कौल लावून बंदिस्त केल्यामुळे थोडा अंधारी झाला आहे. या भागात अतिशय सुंदर लाकडी खांब आहेत. या भागात एका कोपऱयात देवघर असून आजही ते जसंच्या तसं ठेवलं आहे. या चौकातील भिंतींवर श्रीकृष्णाच्या आयुष्यावर आधारित चित्रं काढण्यात आली आहेत. वाडय़ाचा दुसरा चौक अतिशय सुंदर असून त्याच्या मध्यभागी दगडी कारंजे आहे. हा भाग जेवणावळींसाठी वापरला जात होता. चिटणवीस वाडय़ात एकेकाळी रोजच्या रोज शंभर लोकांच्या जेवणाच्या पंगती असत. त्यामुळे या चौकाला लागून असणाऱया खोल्यांचा उपयोग स्वयंपाकघर म्हणून आणि दूध, भाज्या, धान्य साठवणुकीसाठी केला जाई. वाडय़ातील मुख्य दोन चौक आजही सारवलेले आहेत. त्यामुळे वाडा पाहताना जुन्या काळात गेल्याचा अनुभव येतो. मधल्या चौकाच्या पुढचा चौक थोडा मोकळा आणि मोठा आहे. मध्यभागी पाण्याचा एक दगडी हौद, एका बाजूला कपडे धुण्यासाठी ठेवलेले दगड दिसतात.
वाडय़ाच्या एका भागात अतिशय सुंदर श्रीकृष्णाचं मंदिर आहे. मंदिराचा मुख्य गाभारा आणि शिखर चुनामातीचं असून त्यापुढचा मंडप लाकडी आहे. या मंडपाचे लाकडी खांब आणि त्याच्या महिरपी कोरीव आहेत. मंदिराच्या गाभाऱयातली मुरलीधर रूपातली कृष्ण मूर्ती संगमरवरी आहे. या मंदिराच्या मागे हनुमानाची आणि गरुडाची लहान मंदिरं आहेत. चिटणवीस वाडय़ाच्या मुख्य भागात पुन्हा येऊन वरचा मजला आणि त्यावरचं छत बघता येतं. 1940 साली या वाडय़ाची पुन्हा डागडुजी करण्यात आली होती. आज या वाडय़ाची नागपूरकरांना विशेष ओळख आहे ती जुनं मंगल कार्यालय म्हणून. या वाडय़ात जुन्या पिढीतल्या अनेकांची लग्नं झाली आहेत. आजही या वाडय़ाचा उपयोग छोटेखानी लग्न, मुंज या शुभकार्यासाठी होतो. त्यामुळे वाडय़ाची निगा राखली जाते. वाडय़ाच्या कार्यालयात चिटणवीस घराण्यातील काही पुरुषांच्या तसबिरी आणि तैलचित्रं पाहता येतात. नागपुरातल्या मुख्य भागात असूनही या वाडय़ात आल्यानंतर एक वेगळीच शांतता वाटते.

Comments are closed.