फिरस्ती – येळ्ळूरचा राजहंसगड

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

>> प्रांजल वाघ,[email protected]

स्वराज्यकाळात विस्तारलेला अन् पेशवाईत मराठा साम्राज्याचा महत्त्वाचा लष्करी तळ असलेला हा येळ्ळूर कोट नावाप्रमाणेच देखणा- राजहंसगड!

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा जवळ जवळ केंद्रबिंदू असलेले येळ्ळूर गाव एका ऐतिहासिक ठेव्याचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेचे साक्षीदार आहे. या गावापासून साधारण मैलभर अंतरावर एका टेकडीवजा डोंगरावर, काळ्या पाषाणात बांधून काढलेला, गोमुखी दरवाजा असलेला आणि थेट 12 व्या शतकाशी नातं सांगणारा एक दुर्ग आहे – राजहंसगड!

राजहंसगड – ज्याला `येळ्ळूर कोट’ म्हणूनही ओळखले जाते. हा बदलत्या सत्तांतराचा एक मूक साक्षीदार आहे. या किल्ल्याचा इतिहास साधारण 12 व्या शतकापर्यंत मागे जातो. `रट्ट’ राजवंश या भागावर राज्य करीत होता तेव्हा बिचीराजा नावाच्या राजाने मोक्याचे स्थान ओळखून येथे संरक्षणात्मक तटबंदी उभारली. समुद्रसपाटीपासून सुमारे 2500 फूट उंचीवर असलेल्या या गडाचा वापर प्रामुख्याने सभोवतालच्या मैदानी प्रदेशावर आणि व्यापारी मार्गांवर नजर ठेवण्यासाठी केला जात असे. कालांतराने यादव आणि मग होयसळांच्या अधिपत्याखाली हा किल्ला राहिला. मात्र 16 व्या शतकात विजापूरच्या आदिलशाहीत याला खऱया अर्थाने लष्करी महत्त्व प्राप्त झाले.

रट्ट राजांनी उभारलेल्या बेळगाव आपल्या ताब्यात आल्यावर आदिलशाहीच्या सरदार असद खान लारी याने बेळगाव किल्ल्याच्या डागडुजीसोबत राजहंसगडाची दगडी बांधणी आणि नूतनीकरण केले, जेणेकरून बेळगावकडे येणाऱया शत्रूवर लांबूनच नजर ठेवता येईल. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेत हा किल्ला स्वराज्यात सामील झाला.

स्वराज्याच्या विस्तारकाळात आणि त्यानंतरच्या पेशवाईत हा किल्ला मराठा साम्राज्याचा एक महत्त्वाचा लष्करी तळ बनला. पुढे इंग्रजांच्या आगमनानंतर या किल्ल्याचे सामरिक महत्त्व कमी झाले असले तरी त्याची ऐतिहासिक महत्त्व आजही कायम आहे.

आज राजहंसगड हा इतिहासप्रेमी आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. गडाच्या माथ्यावर असलेले सिद्धेश्वर मंदिर आणि तिथे असलेली प्राचीन विहीर तत्कालीन स्थापत्यशास्त्राचे उत्तम नमुने आहेत. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची कमान आणि तिथून दिसणारे येळ्ळूर जवळील पठारी प्रदेशाचे दृश्य मनाला भुरळ घालते. अलीकडच्या काळात तिथे उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या गडाच्या वैभवात अधिकच भर घालतो. मराठय़ांच्या इतिहासाचा ठेवा अनुभवण्यासाठी राजहंसगड हे एक उत्तम ठिकाण आहे!

Comments are closed.