निमित्त – स्वदेशीकरणाकडून सशक्तीकरणाकडे
>> प्रा. धनंजय दळवी
77 व्या भारतीय सैन्यदल दिनाचे पुणे येथे 15 जानेवारी रोजी भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले होते. भारतीय लष्कराने स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या 77 वर्षांच्या इतिहासात भारताने गतिमान प्रगती करून जगात चौथ्या स्थानापर्यंत मजल मारली आहे. शस्त्रास्त्रांच्या नवनिर्मितीच्या बाबतीत भारताने आपली घोडदौड उत्तम प्रकारे राखून स्वयंपूर्णतेसह निर्यात करण्यावर लक्ष केंद्रित करून ‘स्वदेशीकरणातून सशक्तीकरणाचा’ नारा योग्य ठरवला आहे. भारतीय लष्कराच्या संशोधन, विकास व प्रगतीचा हा आढावा.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर 15 जानेवारी 1949 रोजी भारतीय लष्कराची स्थापना झाली. याच दिवशी फिल्ड मार्शल के. एम. करिअप्पा यांनी भारतीय लष्कराचे पहिले प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. याच दिवसाचे स्मरण म्हणून 15 जानेवारी हा दिवस ‘भारतीय लष्कर दिन’ अर्थात ‘आर्मी डे’ म्हणून साजरा केला जातो. भारतात इंग्रजांनी सन 1895 मध्ये लष्कराची स्थापना केली होती. भारतीय लष्कराच्या स्थापना दिनानिमित्त साजऱया केल्या जाणाऱया प्रतिष्ठेच्या ‘आर्मी डे’ परेडचा मान या वर्षी पुण्याला मिळाला. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयामार्फत 15 जानेवारी 2025 रोजी पुण्यात आळंदी मार्गावरील बॉम्बे सॅपर्सच्या विस्तीर्ण मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
आर्मी डे परेडची पुण्याला यंदा दुसऱयांदा संधी मिळाली होती. देशाच्या संरक्षण क्षेत्राची क्षमता आणि आत्मनिर्भर होण्याच्या प्रवासाचा वेध यानिमित्ताने घेतला गेला. भारतीय लष्कराने युद्धभूमीचे आधुनिक स्वरूप ओळखून आपल्या शास्त्रास्त्रात काळानुरूप बदल केले आहेत. या आत्मनिर्भर भारताचे दर्शन व अत्याधुनिक भारतीय बनावटीची शस्त्रs यानिमित्त पाहायला मिळाली. आता रणभूमीवर सैनिकांऐवजी द्रोण आणि रोबोट दिसणार असल्याने त्या स्वरूपाचे अत्याधुनिक प्रदर्शनही मांडण्यात आले होते. यावेळी संचलन व प्रदर्शनाला भारतीय लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी उपस्थित होते, तर बुधवार, 15 जानेवारी रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भेट दिली.
15 जानेवारी रोजी भारतीय बनावटीच्या शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन व अभ्यासपूर्ण चित्ररथांचे संचलन झाले. ‘स्वदेशीकरण ते सशक्तीकरण’ या आशयावर आधारित नावीन्यपूर्ण चित्ररथांमध्ये मिशन ऑलिम्पिक, भारतीय सेना, समर्थ भारत, सक्षम सेना, पूर्व सैनिक, सर्वदा प्रतिबद्ध, कार्बन तटस्थता, प्रयास सेना (कार्बन नेचर आर्मी) याविषयीच्या सखोल माहितीचा समावेश होता. भारतीय बनावटीच्या आधुनिक शस्त्रास्त्रांमध्ये सामान्य नागरिकांना न पाहता येणारी पुढील काही शस्त्रास्त्रs व यंत्रणा पाहण्याची संधी यानिमित्ताने मिळाली.
स्वाती पर्वत WLR रडार यंत्रणा ः भारतीय लष्कराने स्वदेशात विकसित केलेले वेपन लोकेटिंग रडार (WLR-M) हे बंगळुरूमधील भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने तयार केले आहे. स्वाती रडार दोन आवृत्तीमध्ये बनवण्यात आले असून स्वाती मैदाने (WLR) आणि स्वाती पर्वत (WLR-M) अशी दोन प्रकारची त्याची रचना आहे. स्वाती मैदाने रडार सपाट भूपृष्ठावर कार्यरत राहून अनेक ठिकाणी तैनात केलेल्या शस्त्रांपासून एकाच वेळी कार्य करण्यास सक्षम बनवते.
रोबोटिक डॉग म्युल ः भारतीय लष्कराने रोबोटिक डॉग वापरास सुरुवात केली असून या रोबोटिक डॉगची उंची, लांबी व रुंदी 1 मीटर असून हे डॉग सुमारे 90 किलो वजन उंच आणि डोंगराळ भागात वाहून नेण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. 10 वर्षांपर्यंत वापर होऊ शकणाऱया या डॉगचा वापर निगराणी आणि लॉजिस्टिकसाठी उपयुक्त ठरत आहे.
96 ATOR (ऑल टेरेन ऑबस्टॅकल रिकनेसंस) ः भारतीय लष्करातील 96 ATOR N 1200 ही स्पेशल मोबिलिटी व्हेईकल आहे. हे वाहन वाळवंट, पाणी आणि बर्फ या ठिकाणी वेगवान प्रवास करू शकते. बर्फाच्छादित पर्वतापासून ते खडबडीत भागापर्यंत तसेच दलदलीत हे हायटेक वाहन केवळ लष्करी ऑपरेशनची क्षमता वाढवत आहे. यामध्ये 9 व्यक्ती बसण्याची क्षमता असून वाहनाच्या इंजिनवर कोणत्याही हवामानाचा विशेष परिणाम होत नाही. या वाहनाचा वेग 40 कि.मी. असून पाण्यामध्ये सहा किमी वेगाने चालू शकते. 1,200 किलो वजन वाहून नेण्याची क्षमता असून 2,300 किलो वजन खेचण्याची क्षमता या वाहनामध्ये आहे.
वज्र रणगाडा ः हा स्वयंचलित रणगाडा असून जमिनीसह आकाशातून आलेल्या शत्रूंच्या हल्ल्याचा अचूक वेध घेतो. प्रगत तोफखान्यातील हा महत्त्वाचा भाग असून 40 किमी अंतरापर्यंत याची वेध घेऊन मारा करण्याची क्षमता आहे. शत्रूंचे ड्रोन सिग्नल शोधून निकामी करून ड्रोनशी संबंधित दोन ऑपरेटरमधील संवादामध्ये व्यत्यय आणण्याचे काम याकडून केले जाते.
पिनाका मिसाईल सिस्टिम ः डीआरडीओ आणि भारतीय लष्कराने संयुक्तरित्या विकसित केलेल्या पिनाका मिसाईलने लक्षवेध करता येते. पिनाका मिसाइल सिस्टिम ही 44 सेकंदांमध्ये 12 मिसाईल लॉन्च करू शकते. म्हणजे प्रत्येक चार सेकंदाला एका मिसाईलची लॉन्चिंग होऊ शकते. याची मारक क्षमता ही 7 किमीपासून 90 किमीपर्यंत आहे.
यासोबतच या प्रदर्शनामध्ये अँटी टँक गाइडेड मिसाईल हे आधुनिक तांत्रिक युद्धभूमीसाठी तयार केलेले अत्याधुनिक वाहन असून या वाहनावर क्षेपणास्त्र सज्ज आहे. शत्रूकडून होणाऱया अवकाश हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचे सामर्थ्य यामध्ये आहे. हे उपयुक्त लढाऊ वाहन असून यावरील तोफा अवकाशातील चार किमी टप्प्यातील वेध घेऊ शकतात. शत्रूच्या अवकाश हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्याचे सामर्थ्य अँटी टॅंक गाइडेड मिसाईलमध्ये आहे.
भारतीय लष्कराने ‘मोबाईल कम्युनिकेशन नोड‘ तातडीच्या तैनाती करता बनविलेले असून विविध घडामोडींवर त्वरित संपर्क साधण्यासाठी किंवा लक्ष वेधण्यासाठी याचा बहुमोल उपयोग होतो. ‘ड्रोन जॅमर सिस्टिम’ शत्रूने सोडलेले ड्रोन शोधून काढण्यासाठी त्यांना अवकाशामध्येच किंवा जमिनीवर विशिष्ट ठिकाणी रोखण्यासाठी व नष्ट करण्यासाठी कोणत्याही वातावरणामध्ये उपयुक्त असणारे अत्याधुनिक यंत्रणेने सज्ज असे हे वाहन आहे.
ग्लोबल फायर पॉवर मिलिट्री स्ट्रेंथने नुकत्याच जाहीर केलेल्या यादीत शक्तिशाली लष्करामध्ये भारत चौथ्या क्रमांकावर आहे. भारताने लष्करी साहित्याच्या निर्यातीत मोठी आघाडी घेतली असून अमेरिका, फ्रान्स व आर्मेनिया हे देश भारतीय लष्करी साहित्याचे सर्वोच्च तीन खरेदीदार बनले आहेत. या तिन्ही देशांना भारताने 21,083 कोटी रुपयांचे (2.6 अब्ज डॉलर) लष्करी साहित्य निर्यात केले आहे. जवळपास 100 देशांना कंपन्यांनी घातक शस्त्रास्त्रs निर्यात केली आहेत. या शस्त्रास्त्रांमध्ये ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रुझ क्षेपणास्त्र, डॉर्निअर-288 लढाऊ विमाने, तोफा, रडार, आकाश क्षेपणास्त्रs, पिनाक रॉकेट सिस्टिम, चिलखती वाहने इत्यादींचा समावेश आहे. भारताची स्वदेशीकरणाकडून सशक्तीकरणाकडे होणारी वाटचाल प्रगतीपथावर नेणारी आहे, याचा सर्व भारतीयांना सार्थ अभिमान आहे.
Comments are closed.