वेधक – स्त्री पात्री दशावतारी खलनायक

>> स्वप्नील साळसकर , [email protected]

दशावताराची ओढ असलेली वैभववाडीच्या गडमठमधील श्रुती सुतार. दशावतारातील स्त्री पात्री खलनायक म्हणून तिची वेगळी ओळख होत आहे.

स्त्राr असून हुबेहुब पुरुषी आवाज, तेवढेच आकर्षक हावभाव असणारी श्रुती सुतार, जी सध्या नाटय़रसिकांच्या मनावर राज्य गाजवत आहे. प्रत्येक माणसात एक कलाकार दडलेला असूतो व त्याला व्यासपीठाची गरज असते. अशा श्रुती सुतारला दशावताराची ओढ लागली. मुंबईत शिक्षण झालेल्या वैभववाडीच्या गडमठमधील या तरुणीने मग याच क्षेत्रात स्वतची वाट तयार करायचे ठरवले.

दशावतार लोककला वृद्धिंगत करण्यात दशावतारी नटसम्राट ‘मी स्वत मालक’ अशी ओळख सांगणारे बाबी कलिंगण, बाबी नालंग यांसह अनेक दिग्गज कलाकारांचा वाटा आहे. मागील काही काळात गावातील वार्षिक जत्रेत मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी हातात कंदील, गॅसबत्तीच्या प्रकाशाचा आधार घेत पालापाचोळ्याचा सरसर आवाज करत रानावनातून वाट काढावी लागायची. शेजारच्या गावात असणारे दशावतारी नाटक बघण्यासाठी जाण्याची उत्कंठा वेगळीच होती. आता तर दशावतार वेगाने पसरताना दिसत आहे. गावात, वाडय़ावाडय़ांमध्ये होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, मंदिरांचे जीर्णोद्धार, वर्धापन दिन, पूजा महोत्सव, यासह विविध कार्यक्रमांत लोककला, दशावतारी नाटय़प्रयोग सादर होऊ लागले. त्यामुळे लोककला वाढताना दिसते. शिवाय कलाकाराला आपल्या कलेतून हक्काचा रोजगार, कौतुकाच्या थापेबरोबरच नावलौकिकही प्राप्त होत आहेत. याच वाटेवर ओळख मिळवणारी श्रुती सुतार.

मुंबईतील वडाळा भागात राहणाऱया श्रुती हिने बारावीनंतर नर्सिंग कोर्स करून नोकरी स्वीकारली. मात्र तिचे मन मुंबईत रमत नव्हते. लहानपणापासूनच दशावतार पाहण्याची आवड आणि दशावतारी मंडळात काम करण्याची संधी केव्हा मिळेल याची आतुरता होतीच. रुग्णालयात काम करताना मिळालेल्या अल्प वेतनातून आपला शैक्षणिक खर्च भागवणे. शिक्षणासाठी घेतलेले कर्ज फेडायचे आणि मग पुढील महिन्यातील पगाराची वाट बघायची असा महिनाक्रम होता. स्वतसाठी काही रक्कम शिल्लक राहत नव्हती. ना स्वतच्या स्वास्थ्य, खाण्यापिण्याकडे लक्ष देण्यास वेळ. नोकरी करताना रिकाम्या वेळेत कॅनव्हासवर पेंटिंग करण्याची कला जोपासली. अखेर मग श्रुतीने नोकरीला रामराम करत दीड वर्षापूर्वी गावी राहत आपली कलाकारी दाखवून दिली. हनुमान जयंतीला रुईच्या 11 पानांवर विविध रूपांतील बजरंगबलीची चित्रे काढली. टिकलीवर स्वरसम्राज्ञी आशाताई, शंखावर बालकृष्ण रेखाटले. चित्रकलेतून काहीतरी घडवायचे ठरवून ती गावी आली. येथील जीवनशैली, परिस्थितीशी जुळवून घेतले. मुंबईतील वेळेचे नियोजनबद्ध जीवन, मात्र गावात राहून खर्चही कमी, आपल्या सवडीनुसार काम आणि दशावतारी कलेतून चांगले मानधन, बक्षीस आणि कौतुकाची थाप विसाव्या वर्षी मिळाल्याचा आनंद श्रुतीने बोलून दाखवला.

सिंधुदुर्गात कुडाळ पावशीमधील श्रीदेवी सातेरी महिला दशावतारी मंडळाने श्रुती हिला नाटकात काम करण्याची संधी दिली. या मंडळात संगीत साथीसह एकूण 11 महिला कलाकार आहेत. नाटकाविषयी श्रुती सांगते, ‘नाटकाअगोदर सर्वजण एकत्र बसून चर्चा करतात. आपल्याला दिलेली भूमिका खलनायक, राजपार्ट किंवा अन्य असेल. नाटक सुरू होण्याअगोदर त्यासाठी मनन, चिंतन करून आपणाला कसे सादर व्हायचे आहे. तशा प्रकारची शब्दफेक समोर आणावी लागते. नाटकाचे आख्यान डोळ्यांसमोर ठेवून तशी तयारी करावी लागते.’ तिचे गरुड गर्वहरण, कृष्ण हनुमान युद्ध, भक्तांची पाठीराखी आदिमाया यांसह विविध नाटय़प्रयोग सध्या गाजत असून प्रेक्षकांनी पसंती दिल्याचे असल्याचे ती सांगते.

सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न

लोकसेवा, सामाजिक भान हे चार भिंतीच्या आत असू नये असे श्रुतीचे म्हणणे आहे. गावात आल्यावर आश्रमांना भेटी देत तेथे वास्तव्य करणाऱया व्यक्तींचे जीवन अनुभवले. जखमी वन्य प्राण्यांना जीवदान देण्यासाठी धडपड कायम ठेवली. सर्पमित्र म्हणून काम करताना नाटकाच्या स्टेजवर आलेल्या सरपटणाऱया जनावराला बाजूला केल्याचे श्रुती सांगते. मात्र अशी सामाजिक कामे सोशल मीडियावर टाकून प्रसिद्धी नको असल्याचे ती म्हणते.

निसर्गाने बळ दिले

श्रुती सुतार हिचे संपूर्ण कुटुंब मुंबईत राहते. सुरुवातीला गावी आल्यावर शहरातील त्या आठवणी सारख्या समोर येत होत्या. मात्र मुंबईतील ते चाकोरीबद्ध जीवन जगायचे हे श्रुती हिला पसंत नव्हते. घरातील मंडळी, नातेवाईक आणि चित्रकार अक्षय मेस्त्राr यांचा पाठिंबा आणि येथील निसर्गाने दिलेले बळ यामुळे या दशावतार प्रवासाला सुरुवात केल्याचे श्रुतीने आवर्जून सांगितले.

Comments are closed.