न्यू हॉलीवूड – पाळतीचा आवाज
>> अक्षय शेलार, [email protected]
'द कन्व्हर्सेशन' हा एका माणसाच्या अंतर्मनाचा सिनेमा. 1970च्या दशकातील अमेरिकन असुरक्षिततेचा, खासगी आयुष्यावरील संकटाचा आणि तंत्रज्ञानाच्या परिणामांचा हा चित्रपट एक क्लासिक दस्तऐवज ठरतो.
1970च्या दशकात न्यू हॉलीवूडने अमेरिकन सिनेमाला नवी भाषा, नवे विषय दिले. फ्रान्सिस फोर्ड कोप्पोलाचा ‘द कन्व्हर्सेशन’ हा त्या दशकातील एक महत्त्वाचा टप्पा होता. ‘द गॉडफादर’च्या निर्विवाद, भव्य यशानंतर आलेला हा तुलनेने छोटा, अंतर्मुख चित्रपट. माफिया कथेच्या बाहेर पडून कपोलाने इथे एकटेपणा, गोपनीयता, तंत्रज्ञानाची भीती आणि नैतिकतेचे प्रश्न यांवर एक अस्वस्थ करणारं चित्र तयार केलं.
या चित्रपटाचा नायक हॅरी कॉल (जीन हॅकमॅन) हा साऊंड सर्व्हेलन्स तज्ञ आहे. लोकांची संभाषणे रेकॉर्ड करणं, त्यांचे तुकडे जोडणं आणि त्यातून एक अर्थनिर्मिती करणं ही त्याची नोकरी, पण हीच नोकरी त्याच्या वैयक्तिक आयुष्यात शिरकाव करते. परिणामी तो अंतर्मुख, भीत भीत जगणारा माणूस बनतो. जगाशी संवाद साधण्याऐवजी तो इतरांच्या (चोरून ऐकलेल्या) संवादात रमतो. त्याचं वैयक्तिक आयुष्य कोरडं, रिकामं आहे. खऱ्याखुऱ्या संवादाचा अभाव इथे प्रकर्षाने जाणवतो. चित्रपटात हॅरीने मुद्रित केलेल्या ध्वनिफितींचा केलेला वापर फारच रोचक आहे. हॅरी एका उद्यानात तरुण जोडप्याचा संवाद रेकॉर्ड करतो आणि त्या अस्पष्ट, अर्धवट ऐकू येणाऱ्या वाक्यांमधून संपूर्ण कथानकाची दिशा ठरते. `He`d kill us if he got the chance` हे एक वाक्य आणि त्यातील अनेक अर्थछटांमधील ताणतणाव यांतून सबंध चित्रपट साकारतो. ‘द कन्व्हर्सेशन’ तांत्रिकदृष्ट्या अत्यंत नेमकेपणाने घडवलेला आहे. चित्रपटाचे ध्वनी आरेखन वॉल्टर मर्चने केलं आणि ते नंतर सिनेमाच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलं. ध्वनी इथल्या कथानकाचा गाभा आहे. आवाजाचे तुकडे, शांतता आणि प्रतिध्वनी हे सारे घटक प्रेक्षकाला सतत अस्वस्थ करतात. सिनेमाच्या भाषेत ‘पाहणं’ हे जितकं महत्त्वाचं, तितकंच ‘ऐकणं’ही महत्त्वाचं असतं आणि नेमकं ते इथे केंद्रस्थानी येतं.
कपोलाने इथे समाजातील पाळत ठेवणाऱ्या यंत्रणांवरही भाष्य केलं. 1970च्या दशकात अमेरिकेत वॉटरगेट स्कँडलचा धुरळा उडाला होता. पाळत ठेवली जाणं, गुप्त ध्वनिफिती असे प्रकार उघड झाले होते. ‘द कन्व्हर्सेशन’ हे त्या काळाचे एक लख्ख चित्र आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीने माणसाला सुरक्षितता मिळते, पण त्याचबरोबर त्याची गोपनीयता नष्ट होते, त्याचं स्वातंत्र्य संकुचित बनतं. हॅरी कॉलचं व्यावसायिक आयुष्य हे प्रत्यक्षात एक सांस्कृतिक आणि राजकीय रूपक ठरतं. केवळ राजकीय किंवा सामाजिक भाष्य हा ‘द कन्व्हर्सेशन’चा केंद्रबिंदू नाही. हा एका माणसाच्या अंतर्मनाचा सिनेमा आहे. हॅरी आपल्या कामामुळे सतत अपराधगंडाने पछाडलेला असतो. ‘माझ्या रेकॉर्डिंगमुळे लोकांचा जीव गेला तर?’ ही शक्यता त्याला छळते. त्यामुळे तो नैतिकदृष्ट्या गोंधळलेला, दुभंगलेला वाटतो. शेवटी जेव्हा त्याला जाणवतं की, आपणच एक षड्यंत्रात अडकलो आहोत तेव्हा त्याचा मानसिक विस्फोट घडतो. शेवटच्या दृश्यात तो स्वतचं घर उद्ध्वस्त करून टाकतो. कारण कुणीतरी त्याच्यावर पाळत ठेवतंय याची त्याला खात्री असते.
हा प्रसंग आधुनिक सिनेमातील सर्वात प्रतीकात्मक क्षणांपैकी एक ठरतो. ‘द कन्व्हर्सेशन’ मोठ्या कथनाऐवजी एका व्यक्तीच्या भीती, शंकेवर केंद्रित राहतो. मात्र नेमकं यामुळेच त्याचा प्रभाव व्यापक ठरतो. 1970च्या दशकातील अमेरिकन असुरक्षिततेचा, खासगी आयुष्यावरील संकटाचा आणि तंत्रज्ञानाच्या परिणामांचा हा चित्रपट एक क्लासिक दस्तऐवज ठरतो. ‘द कन्व्हर्सेशन’चा प्रभाव पुढच्या दशकांतील अनेक चित्रपटांमध्ये दिसून येतो. ब्रायन डी पाल्माच्या ‘ब्लो आऊट’मध्येही ध्वनिमुद्रणाच्या माध्यमातून गुन्ह्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न आहे, पण तिथे डी पाल्मा शैलीबद्ध थराराकडे झुकतो. टोनी स्कॉटच्या ‘एनिमी ऑफ द स्टेट’मध्ये जीन हॅकमॅन पुन्हा एकदा सर्व्हेलन्स तज्ञाच्या भूमिकेत पाहायला मिळतो. आजच्या डिजिटल युगात ‘द कन्व्हर्सेशन’ प्रासंगिक वाटतो.
या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, त्याची मिनिमलिस्ट शैली. कपोलाने हा चित्रपट मोठ्या बजेटशिवाय, जवळ जवळ स्वतंत्र निर्मितीसारखा केला. ‘द गॉडफादर’च्या प्रचंड व्यावसायिक यशानंतर त्याच्याकडे सर्वस्वी स्वातंत्र्य होतं आणि त्याचा उपयोग करून त्याने त्याला खऱ्या अर्थाने रस असलेला विषय हाताळला. त्यामुळे ‘द कन्व्हर्सेशन’ हा त्याच्या कारकीर्दीतील सर्वात वैयक्तिक चित्रपट ठरतो. काही समीक्षकांच्या मते या चित्रपटात कथानकापेक्षा वातावरणाला जास्त प्राधान्य दिलं गेलं आहे. कधी कधी त्याची संथ गती आणि अस्पष्टता प्रेक्षकाला दुरावू शकते, पण हाच गुणधर्म त्याला वेगळंही ठरवतो. तो पारंपरिक ‘थ्रिलर’सारखा क्लायमॅक्स देत नाही. त्याऐवजी तो नायकाच्या आतल्या पडझडीला केंद्रस्थानी आणतो.
‘द कन्व्हर्सेशन’मुळे कपोलाचं स्थान केवळ भव्य माफियापटांचे दिग्दर्शक म्हणून मर्यादित राहत नाही. त्याचं संवेदनशील, तांत्रिक आणि तात्त्विक चिंतन करण्याचं सामर्थ्य या चित्रपटातून स्पष्ट होतं. तो प्रेक्षकाला केवळ कथा न सांगता त्याला प्रश्न विचारतोः आपलं आयुष्य खरंच खासगी आहे का? आपल्या संवादांना, आपल्या कृतींना आपणच किती नियंत्रणात ठेवू शकतो? अशा सार्वकालिक मुद्द्यांमुळेच ‘द कन्व्हर्सेशन’ हा एकाच वेळी कालविशिष्ट आणि सार्वत्रिक ठरतो. वॉटरगेटच्या पार्श्वभूमीवर त्याने एकाकीपणा, अपराधगंड, गोपनीयतेचा अभाव या सार्वत्रिक भावनांना चित्ररूप दिलं. आज पन्नास वर्षांनंतरही तो तितकाच टोकदार आणि अस्वस्थ करणारा अनुभव आहे.
(लेखक चित्रपट समीक्षक आहेत.)
Comments are closed.