शैलगृहांच्या विश्वात – बाराबर आणि नागार्जुनी लेणी
>> डॉ. मंजिरी भालेराव
बिहारमधील जहानाबाद जिह्यातील बोधगयेपासून जवळ असणारी ही शैलगृहे मौर्य सम्राट अशोक आणि त्याचा नातू दशरथ यांनी आजीविक नावाच्या धर्मपंथीयांसाठी खोदली. या शैलगृहांमधील शिलालेखात त्याकाळात बोलल्या जाणार्या प्राकृत या भाषेचे प्रादेशीक बोलीनुसार असलेले नमुने आढळतात.
भारतामधील एकूण मानवनिर्मित शैलगृहांची संख्या पाहता त्यापैकी जवळ जवळ 80 टक्के ही आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. यामध्ये सर्वात जास्त गुहा या बौद्ध धर्मीयांसाठी केलेल्या असल्या तरी भारतामध्ये अशा प्रकारच्या कोरीव गुंफा सर्वात प्रथम बिहारमध्ये बाराबर आणि नागार्जुनी टेकडय़ांमध्ये इ.स. पूर्व तिसरे शतक या काळात म्हणजे मौर्य सम्राट अशोकाच्या काळात ‘आजीविक’ नावाच्या धर्मपंथीयांसाठी कोरल्या गेल्या होत्या.
बिहारमधील जहानाबाद जिह्यातील हे ठिकाण बोधगयेपासून 24 किमी अंतरावर आहे. मौर्य सम्राट अशोक आणि त्याचा नातू दशरथ यांनी आजीविक नावाच्या धर्मपंथीयांसाठी इ.स.पूर्व 252 ते इ.स. पूर्व 214 या काळात ग्रॅनाईट या खडकात ही शैलगृहे खोदली. इथे एकूण सात शैलगृहे आहेत. त्यामुळे स्थानिक लोक याला सातघर असेही म्हणत असत. त्यापैकी चार बाराबर टेकडीत व तीन पुढे दीड किलोमीटरवर नागार्जुनी टेकडय़ांमध्ये आहेत. या परिसरात पूर्वी अनेक नक्षलवाद्यांचा निवास होता. त्यामुळे बराच काळ या परिसरात जायचे असल्यास पोलिसांची मदत घेऊन जावे लागे. बाराबर टेकडीमध्ये असलेल्या शैलगृहांची नावे पुढीलप्रमाणे आहेत- लोमश ऋषी गुंफा, सुदामा गुंफा, कर्ण चौपड आणि विश्व झोपडी. ही नावे स्थानिक लोकांनी दिलेली आहेत, पण नागार्जुनी टेकडीवर गोपिका कुभा, वदथिक कुभा किंवा मठिका कुभा आणि वपियककुभाया नावांच्या शैलगृहांची ही नावे मात्र तेथील शिलालेखात आलेली आहेत.
ही भारतातील सर्वात प्राचीन मानवनिर्मित शैलगृहे आहेत की, ज्यांचा नेमका काळ सांगता येतो. येथील शैलगृहांमध्ये ‘लोमश ऋषी गुंफा’ ही सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. याचे मुख्य कारण म्हणजे तिचे मुखदर्शन. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना दोन अर्धस्तंभ कोरले आहेत. हे दोन्ही अर्धस्तंभ वरच्या बाजूने आत झुकलेले आहेत. त्यावर कमानदार छतासारखे नक्षीकाम आहे. कमानीच्या आणि दरवाजाच्या मध्ये काही अर्धवर्तुळाकार रचना आहेत. त्यापैकी एकामध्ये जाळीचे नक्षीकाम आहे. दुसऱयामध्ये मध्यभागी असणाऱया स्तूपासारख्या दिसणाऱया गोष्टीकडे दोन्ही बाजूने जाणाऱया हत्तींच्या रांगा आहेत. या लेण्याचे मुखदर्शन हे लाकडी बांधकामाचे तंतोतंत अनुकरण आहे. या शैलगृहाच्या आत एक वर्तुळाकार दालन आणि त्याला लागून आयताकार मंडप अशी रचना आहे. या गुहेच्या भिंती घासून गुळगुळीत आणि चमकदार केल्या आहेत. या लेण्याच्या भिंतीचा छताजवळचा भाग तसेच गजपृष्ठाकार छतही खराब खडक असल्याने अपूर्ण राहिला आहे. दगडावर दिसणारी अशा प्रकारची झिलई हे मौर्यकालीन कलावशेषांचे वैशिष्टय़च आहे. लोमश ऋषीबरोबरच या दोन्ही टेकडय़ांमध्ये असलेल्या सर्व गुंफांमध्ये अशाच घासून गुळगुळीत, चमकदार तसेच आरशासारखे प्रतिबिंब दाखविणाऱया भिंती आहेत. इथे सम्राट अशोकाचा नाहीतर मौखरी राजवंशातील राजा अनंत वर्मन याचा इ.स.च्या 6व्या शतकातील लेख आहे. त्यामध्ये ‘प्रवरगिरी’ पर्वतावरील या गुहेत विष्णूच्या मत्स्यावताराची मूर्ती स्थापन करण्याचा उल्लेख आहे. मात्र या लेखाच्या खाली साधारणपणे इ.स.च्या 4थ्या – 5व्या शतकातील ब्राह्मी लिपीमध्ये ‘क्लेशकांतार’ असे लिहिले आहे. त्याच्या शेजारी इ.स.च्या 7व्या शतकातील ब्राह्मी लिपीमध्ये ‘बोधिमूल’ असे लिहिले आहे. दरवाजाच्या शेजारील भिंतीवर ‘गोरथगिरी’ असेही मौर्यकालीन म्हणजे इ.स.पूर्व तिसऱया शतकातील ब्राह्मी लिपीत लिहिलेले आहे.
येथील सुदामा नावाने प्रसिद्ध असलेल्या लेण्याचीसुद्धा अशीच रचना आहे. हे लेणे मात्र सगळीकडे अतिशय उत्तम झिलई असलेले आणि सगळे कोरीवकाम पूर्ण झालेले आहे. सम्राट अशोकाने त्याच्या राज्याभिषेक झाल्यावर 12 वर्षांनी या लेण्याचे दान दिले होते असे येथील लेखात म्हटले आहे. ‘लाजिनापियदसिना दुवाडस वसाभिसितेन इयं निगोह कुभादिना आजीविकेही’ (राजा प्रियदर्शी याच्या राज्याभिषेकानंतर 12 वर्षांनी हीन्यग्रोध नावाची गुहा आजीविकांना दान दिली आहे.) अशा प्रकारचे दान लेखलोमश ऋषी गुहा सोडली तर बाकी प्रत्येक गुहेत पाहायला मिळतात. इ.स. पूर्व तिसऱया शतकातील हे लेख ब्राह्मी लिपी आणि प्राकृत भाषेचा वापर करून लिहिले आहेत. प्राकृत ही एक भाषा नसून अनेक प्रादेशिक बोली भाषांच्या समूहाचे नाव आहे. सम्राट अशोकाचे लेख हे प्रादेशिक प्राकृत भाषांचा वापर करून लिहिले असल्याने त्या काळातील भारताच्या विविध भागांमध्ये कोणत्या प्रकारची प्राकृत भाषा बोलली जात होती हे त्यातून समजते. या काळातील प्रादेशिक बोलीभाषांचे ते अतिशय दुर्मिळ आणि अत्यंत महत्त्वाचे नमुने आहेत. असाच एक मागधी भाषेचा पुरावा आपल्याला या बाराबर आणि नागार्जुनी गुंफांमध्ये पाहायला मिळतो. या भाषेचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे ‘र’ चा ‘ल’ होणे. त्यामुळे ‘राजा’ या शब्दाऐवजी या लेखात ‘लाजा’ असा शब्दप्रयोग केलेला आहे. विश्वकर्मा हे लेणे अपूर्णावस्थेत आहे, पण तिथेही अशीच दोन दालने करायचा मानस होता हे लक्षात येते. मात्र इथे सम्राट अशोकाचा दानलेख पाहायला मिळतो.
नागार्जुनी टेकडीमधील शैलगृहांची रचना अशी दोन दालनांची नाही. तिथे गोपिका नावाच्या गुहेमध्ये गजपृष्ठाकार छत असलेले दंडगोलाकार लेणे आहे. या दोन्ही टेकडय़ांमधील सर्व शैलगृहांपैकी हे आकाराने सगळ्यात मोठे आहे. बाकीच्या दोन्ही शैलगृहांचा आकार आयताकृती आहे. अशोकाचा नातू दशरथ याने या तीनही गुंफा दान दिल्या आहेत. तसेच मौखरी वंशातील राजांचेही लेख येथील गुंफांमध्ये आहेत. येथील लेखांमध्ये दशरथ म्हणतो की, आचंद्र सूर्य या गुंफा ‘निषिधी’साठी आजीविक भिक्षूंना दान दिल्या आहेत. ही शैलगृहे वर्षावासासाठी जशी लेणी केली गेली, तशीच आहेत असेच आतापर्यंत सर्वमान्य मत होते, पण काही वर्षांपूर्वी कोलकाता विद्यापीठातील प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृती विभागातील प्राध्यापिका डॉ.सुष्मिता बासुमजुमदार आणि त्यांच्या सहकाऱयांनी या दोन्ही ठिकाणी असलेल्या शैलगृहांचा पुन्हा नव्याने अभ्यास केला तसेच या ठिकाणी असलेल्या सर्व शिलालेखांचा नव्याने विचार करून नवीन अर्थ लावायचा प्रयत्न केला. त्याची माहिती आपण पुढच्या लेखात पाहू.
(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे श्रीबालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या अध्ययन केंद्राच्या विभागप्रमुख आहेत)
Comments are closed.