दखल – मार्गदर्शक दीपस्तंभ
>> संजय नलावडे
एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील कार्यकर्तृत्वाचा आलेख अधोरेखित करणारे अनेक गौरवग्रंथ प्रकाशित होत असतात. हे गौरवग्रंथ एखाद्या मार्गदर्शक दीपस्तंभासारखे असतात. लोकसाहित्य आणि लोककलांचे ज्येष्ठ संशोधक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा ‘प्रकाशपर्व’ हा गौरवग्रंथ नुकताच विवेक प्रकाशन यांच्यातर्फे प्रकाशित झाला आहे. या गौरवग्रंथाचे वैशिष्टय़ म्हणजे मराठी लोकसहित्य, लोकसंस्कृती आणि लोककला क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांचे लेख या गौरवग्रंथात समाविष्ट करण्यात आले आहेत.
केवळ महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतभर आणि परदेशातही प्रकाश खांडगे यांनी लोकसाहित्य, लोककला, लोकसंस्कृती यांची पताका फडकती ठेवली आहे. हे कार्य आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील अधोरेखित झालेले आहे. त्यात डॉ. खांडगे हे संपूर्ण महाराष्ट्रात लोककलाक्षेत्रात कसे मार्गदर्शक आहेत याचे दर्शन यात आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आयोजित अनेक पथदर्शी योजनांमध्ये डॉ. खांडगे यांचा सिंहाचा वाटा आहे. या योजना तयार करताना त्यांनी बहुजन वर्गातील लोककलावंत डोळ्यासमोर ठेवला आणि त्याच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाला तसेच केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाला सहकार्य केले. लोकसाहित्य आणि संतसाहित्य यांचे गाढे संशोधक प्रा. अनिल सहस्रबुद्धे यांनीदेखील साक्षात गांधर्ववेद असे खांडगे यांचे लेखात वर्णन केले आहे. दिल्ली येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष प्रा. डॉ. तारा भवाळकर यांनी खांडगे यांचा गौरव करताना म्हटले आहे की, त्यांचा श्वास आणि ध्यास लोकसाहित्य, लोककला हा आहे.
मुंबई विद्यापीठांमध्ये लोककला अकादमीची स्थापना डॉ. भालचंद्र मुणगेकर या तत्कालीन कुलगुरूंच्या संकल्पनेतून झाली. या लोककला अकादमीची धुरा त्यांनी खांडगे यांच्याकडे सोपविली. लोककलेचा शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणारा हा केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील विद्यापीठ पातळीवरील पहिला विभाग होय. ‘लोककलेतील प्रकाशपर्व’ असे सार्थ शीर्षक डॉ. तारा भवाळकर यांनी त्यांच्या लेखाला दिले. पुढे डॉ. अरुणा ढेरे यांनी डॉ. खांडगे यांच्यावरील लेख लिहिताना ‘लोकऋषींच्या सावलीतील प्रकाश’ असे वर्णन करून डॉ. दुर्गाबाई आणि अण्णा म्हणजे डॉ. ढेरे सर तसेच जर्मन संशोधक डॉ. गुंथर सोन्थायमर यांचा सहवास आणि मार्गदर्शन खांडगे यांना कसे झाले त्याबद्दल विस्तृत माहिती अरुणा ढेरे यांनी दिली आहे. गोव्याचे लोकसाहित्य संशोधक डॉ. पांडुरंग फळसाई यांनी लेखात म्हटले आहे की, देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकसाहित्य लोककलेच्या क्षेत्रात खांडगे यांचे कार्य मोलाचे आहे.
मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादामीचे प्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे यांनी आपल्या लेखात म्हटले आहे, हा लोककलेचा खरा वाटसरू आहे. पत्रकारितेपासून ते प्राध्यापकीपर्यंत वेगवेगळ्या भूमिकेत त्यांनी लोककलांचा पथदर्शी धांडोळा घेतला आहे आणि लोककलावंतांचे नेतृत्वदेखील केले आहे. प्रा. डॉ. मंगेश बनसोड, सोपान खुडे प्रभाकर होवाळ, डॉ. सुनिता धर्माराव, डॉ. सत्यजित खांडगे, संजय नलावडे, हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज वाबळे, भारुडकार चंदाबाई तिवाडी, शाहीर सम्राट देवानंद माळी, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत पवार, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे, ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र वाबळे, शिवाजी साटम, डॉ. श्रीकला हट्टंगडी, डॉ. सुखदा खांडगे, तेजश्री सावंत, शैला खांडगे, डॉ. भावार्थ देखणे, डॉ. शिवाजी वाघमारे, अभिराम भडकमकर, विकास कोकाटे, संभाजी राजे जाधव अशा अनेक मान्यवरांचे लेख या गौरवग्रंथात असून गौरवग्रंथ केवळ स्तुतीपर लेखांचा संग्रह नसून त्याला संदर्भमूल्य प्राप्त झाले आहे.
दिव्यांचा उत्सव
संपादक ः रवींद्र गोळे
प्रकाशक: विवेक पब्लिकेशन्स
किंमत: ५०० रु.
Comments are closed.