साहित्य जगत – ओम नमोजी आदिया

>> रवीप्रकाश कुलकर्णी

आद्य देवतेचा मान गजाननाला असल्यामुळे कुठलाही शुभारंभ आपण प्रथम गजाननाला वंदन करूनच करतो. हे परंपरेने आलेले आहे आणि आजही ते टिकून आहे. ‘गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा’ असं म्हटलंय ते या अर्थाने. या गुणविशेषाचे  अत्युच्च दर्शन म्हणजे आपण  साजरा करत असलेला गणेशोत्सव! आरती म्हटलं की, त्याची सुरुवात ‘सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची’नेच होणार. ती लिहिली आहे स्वतला ‘दास रामाचा’ म्हणवून घेणाऱया समर्थ रामदासांनी.

ती एक कथाच. रामदास स्वामी पुरश्चरण करण्यासाठी देशभ्रमण करण्याला निघाले. अर्थात आपल्या देशाची काय स्थिती आहे हे जाणून घेण्याचा तो उद्देश होता. त्या परामेत ते भूस्वानंद भुवन म्हणजे मोरगावला आले. अर्थात मोरगावच्या गणपती मंदिरात त्याचे चरण वंदन करण्यासाठी गेले. नमस्कार करून प्रथेप्रमाणे त्यांनी ‘गणपती बाप्पा मोरया’ असा जयजयकार केला. आणि त्या गजाननाकडे कृपादृष्टी व्हावी म्हणून साश्रुनयनांनी बघितले. दृष्टादृष्ट होताच काय ते आश्चर्य! त्या मयुरेश्वराच्या ठिकाणी रामदासांना कोदंडधारी रामाचे दर्शन झाले. या अनुभूतीने स्फुरण येऊन त्यांच्या वाणीतून गजवंदना प्रकटली…

सुखकार्ता दुख्ता वर्ता विघ्नाची

नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची

सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची

कंठी झळके माळ मुक्ताफळाची

बघता बघता या आरतीने जनमानसात, हरिभक्त परायण मंडळींच्या मनामध्ये इतके घर केले की, कुठल्याही पूजेच्या वेळी सर्वात प्रथम ही आरती म्हटली जाऊ लागली.

ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या प्रारंभीच आद्य पूजेच्या मानकर्त्याचे स्तवन करताना म्हटले आहे…

ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपद्य

जय जय स्वासन्डीया, स्वत: ची सहनती

देव टुची गणेशु, स्थूल प्रकाश

म्हणे निवृत्ती दास, उत्साही अनुभव

गणेश हा भक्तांच्या भावाचा भुकेला आहे. त्याची कृपा झाली की, सगळ्या समस्या संपतात, मार्ग सापडतो. याची प्रचीती अनेकांना आली आहे आणि येत राहील.

एक नाटककार असाच कुंठीत होऊन बसले होते. नाटकाचे तीन अंक लिहून झाले होते, पण पुढे काय? हे सुचत नव्हते. मन भरकटले होते. करायचं काय? या विवंचनेत ते पाय नेतील तिकडे जाऊ लागले, पण मार्ग दिसत नव्हता. अशात फोर्टमधल्या दुकानात ते गेले. समोरच वेगवेगळ्या आकाराचे पेपरवेट्स ठेवले होते. त्या लेखकाला वाटलं, त्यातला एक पेपरवेट आपल्याला खुणावतो आहे. लेखकाला त्या पेपरवेटमध्ये गजाननाचं दर्शन झालं. कदाचित भासही  असेल.  त्याने तो पेपरवेट घेतला, घरी आला. तोच डेस्कवरचे कागद त्याला खुणावू लागले. सगळं झरझर लिहून काढलं.

हे नाटक म्हणजे ‘संगीत सौभद्र’ आणि नाटककार म्हणजे अर्थात अण्णासाहेब  किर्लोस्कर!

‘संगीत सौभद्र’ नाटक यशस्वी ठरले त्याचे सगळे श्रेय अण्णा साहेबांनी त्या पेपरवेटमधल्या गजाननाला दिले. त्यामुळे अख्खी नाटक कंपनी या गजाननाला भजू लागली. एवढेच नव्हे, तर या गणपतीचे नामकरण झाले ‘सौभद्र गणपती’!

गजाननाच्या प्रचीतीच्या अशा कितीतरी हकीकती सांगता येतील.  आता गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशभक्तीला आणि प्रदर्शनाला जणू उधाण येते. वृत्तपत्रांपासून साप्ताहिकं, मासिकं…अगदी वार्षिकांपर्यंत सगळं गणेशमय होऊन जातं. हे लिहीत असताना माझ्या समोर ‘सज्जनगड’ मासिक पत्रिका आहे. या मासिकाने 75 व्या वर्षात पदार्पण केले आहे. मासिक चालवणे किती कठीण झाले आहे हे आपण पाहतोच. अशा पार्श्वभूमीवर सज्जनगड पत्रिकेच्या संबंधित सर्व जणांना शुभेच्छा! एरवी समर्थ रामदास आणि रामभक्ती केंद्रित साहित्य या अंकात असते. या अमृत महोत्सवी वर्षारंभ अंकात नेहमीप्रमाणे रामदासांचे चित्र आहेच, पण मध्यभागी ठळकपणे सज्जनगडावरील मुख्य मंदिरातील गणेशमूर्तीचे चित्र आहे. तसेच अंकात आद्यशंकराचार्यविरचित ‘श्री गणपती तालम स्तोत्र’ (संस्कृत) आहे आणि त्याचा डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांनी केलेला मराठी भावानुवाद आहे. इथे तालाचे सौंदर्य उलगडून दाखवले असते तर आस्वादात अधिक भर पडली असती.

सर्व शास्त्रांचा मूलाधार असलेला गणपती विघ्नहर्ता आहेच. ‘विद्यामूर्ती धरा मनी’ लेखात  अपर्णा बेडेकर म्हणतात, “विघ्ने दूर होतात म्हणजे नक्की काय होते? प्रत्यक्ष येऊन कोणी सहाय्य  करतं की ती विघ्नंच घाबरून दूर  पळतात? थोडा विचार केल्यावर असं दिसून येतं की, या विघ्नविनायकाच्या कृपेमुळे जी ज्ञानदृष्टी प्राप्त होते त्यामुळे अज्ञानाचा अंधकार नाहीसा होतो. प्रकाशमय वाट दिसू लागते आणि मग त्या संकटाशी सामना करण्याचे सामर्थ्य निर्माण होतं. बळ निर्माण होतं. त्या आत्मविश्वासाच्या आधारे संकटाशी आपण सामना करू शकतो आणि मग त्याच्या आशीर्वादाने कार्य सिद्धीस जातं.”

Comments are closed.