नोंद – चिंतनाची साक्ष
>> रविप्रकाश कुलकर्णी
जागृत मन हे टीपकागदासारखं असतं. आजूबाजूच्या बऱ्या-वाईट घटनांसंदर्भात प्रतिक्रिया देत असतं. मग ते विचार कधी प्रकट होतात वेगवेगळ्या माध्यमांतून. सुहास वैद्य यांना ही दुर्मिळ देणगी लाभल्यामुळे त्यांनी त्यांच्या विविध घटनांवर त्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या लेखांमधून. अशा निवडक लेखांचा संग्रह ‘शोधू चिंतनाचे रंगी’ हा विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग, पुणे यांच्यातर्फे प्रकाशित झाला आहे. लेखक सुहास वैद्य वेगवेगळ्या घटना, गोष्टी पाहताना त्याचे वेगवेगळे पैलू, पोत पाहतात आणि वाचकांपुढे मांडतात. बाबा आमटे यांचे विचार ते मांडतात-
झोपले अजून माळ, तापवीत काया
अजून या नद्या, वाहतात वाया
अजून हे दुःख माणूस साहत आहे
आणि हा प्रचंड देश भीक मागत आहे…
हे सांगून वैद्य सांगतात, हा तो वेदनेकडून सहवेदनेकडे जाणारा प्रवास आहे. या प्रवासाचे आपण निव्वळ मूक साक्षीदार होऊन चालणार नाही. त्याच्यापुढे वैद्य एक गोष्ट सांगतात. नातू आजोबांना विचारतो, “असा पूर आलाच का?”
आजोबा सांगतात, “माणसाने झाडे तोडली, जंगले नष्ट केली, म्हणून असे झाले.”
नातू म्हणतो, “मग यासाठी काय करायचं?”
आजोबा म्हणतात, “खूप झाडे लावायची, पुन्हा जंगल करायचे.” नातवाच्या मनात हे पक्क बसलं. तो रोज एक रोप वेशीवर लावू लागला. नव्हे, रोप लावल्याविना तो जेवत नसे. या वेडातून त्याने एकटय़ाने ब्रह्मपुत्रा नदीतील माजुली बेटावर 1339 एकरांचं घनदाट जंगल उभं केलं. तेथे महाकाय हत्तीपासून बारीकशा कोळ्यापर्यंत सर्व प्रकारची जैवविविधता सापडते. त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार ‘फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया’ मिळाला तेव्हा कुठे आम्हाला तो माहीत झाला. हा अवलिया म्हणजे- जादव पायांग.
अलीकडच्या काळात निलाजरे राजकारण चाललं आहे. पण आपण सगळे हतबुद्ध होऊन पाहत आहोत. त्याला अनुसरून लेखक कवी दुष्यंतकुमारच्या ओळी उद्घृत करतो-
कोण म्हणतो, आकाशात छिद्र
होऊ शकत नाही
मनापासून दगड फेक मित्रा!…
पण म्हणूनच लेखक म्हणतो, प्रश्न इतकाच आहे की दगड उचलणार आणि तितक्याच ‘तबीयतने’ कोण फेकणार?
स्वतच्या चुकीने धरणात पडलेल्या एक लाख रुपयांचा मोबाईल मिळवण्यासाठी बंधाऱयातले 21 लाख लिटर पाणी वाहू देणारा इन्स्पेक्टर किंवा कुत्र्याला स्टेडियममध्ये फिरायचं होतं म्हणून आयएएस अधिकारी तिथल्या खेळाडूंना पोलिसांतर्फे हाकलून देतो, अशा बातम्या पाहून लेखक म्हणतो, या दोघा अधिकाऱयांवर काय कारवाई झाली? तर एकाची बदली करण्यात आली आणि दुसऱयाचं निलंबन करण्यात आलं. एकूण काय, आपल्या देशातील कुठलाही कायदा मुजोर अधिकाऱयांना किंवा नेत्यांना काहीही शिक्षा करू शकत नाही. अशा हकिकती वाचल्यावर वाचकाला पण काहीतरी सुचत जातं हे या संग्रहातील लेखांचे यश. म्हणूनच त्याचं महत्त्व.
Comments are closed.