परीक्षण- शेकडो जल प्रकल्पांचा किमयागार
>> श्रीकांत अंबरे
राज्य सरकारच्या जलसंपदा विभागात कार्यकारी अभियंता ते मुख्य अभियंता म्हणून गेली 30 वर्षे काम करत असताना आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर राज्यातील शेकडो जल प्रकल्प लीलया मार्गी लावणारे डॉ. विजय घोगरे यांची कामगिरी कुणालाही न विसरता येण्यासारखी आहे. पुणे जिह्यात इंदापूर तालुक्यातील बावडा या गावात शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या विजय घोगरे यांनी 1994 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. जलसंपदा विभागात कार्यकारी अभियंता या पदावर त्यांची नियुक्ती झाली. सतत शेती व पाणी यांची सांगड घालत पाटबंधारे, धरण प्रकल्प तसेच विविध योजनांद्वारे महाराष्ट्राला पाण्याच्या बाबतीत कसे सुजलाम सुफलाम करता येईल याचा खोलवर अभ्यास करून राज्यात शेकडो जल प्रकल्प स्वतःच्या नेतृत्वाखाली त्यांनी यशस्वी केले. महाराष्ट्रातील अनेक जिल्हे तसेच तालुक्यातील जलसंपदा विभागात त्यांच्या ज्या ज्या ठिकाणी बदल्या झाल्या, त्या त्या ठिकाणचे त्यांचे सहकारी, सहाय्यक अभियंते, जवळचे मित्र, कुटुंबीय, नातेवाईक तसेच समाजातील काही मान्यवरांनी त्यांच्या विषयीच्या आठवणी ‘विजयमुद्रा’ या चरित्रग्रंथात लिहिल्या आहेत.
हा केवळ त्यांच्यावरील औपचारिक गुणगौरवपर चरित्रग्रंथ नसून जलसंपदा खात्यात अनेक जलप्रकल्प साकार करताना अशक्य ते शक्य करणारी आणि आपल्या शांत, संयमी स्वभावाने इतरांची मने जिंकून घेणारी असामी म्हणून त्यांच्याकडे का पाहिले जाते याचे इंगित सांगणारा चरित्रग्रंथ आहे.
नीरा देवघर हे 13 टीएमसीचे धरण त्यांच्या कारकीर्दीमध्ये आशिया खंडातील सर्वात वेगाने पूर्ण झालेले धरण म्हणून, तर आशिया खंडातील सर्वात उंच लिफ्ट योजना कार्यान्वित करून जनतेला दिलासा देणारा प्रकल्प म्हणून उरमाडी धरण प्रकल्पाची नोंद आहे. धरणांची निर्मिती, नियोजन, कालवे व इतर आवश्यक बाबी निश्चित वेळेत करण्यासाठी घोगरे नेहमीच आघाडीवर असत. कोणत्याही धरणाला गळती लागली तर ती थांबविण्यासाठी आजही ‘घोगरे पॅटर्न’ राबविला जातो. तापी खोरे सिंचनाचा एक उत्कृष्ट आराखडा तयार करून अनेक मोठे, मध्यम, लघू प्रकल्प व उपसा जलसिंचन योजना त्यांनी मार्गी लावल्या. कृष्णा खोरे प्रकल्पावर कार्यकारी अभियंता म्हणून त्यांची विशेष छाप होती. अनेक अर्धवट प्रकल्पांची कामे तसेच धाराशिव, नांदेड, बीड, सातारा, जळगाव, अमरावती, पुणे, ठाणे, छत्रपती संभाजीनगर या जिह्यांतील तसेच राज्यात अनेक तालुक्यांतील शेकडो जलप्रकल्प त्यांनी पूर्णत्वास नेले.
जनतेपर्यंत पुरेशी न पोहोचलेली त्यांची कामगिरी या चरित्रग्रंथामुळे उजेडात येत आहे. ती भावी अभियंत्यांना निश्चित मार्गदर्शक ठरू शकेल. आपले अधिकारपद हे अधिकार गाजविण्यासाठी नसून जनतेच्या सेवेसाठी आहे याची त्यांच्या ठायी असलेली जाणीव संबंधितांच्या लेखनातून गडद होते.
या चरित्रग्रंथातील दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे मराठा सेवा संघाच्या माध्यमातून समाजातील गरजू लोक व विद्यार्थ्यांसाठी कुठेही गाजावाजा न करता ते करत असलेले मदतकार्य. दरवर्षी किल्ले शिवनेरीवर या संस्थेच्या माध्यमातून साजरा केला जाणारा शिवजन्मोत्सव सोहळा तसेच जिजाऊ शिवसृष्टी प्रकल्पाची वेगाने होणारी वाटचाल ही या संस्थेची वैशिष्टय़े आहेत. संस्थेच्या अनेक पदाधिकाऱयांनी या चरित्रग्रंथात घोगरे यांच्या संस्मरणीय आठवणी लिहिल्या आहेत.
विजयमुद्रा
(इंजि. डॉ. विजय घोगरे चरित्र गौरवग्रंथ)
संपादन ः गंगाधर बॅनब्युर
प्रकाशक मराठा सेवा असोसिएशन
पृष्ठे ः 400 एन किंमत: मासिक रु. 500 / –
Comments are closed.