सरखेल कान्होजीराव आंग्रे

मराठा आरमाराचा पाया छत्रपती शिवाजी महाराजांनी रचला. त्याचा कळस सरखेल कान्होजी राजे यांनी चढविला. सरखेल कान्होजी राजे आंग्रे हे ’समुद्रावरचा शिवाजी’ म्हणून ओळखले जात. आंग्रे कुळातील मातब्बर योद्धांनी कोकण किनारपट्टीवर स्वराज्याच्या आरमाराची कीर्ती पसरवली. त्यापैकी एक असलेले सरखेल कान्होजीराजे आंग्रे ज्यांनी इ.स.1729 पर्यंत स्वराज्याच्या आरमाराची धुरा सांभाळली. सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या स्मरणार्थ अलिबागमध्ये छत्री स्मारक उभारण्यात आले आहे. या एक एकर क्षेत्रफळात आंग्रे घराण्यातील स्त्राr पुरूषांची लहान- मोठी 22 स्मारके आहेत. यातील सर्वात जुने आणि मोठे स्मारक सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे आहे. तीन टप्प्यांमध्ये रचलेल्या स्मारकाचे बांधकाम काळ्या पाषाणातील असून स्मारक सुबक आणि सौंदर्यपूर्ण स्थापत्याने अलंकृत आहे.जमिनीलगत एक मीटर उंचीचे जोते आधुनिक असून त्यावरील दोन टप्पे प्राचीन आहेत. वर जाण्यासाठी पाच पायऱया आहेत. सर्वात वरच्या टप्प्यात अष्टकोनी भिंतीच्या आत मध्यभागी प्रतीकात्मकरित्या दोन पादुका व सुंदर कलाकुसर असलेले खांब आहेत. छत्रीबागेला राज्य पुरातत्त्व विभागाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. इसवी सन 2008 पासून सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह हे स्मारक जनतेसाठी खुले करण्यात आले आहे.

Comments are closed.