वाचककट्टा – वसा शुद्धलेखनाचा…

>> तृप्ती कुलकर्णी

[email protected]

वाचन संस्कृती जपणाऱ्या विविध साहित्यिक समूहांचा शोध घेणारे ‘वाचककट्टा’ सदर आजपासून सुरू करीत आहोत. वाचक आणि साहित्य यांच्यातलं नाते अधिक दृढ व्हावे, नव्या पिढीला प्रेरणा मिळावी आणि कार्यरत समूहांना व्यापक व्यासपीठ मिळावे ही यामागची भूमिका आहे. या सदरातून प्रत्येक समूहाची वाटचाल, त्यातील उपक्रम आणि समूहाचे साहित्य विश्वातील योगदान यांचा परिचय करून दिला जाईल.

साधारण दोन वर्षांपूर्वीचा प्रसंग! चित्रकलेवरचा लेख लिहीत होते. एका इंग्लिश व्याख्येचा मराठीत अनुवाद केला. शब्दांची निवड जपून केली तरी मनात शंका होती की, अर्थ नेमका पोहोचतोय का?

व्याख्या लिहिताना शब्द अचूक असणं निकडीचं असतं. साहजिकच तज्ञ मार्गदर्शनाची गरज भासते.

नेमकं कुणाला विचारावं… विचारात असतानाच व्हाट्सअॅपच्या शुद्धलेखन समूहाचं नोटिफिकेशन दिसलं. लेखन करताना फोन पाहायचा नाही, पण हा समूह त्याला अपवाद आहे, कारण इथे वायफळ काही घडत नाही. कुणी तरी शब्दाविषयी विचारलेली शंका पाहून वाटलं, ‘इथंच का विचारू नये?’

मी माझं वाक्य आणि मूळ इंग्लिश शब्द समूहात टाकला. चर्चा रंगली. व्युत्पत्ती, संदर्भ, पर्यायी शब्द असे कितीतरी दृष्टिकोन समोर आले नि अचूक आणि शुद्ध शब्द सापडला. शंकानिरसन तर झालंच, समूहशक्तीचा अनुभवही मिळाला. समूहात असल्यामुळं दिलासा मिळाला. इथं अनेक क्षेत्रांतले जाणकार असल्यानं विविध दृष्टिकोनातून शब्दाची पडताळणी झाली जी मला बरंच काही शिकवून गेली. आजतागायत मला नि माझ्यासारख्या कित्येक जिवांना समूहाचा उपयोग झालाय, होतोय.

1 नोव्हेंबर 2016 रोजी सुरू झालेला हा समूह मराठी शुद्धलेखनाविषयी जागरुकता आणि सातत्यपूर्ण सरावाची सवय निर्माण करण्यासाठी सातत्यानं कार्यरत आहे. कै. अरुण फडके यांच्या तळमळीतून या उपक्रमाची संकल्पना आकाराला आली. अरुण सरांनी त्यांच्या कार्यशाळेतल्या निवडक पाच विद्यार्थिनींना ई-मेलद्वारे वर्षभर मार्गदर्शन केलं. अभ्यास, सातत्य आणि सराव यांच्या बळावर भाषाविषयक गैरसमज दूर होऊ शकतात हा अनुभव त्यातून आला. मात्र ई-मेलपेक्षा सक्षम संवादाची गरज व्यापक आणि तत्काळ चर्चेसाठी भासत होती.

राज पासलकरांनी व्हॉट्सअॅप ‘समूहा’ची कल्पना सुचवली आणि ती सर्वांना पसंत पडली. समूहाच्या संचालनाची जबाबदारी उल्का पासलकर यांनी घेतली. शुद्धलेखनाविषयीची तळमळ, सातत्यपूर्ण अभ्यासाची आणि शंकानिरसनाची गरज या पायांवर उभा राहिलेला ‘समूह’ सुरुवातीला सहा सदस्यांपुरता मर्यादित असला तरी हळूहळू तो विस्तारत गेला.

25 लेखक, 22 संपादक, 17 प्रकाशक, 15 मुद्रितशोधक, 14 माध्यम संपादक, 21 माध्यम उपसंपादक आणि वार्ताहर, 3 मुद्रक, 1 ग्रंथपाल, 3 साहित्यिक सल्लागार, 26 शिक्षक, 12 अनुवादक आणि 47 वाचक समूहाचा भाग आहेत. यांपैकी काही जण भाषेचा सातत्यानं अभ्यास करून समूहात विचारल्या जाणाऱया शंकांचं निरसन करण्यात नेहमीच पुढे असतात. इतरही सदस्य जमेल तसे चर्चेत सहभागी होतात. मराठीबरोबर संस्कृत, हिंदी आणि इंग्लिश भाषाअभ्यासकही समूहात आहेत.

वर्तमानपत्रांतल्या किंवा पुस्तकांतल्या चुकांवरही इथं विचारमंथन होतं. कधीकधी चर्चा भरकटली तरी ती मूळ मुद्दय़ावर येतेही. एकूणच भाषिक प्रश्नांवर सखोल आणि तर्कशुद्ध संवाद हीच या समूहाची ओळख आहे. समूहाचा सकारात्मक परिणाम म्हणजे, शुद्धलेखनाच्या भीतीमुळं लेखन टाळणारे अनेक जण आता आत्मविश्वासानं मराठीत लिहू लागले आहेत.

‘शुद्धलेखन हा आग्रह न राहता ती सवय झाली पाहिजे’ हा वृषाली फडकेंचा विचार आणि ‘प्रत्येक गोष्ट शास्त्राrय कारणासकट हवी’ हा अरुण सरांचा ध्यास या भूमिकेतून उभा राहिलेला ‘मराठी शुद्धलेखन समूह’ त्यांचा वसा पुढे नेण्याचं काम काही अंशी करत आहे.

जे सतत दिसतं तेच बरोबर मानलं जातं, तर जे बरोबर आहे ते सतत, सगळीकडे दिसावं म्हणून प्रत्येक शब्द, प्रत्येक वेळी शुद्ध लिहिण्याचा निर्धार आवश्यक आहे. हा निर्धार कृतीत उतरवण्यासाठी तत्पर, गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनाची सुविधा देणारा ‘मराठी शुद्धलेखन समूह’ भाषाप्रेमींसाठी अमूल्य आहे.

7028170150 व्हॉट्सअॅप क्रमांकावर मेसेज करून कुणीही समूहात सहभागी होऊ शकतं.

Comments are closed.