नवलच! माही आणि लिम्पोपो

>> अरुण

पृथ्वीच्या रचनेचे आपल्या सोयीचे भाग म्हणजे उत्तर आणि दक्षिण गोलार्ध. त्याचा मध्य म्हणजे विषुववृत्त. मात्र पृथ्वीच्या साडेतेवीस अंशाच्या स्वतःच्याच अक्षाशी असलेल्या तिरपेपणामुळे किंवा कलण्याने विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंच्या अर्धगोलातील साडेतेवीस अक्षांशापर्यंतच सूर्य केव्हा तरी माथ्यावर येऊ शकतो. त्यापैकी उत्तर गोलातली साडेतेवीस अक्षांशाची मर्यादा म्हणजे कर्कवृत्त. ते हिंदुस्थानच्या मध्यातून जाते. दक्षिण गोलार्धातील साडेतेवीस अक्षांशांची सीमा आहे ते मकरवृत्त. हे झालं खगोलातलं गणित. पण भूगोलातली एक गंमत निराळीच. अर्थात तीसुद्धा नैसर्गिकच आहे. (कर्कवृत्तदर्शक कृत्रिम भिंत राजा सवाई जयसिंग यांनी बांधल्याचा उल्लेख आढळतो. ही भिंत छोटी आणि प्रतीकात्मक आहे.)

इथे विषय नवलाचा. भूगोलावर वाहणाऱ्या अनेक नद्या त्यांच्या अनेक वैशिष्टय़ांसह प्रसिद्ध आहेत. उत्तर आणि दक्षिण गोलार्धातली कर्क आणि मकरवृत्त दोन वेळा ओलांडणाऱ्या केवळ दोनच नद्या आहेत. त्यांची नावं माही आणि लिम्पोपो.

त्यापैकी माही ही हिंदुस्थानी नदी तर लिम्पोपो आफ्रिकन. यापैकी मध्य प्रदेशातील प्रसिद्ध मांडवगड (मांडू) या पर्यटनस्थळाजवळच धार जिल्हय़ात मिंडा गावापाशी उगम पावणारी माही नदी सुरुवातीला पश्चिम वाहिनी आहे, परंतु तिचा सुरुवातीचा प्रवास कर्कवृत्त ओलांडून राजस्थानच्या दिशेने होतो. तिथल्या वागड जिल्हय़ातून नंतर अचानक ‘यू’टर्न घेऊन ती गुजरातकडे येते आणि खंबायत आखातात पश्चिम सागराला मिळण्यापूर्वी पुन्हा एकदा कर्कवृत्त ओलांडते. माही नदी सुमारे 583 किलोमीटर वाहते. याच नदीवर बांधलेल्या बजाजसागर धरणाच्या पाण्यात 100 छोटी बेटं असल्याने बन्सवारा शहराला ‘100 बेटांचे शहर’ म्हणतात. माहीवरचं शेवटचं मोठं शहर बडोदे. या शहराच्या उत्तरेकडून ती पश्चिमेकडे जाते.

दुसरी नदी लिम्पोपो. ती मकरवृत्त दोनदा ओलांडते. 1750 किलोमीटर प्रवास असलेली ही नदी दक्षिण आफ्रिकेतील बोस्टबाना, झिंबाब्वे आणि मोझाब्लिक या देशांमधून वाहत अखेरीस हिंदी महासागराला मिळते. लिम्पोपो आफ्रिकेतली दुसऱ्या क्रमांकाची मोठी नदी आहे. ही नदी मरिको आणि क्रॉकडाइल (मकर-मगर) नद्यांच्या संगमातून जन्म घेते. लिम्पोपो नदीवरचे जगप्रसिद्ध शहर म्हणजे जोहान्सबर्ग. बोस्टवानातील गॅबोरोन शहरसुद्धा याच नदीकिनारी आहे.

अशा या नवलाईच्या दोनच नद्या पृथ्वीवरच्या दोन गोलार्धातील  कर्क आणि मकरवृत्तांना ओलांडतात. जगातील नद्यांच्या वैशिष्टय़ांमध्ये या गोष्टीची नोंद आहे. या जागतिक भौगोलिक वैशिष्टय़ांपैकी नद्यांच्या माहितीमध्ये ‘माही’ची नोंद होते.

Comments are closed.