परीक्षण – भावगीतांचा रंजक मागोवा
>> राहुल गोखले
मराठी भावगीतांचा इतिहास अतिशय समृद्ध आहेच; पण ती गीते आजही रसिकांच्या मनाचा ठाव घेतात ही त्यांची खरी ताकद आहे. याच भावगीतांमधील शब्द-सुरावटींकडे जेव्हा अधिक जाणकारीने पाहिले जाते, तेव्हा त्यांची मौज आणि गोडी अधिकच वाढते यात शंका नाही. अशा प्रकारचे लेखन सातत्याने करणारे मार्तंड औघडे यांनी ‘चांदणे शिंपीत जाशी’ या पुस्तकातून अवीट गोडीच्या सत्तावीस भावगीतांचे आस्वादक रसग्रहण केले आहे.
या पुस्तकात लेखकाने निवडलेल्या भावगीतांचा कालखंड विस्तृत आहे. शतकभरापूर्वी कवी ‘बी’ यांनी लिहिलेल्या ‘चाफा बोलेना’ या गीतापासून ते शांताराम नांदगावकर यांच्या लेखणीतून उतरलेल्या ‘रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना’ या गीतांपर्यंतची गीते यात समाविष्ट आहेत. मराठी भावगीतांची परंपरा किती समृद्ध आहे हे लेखक त्यातून अधोरेखित करतो. प्रत्येक गीतावर लिहिताना लेखकाने त्या गीताचे मर्म उलगडून दाखवलेच आहे, शिवाय त्या त्या गीताबद्दलची अनवट माहितीही अंतर्भूत केल्यामुळे पुस्तकाची खुमारी वाढली आहे. ‘शुक्रतारा मंद वारा’ या मंगेश पाडगावकरांच्या अलौकिक शब्दरचनेला श्रीनिवास खळे यांनी बांधलेली पहिली चाल संगीत संयोजक अनिल मोहिलेंना अतिशय आवडली होती; परंतु खळ्यांनी स्वतच नोटेशन्स फाडून टाकली आणि पुढे दहा नवीन चालींवर काम केले. ‘मी इतरांना फसवू शकतो, पण स्वतला कसे फसवणार? मनासारखी चाल होईपर्यंत मी असाच प्रयत्न करीत राहणार,’ हे खळ्यांचे उद्गार म्हणजे एखादे भावगीत अजरामर होण्यामागे साधना व सर्जनशीलता किती मोलाची असते यांचा प्रत्यय देणारे. ‘सखी मंद झाल्या तारका’ या गीतात कवी सुधीर मोघे यांनी तीन पिढ्यांच्या काळातील खोल वेदना काव्यातून मांडल्या आहेत, असे लेखक नमूद करतो. हे काव्य संगीतकार राम फाटक यांनी सत्तरच्या दशकात मोघे यांच्याकडून लिहून घेतले आणि प्रथमत पंडित भीमसेन जोशी यांच्याकडून ते आकाशवाणीसाठी गाऊन घेतले; परंतु कालांतराने ते सुधीर फडके यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाले. आज तेच रसिकांच्या परिचयाचे आहे, हा रंजक इतिहास लेखक समोर आणतो.
वा. रा. कांत यांचे शब्द, यशवंत देव यांचे संगीत आणि सुधीर फडके यांचा आवाज या त्रिवेणी संगमातून फुललेले ‘आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको’सारखी गीते शब्द, संगीत व गायकीचा सर्वोत्तम संगम असल्याचे लेखक म्हणतो. अजित कडकडे यांच्या आवाजातील ‘सजल नयन नित धार बरसती’ हे गीत केवळ पेटी आणि तबल्याच्या तालावर कसे खुलले आहे याकडे लक्ष वेधत लेखक संगीतकार अशोक पत्की यांच्या प्रयोगशीलतेची महती सांगतो. ‘जेव्हा तुझ्या बटांना’ या गीतात वाऱयाला ‘मुजोर’ हे रांगडे विशेषण वापरून पाडगावकरांनी बहार उडवून दिली आणि विद्युत गिटारच्या झंकाराने हे गीत कसे सुरेल नटले याचा उल्लेख लेखक करतो.
हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलेले आणि भा. रा. तांबे यांनी लिहिलेले ‘तिन्ही सांजा सखे मिळाल्या’ या गीताला लता मंगेशकर यांच्या आवाजाची लाभलेली साथ म्हणजे एक अपूर्व संगम आहे, असे लेखक नमूद करतो; तर कवी ’बी’ यांच्या ‘चाफा बोलेना’ या कवितेच्या बारा कडव्यांपैकी केवळ चार कडव्यांची बेमालूम सांगड घालत, वसंत प्रभू यांनी गीताच्या मूळ आशयाला कुठलीही बाधा न पोचवता ते संगीताने कसे सजवले आहे याची रंजक माहिती लेखक देतो.
‘लाजून हासणे’, ‘केतकीच्या बनी तिथे’, ‘केंव्हा तरी पहाटे’, ‘दिवस तुझे हे फुलायचे’, ‘सप्तपदी ही रोज चालते’, ‘प्रेमस्वरूप आई’, ‘हृदयी जागा तू अनुरागा’ इत्यादी लोकप्रिय भावगीतांचा रंजक वेध घेत लेखक भावगीतांच्या समृद्ध दालनाची सफर वाचकांना घडवून आणतो. प्रेमापासून व्याकुळतेपर्यंत आणि आर्ततेपासून जिव्हाळ्यापर्यंत अनेक भावछटा या गीतांतून प्रगट होतात; मात्र त्यासाठी शब्द, संगीत आणि आवाज यांचा त्रिवेणी संगम जुळून यावा लागतो हे मर्म लेखक उलगडून दाखवितो.
परिचित भावगीतांकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्यास हे पुस्तक वाचकांना उद्युक्त करतेच; पण मराठी भावगीतांची ‘अजरामरता’ नेमकी कशात आहे याची जाणीव करून देणारे हे पुस्तक होय. अविनाश कुंभार यांनी तयार केलेले मुखपृष्ठ वेधक.
चांदणे शिंपीत जाशी
लेखक : मार्तंड औघडे
प्रकाशक ः नवचैतन्य प्रकाशन, मुंबई
पृष्ठे ः 144; n मूल्य ः रुपये 250
Comments are closed.