पुण्यातील टोळीयुद्ध घरापर्यंत पोहोचलेय, गृहकलहानंतर टोळीकलहाने सुरू झाले खुनाचे सत्र
नवनाथ शिंदे, पुणे
गुन्हेगारी टोळ्यांमध्ये कुटुंबीयांना ओढायचे नाही, असा अलिखित नियम आहे. मग वाद कोणताही असो, त्यासाठी एकमेकांमध्ये भिडायचे अन् शेवट करायचा. मात्र, पुण्यात गुन्हेगारीचा वाद थेट घराच्याच उंबऱ्यावर पोहोचल्याने खळबळ उडाली आहे. तब्बल 40 हून अधिक वर्षे गुन्हेगारीत नाव असलेल्या कुख्यात बंडू आंदेकर याने मुलाच्या हत्येचा बदला थेट नातवाच्या खुनाने घेतला. त्याने केलेल्या नातवाच्या हत्येमुळे अनेकांमध्ये संतापाची लाट आहे
गृहकलहातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज बंडू आंदेकर (वय 42, रा. नाना पेठ) याची 1 सप्टेंबर 2024 रोजी टोळीने गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या केली होती. पोलीस तपासात वनराजच्या सख्ख्या बहिणीसह दाजीने त्याचा खून केल्याचे उघडकीस आले. तेव्हापासून बंडूच्या मनात बदल्याची आग होती. वनराजवर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी त्याच्या टोळीने ‘आम्ही वर्षभरात खुनाचा बदला घेऊ,’ अशी शपथ घेतल्याची चर्चा आहे. त्यानंतर आंदेकर टोळीने वनराजच्या खुनातील आरोपी एकेकाळचा बंडूचा उजवा हात समजला जाणारा सोमनाथ गायकवाड याचे कुटुंबीय राहत असलेल्या आंबेगाव पठार परिसराची रेकी केली. सोमनाथच्या बायको-मुलाची रेकी करण्यासाठी ऑगस्ट 2025 मध्ये आंदेकर टोळीने परिसरात भाड्याने खोली घेतली होती. मात्र, काही दिवसांतच भारती विद्यापीठ पोलिसांना आरोपीची माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपी काळे याला पकडल्याने कट उधळला.
वनराजच्या हत्येला 1 सप्टेंबर 2025 रोजी एक वर्ष पूर्ण झाले. आंदेकर टोळीचा डाव उधळून लावल्यानंतर चवताळलेल्या आंदेकर टोळीने थेट नातवालाच ‘टार्गेट’ केले. हल्ल्याआधी दोन दिवस परिसरातील रेकी करीत वनराजच्या खुनातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर (वय 19) याचा गेम करण्यासाठी टोळीने फिल्डिंग लावली. लहान भावाला क्लासवरून दुचाकीवर घरी घेऊन आलेल्या आयुषला दोन हल्लेखोरांनी हेरले. इमारतीच्या पार्किंगमध्ये दुचाकी उभी करीत असताना आरोपी यश पाटील आणि अमन पठाण यांनी गोळ्यांचा वर्षाव केला. तब्बल 12 राऊंड फायर केले. त्यानंतर दोघेही दुचाकीवर बसून पसार झाले.
हल्लेखोर दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट-2ने ताब्यात घेत अटक केली, तर ट्रॅव्हल्सने कुटुंबीयांसह प्रवास करणाऱ्या आंदेकर टोळीला खंडणीविरोधी पथकाने बुलढाण्यातून अटक केली आहे. यश सिद्धेश्वर पाटील, अमित प्रकाश पाटोळे, अमन युसूफ पठाण, सुजल राहुल मेरगू, सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर, स्वराज नीलंजय वाडेकर, तुषार नीलंजय वाडेकर, वृंदावनी नीलंजय वाडेकर यांच्यासह आणखी पाचजणांविरुद्ध ‘मोक्का’ कारवाई केली आहे. दरम्यान, कुख्यात बंडू आंदेकर टोळीविरुद्ध विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. मुलगा वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याने महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या आपल्याच नातवावर गोळीबार करून खून घडवून आणला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने आतापर्यंत आठजणांना अटक केली आहे.
आरोपी सोमनाथ गायकवाड आंदेकर टोळीतच काम करीत होता. मात्र, पत्त्याच्या क्लबमधून मिळालेल्या पैशांच्या वादातून त्यांच्यात मतभेद झाले. त्यानंतर त्याने स्वतःची टोळी तयार केली. ऑक्टोबर 2023 मध्ये आंदेकर टोळीने सोमनाथचा मित्र निखिल आखाडे याचा खून केला. त्याचा राग त्याच्या मनात होता. त्यातच अदिकरचा जावई गणेश कोमकर आणि आंदेकर कुटुंबीयांत मालमत्तेचा वाद सुरू
होता. आंदेकर कुटुंबीयांना घडा शिकविण्यासाठी कोमकर तयारीत होता. त्यासाठी त्याने ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या सूत्राने सोम्या गायकवाडशी जवळीक केली. त्यासाठी प्रसाद बेल्हेकरची मदत घेतली. बेल्हेकरलाही आंदेकर टोळीबाबत राग होता. बेल्हेकरने सोम्या आणि गणेश कोमकरची भेट घडवून आणली. त्यानंतर त्यांनी वनराजच्या खुनाचा कट रचला.
वर्षानुवर्षे होती आंदेकर टोळीची दहशत
शहराच्या मध्यभागात आंदेकर टोळीची दहशत होती. सूर्यकांत ऊर्फ बंडू अण्णा आंदेकर टोळीचा म्होरक्या आहे. खून, खुनाचा प्रयत्न, हाणामारी, दहशत माजविणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, 1980 च्या दशकात प्रमोद माळवदकर आणि साथीदारांनी बाळू आंदेकर याचा शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात खून केल्यानंतर पुण्यात टोळीयुद्ध भडकले होते. टोळीयुद्धातून पाचजणांचे खून झाले होते. त्यानंतर आंदेकर टोळीने मध्यभागात दहशत निर्माण केली. नाना पेठेत वर्चस्वाच्या वादातून विजय निंबाळकर याचा खून केला होता.
Comments are closed.