सेनापती महादजी शिंदे यांचे समाधीस्थळ – `शिंदे छत्री’ स्मारक
18 व्या शतकातील परामी मराठा सरदार महादजी शिंदे (1730-1794) हे उत्तर भारतातील मराठा सत्तेचे मुत्सद्दी सेनापती होते. 1761 च्या पानिपतच्या पराभवानंतर त्यांनी अत्यंत चिकाटीने मराठा साम्राज्याची पत व उत्तर हिंदुस्थानावरील वर्चस्व पुन्हा प्रस्थापित केले. युरोपियन धर्तीवर त्यांनी सेनेची बांधणी करून त्या आधारे इंग्रज, रोहिले, जाट आणि राजपूत या सत्तांचा पराभव केला. मुघल सत्तेवर मराठय़ांचे नियंत्रण निर्माण करीत त्यांनी शिंदे घराण्याचे सामर्थ्य वाढवले. त्यांचे 12 फेब्रुवारी 1794 रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ वानवडी, पुणे येथे शिंदे छत्री हे स्मारक उभारले आहे. महादजी शिंदे यांनी 1794 मध्ये येथे महादेवाचे मंदिर बांधले होते. त्यांच्या मृत्यूनंतर या मंदिरासमोरच त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. हे स्मारक राजस्थानच्या शैलीतील असून, त्यावर युरोपियन (इंग्रजी) शैलीचा प्रभावही दिसतो. यात रंगीत काचा, कोरीव काम आणि महादजींची तैलचित्रे आहेत. हे ठिकाण मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचे ‘वारसा स्थळ’ मानले जाते. हे पुणे शहरातील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असून, `सिंधिया देवस्थान ट्रस्ट’ अंतर्गत याची काळजी घेतली जाते.
Comments are closed.