स्मृतिगंध – एका युगाचा अस्त

>> डॉ. कुमार सप्तर्षी

[email protected]

महाराष्ट्रातील समाजवादी चळवळीचे महत्त्वाचे आधारस्तंभ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे नुकतेच निधन झाले. असंघटित क्षेत्रातील लाखो कामगारांना संघटित करून त्यांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारा हा नेता. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक दुर्मीळ समाजपुरुष गमावला आहे.

भारतात श्रमिकांच्या चळवळीला दीर्घ परंपरा आहे. कामगार संघटना या ाढांतीच्या माध्यम आहेत, असे कम्युनिस्ट व समाजवादी मानत. ज्याच्याकडे कामगार संघटना नाही, तो ाढांतिकारक असूच शकत नाही, असे समीकरण होते. दुर्दैवाने संघटित कामगारांमार्फत देशात लोकशाहीची किंवा समाजवादी ाढांती आली नाही. एवढेच नव्हे तर आणीबाणीच्या काळात हा संघटित कामगार वर्ग आवाज उठविण्यास कमी पडला. या पार्श्वभूमीवर डॉ. बाबा आढाव यांचे कार्य महत्त्वाचे असल्याचे जाणवते.

बाबा आढाव यांनी उद्योग जगतात कामगार संघटना बांधण्याचा विचारही मनात घेतला नाही. एके काळी कामगार संघटनाच आपल्या वर्गणीतून डावे पक्ष चालवत. अधिक अवघड क्षेत्राला बाबांनी हात घातला. असंघटित कामगारांची दु:खे दूर करणे हे त्यांनी लक्ष्य ठरविले. वयाच्या पंचविशीत त्यांनी `हमाल पंचायत, पुणे’ या श्रमिक संघटनेची स्थापना केली. वयाच्या विशीत `झोपडी संघा’ची स्थापना केली. वयाच्या तेविसाव्या वर्षी `महाराष्ट्र राज्य धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी’ यांची संघटना बांधायला इतरांबरोबर सुरुवात केली. या चळवळीतून `आधी पुनर्वसन, मग धरण’ ही घोषणा निर्माण झाली. 1971 मध्ये `महात्मा फुले समता प्रतिष्ठान’ची स्थापना केली. त्या संस्थेमार्फत त्यांनी महात्मा फुले यांच्या विचारधारेला महाराष्ट्रात नव्याने व ठळक रूपाने पुढे आणले.1972 मध्ये बाबा आढावांनी महाराष्ट्रात `एक गाव, एक पाणवठा’ ही चळवळ सुरू केली. अस्पृश्यता कायद्याने संपली होती; पण ती गावगाडय़ात शिल्लक होती, असा तो काळ. अस्पृश्यांच्या विहिरी वेगळ्या असत. जेथे अन्य गावकरी पाणी भरत, त्या पाणवठय़ाला शिवण्याची अस्पृश्य वर्गाला गावाची परवानगी नव्हती. एक गाव, एक पाणवठा या चळवळीने समाजमनातील किल्मिष दूर केले.

1974 साली देवदासी प्रथेचे निर्मूलन आणि त्यांचे पुनर्वसन या चळवळीशी त्यांनी स्वत:ला जोडून घेतले. `अंधश्रध्दा निर्मूलन समिती’चे ते मार्गदर्शक होते. पुढे त्यांनी रिक्षा चालकांना संघटित केले. त्यांच्या संघटनेत सामील झालेल्या रिक्षा चालकांची संख्या 50 हजारांच्या आसपास होती. कचऱयातून काच-पत्रा वगैरे वस्तू गोळा करणाऱया असंघटित कामगारांची त्यांनी संघटना बांधली. या सगळ्यांचा एकच अर्थ होता, संघटित कामगार क्षेत्रात संघटनेचे संरक्षण मिळायचे. बाबांचे लक्ष मात्र ज्या कष्टकऱयांना कोणी वाली नाही तिकडे जायचे.

ज्या क्षेत्रात कोणी वाली नाही, तिथे बाबा प्रवेश करीत. नाना पेठेत दवाखाना सुरू केल्यानंतर हमाली काम करणारे रुग्ण बाबांना भेटत. म्हणून बाबा हमालांना संघटित करण्याकडे वळले. हमाल पंचायत पुढे खूप वाढली, संख्येने आणि प्रभावाने! पुणे शहरात काँग्रेसवाल्यांना या संघटनेचे अस्तित्व डोळ्यात खुपू लागले. त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना `इंटक’ या काँग्रेसच्या संघटनेने स्वतंत्र हमाल पंचायत काढावी, अशी विनंती केली. तेव्हा वसंतदादा भडकले. ते म्हणाले, `बाबा आढाव तळागाळातल्या लोकांशी समरस होतो. तुम्हाला ते जमणार नाही. तुम्ही समांतर `हमाल पंचायत’ काढली तर बाबा आढाव यांना संपविण्याकरता काढाल. हे पाप होईल.’

महाराष्ट्रातील समाजवादी चळवळीचा इतिहास पाहता एस. एम. जोशी व नानासाहेब गोरे हे मूळचे काँग्रेस समाजवादी पक्षाचे. त्यांनी समाजवादी चळवळीची धुरा बापू काळदाते, पन्नालाल सुराणा, भाई वैद्य, बाबा आढाव या पिढीकडे सोपविली. पण त्यांच्याकडून धाकटय़ाकडे वारसा जाणे शक्य झाले नाही. कारण त्यांच्यासोबत त्यांच्यापेक्षा धाकटे कोणी राहिले नाहीत. याचा अर्थ, 1934 सालची समाजवादी मांडणी आज पूर्णपणे संपुष्टात आली. शेवटचे बुरूज पन्नालाल सुराणा व बाबा आढाव होते. तेही आता ढासळले. त्यामुळे यापुढे धाकटय़ा समाजवादी विचाराच्या लोकांना पुढील वाटचालीसाठी व्यापक चिंतन करून पुढचा मार्ग शोधावा लागेल. डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाचा इतका व्यापक अर्थ आहे. एका युगाचा अस्त झाला आहे.

कार्ल मार्क्स आणि महात्मा गांधी या दोन्ही महापुरुषांच्या संगतीत बाबा कधी रमले नाहीत. त्यांनी महात्मा फुले यांच्या विचारसरणीचा आधार घेतला. कोणत्याही सभेत वा बैठकीत बाबा भाषणापूर्वी महात्मा फुले यांच्या `अखंडां’चे गायन करीत. महात्मा फुले यांची नजर त्यांनी घेतली होती. त्या नजरेतून ते कोणत्याही प्रश्नाकडे पाहत. महात्मा फुले यांचे भव्य स्मारक करावे, हे त्यांचे स्वप्न होते. ते जवळपास पूर्ण होत आले आहे. फुले वाडा हे जणू त्यांचे घर होते.

(लेखक `पांद’चे संस्थापक तसेच महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष आहेत.)

Comments are closed.