परीक्षण- अर्जुनाच्या कल्लोळाचा ठाव
>>तन्वी राऊत
कुरुक्षेत्रावरील महायुद्धात पांडवांनी कौरवांवर मिळवलेला विजय म्हणजे धर्माने अधर्मावर मिळवलेला विजय होता, हा सत्याचा असत्यावर झालेला विजय होता. तृतीय कौंतेय आणि कुरुवंशातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुन आणि त्याचा मित्र, मार्गदर्शक आणि सारथी कृष्ण या नर-नारायणाच्या जोडीचा या विजयात मोलाचा वाटा होता. परंतु महायुद्धातील सर्वश्रेष्ठ योध्दा होणं अर्जुनासाठी निश्चितच सोपं नव्हतं. आपल्या जीवनप्रवासात अर्जुनाला स्वतच्या भावनांवर नियंत्रण ठेवत अनेक कठोर निर्णय घ्यावे लागले, प्रसंगी वाईटपणाही स्वतकडे घ्यावा लागला. नियतीने अर्जुनाला रक्ताच्या नातेवाईकांविरुद्ध उभं केलं, ज्या गुरूंनी त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवलं त्या द्रोणाचार्यांच्या विरोधात त्याला लढायला भाग पाडलं, तर महायुद्धात स्वतच्या मुलाचा मृत्यू पाहण्याचं दुर्दैव त्याच्या भाळी लिहिलं. आयुष्यातल्या अशा प्रसंगांमुळे पराक्रमी आणि महत्त्वाकांक्षी अर्जुनाच्या संवेदनशील मनात निर्माण झालेल्या आंदोलनांचा आणि कल्लोळाचा ठाव ‘वीर योध्दा अर्जुन’ या कादंबरीत लेखक प्रणव सखदेव यांनी घेतला आहे.
या कादंबरीची सुरुवात श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या आयुष्यांच्या अखेरच्या क्षणीच्या संवादांतून होते. कुरुक्षेत्रावरील विजयानंतर तीन तपं राज्य करूनही युद्धातील संहाराचे, युद्धात स्वतचे पुत्र, बंधू आणि आप्तस्वकीय गमावल्याचे घाव अर्जुनाच्या मनावर कायमचे कोरले गेले. जीवनाच्या अंतिम समयी त्याबद्दलच्या विचारांनी व्यथित आणि खिन्न मनोवस्थेतल्या अर्जुनाला मृत्यू हे अंतिम सत्य असल्याची जाणीव श्रीकृष्ण करून देतो. प्राक्तन आणि विधिलिखिताचे अर्थ त्याला समजावतो. अर्जुनाच्या या मनोवस्थेची कारणं कादंबरीत पुढे येणाऱया तीन पर्वांतील घटनांतून नाटय़मय पद्धतीने लेखकाने वाचकांसमोर उलगडली आहेत. अर्जुनाला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेल्या या कादंबरीची कथा श्रीकृष्ण, कुंती, भीष्म, कर्ण, द्रोणाचार्य, युधिष्ठिर, दुर्योधन, द्रौपदी, एकलव्य, बृहन्नडा, अर्जुन आणि महाभारतातील इतर व्यक्तिरेखांच्या स्वगतांतून पुढे सरकते. या कादंबरीतील तीन पर्वांपैकी पहिल्या पर्वात वाचकांना अर्जुनाची ओळख एक आदर्श पुत्र, आज्ञाधारक शिष्य, प्रेमळ पती आणि सखा, त्याचबरोबर सर्वश्रेष्ठ धनुर्धर होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारा तरुण योध्दा म्हणून होते. कादंबरीच्या दुसऱया पर्वातील प्रसंगांतून अर्जुनाच्या महत्त्वाकांक्षी आणि पराक्रमी वृत्तीचं दर्शन वाचकाला घडते. उर्वशीच्या प्रेमाला नम्रपणे नकार दिल्यामुळे आणि तिला मातेसमान मानल्यामुळे बृहन्नडा होण्याचा शाप भोगणारा अर्जुन आहे, त्याचबरोबर द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगाने अस्वस्थ झालेला अर्जुन आहे. या सर्व प्रसंगांतून अर्जुनाच्या स्वभावाची महत्त्वाकांक्षी, पराक्रमी आणि तितकीच विवेकी आणि संवेदनशील बाजू वाचकाला समजते. तर तिसऱया आणि शेवटच्या पर्वात अर्जुनाच्या स्वभावाची एक निराळी बाजू वाचकाला उमजते. कुरुक्षेत्रावरच्या युद्धातल्या संहाराने अंतर्बाह्य बदललेला, युद्धात विजय मिळवूनही पश्चात्ताप आणि वास्तवाच्या दर्शनाने व्यथित झालेला अर्जुन!
अर्जुनाच्या जीवनप्रवासातील निरनिराळ्या टप्प्यांवरच्या त्याच्या मनातल्या आंतरिक उलथापालथी अधोरेखित करणारी या कादंबरीची कथा वाचकाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करून जाते. विधिलिखित किंवा प्राक्तन पांडवांना आणि भगवान श्रीकृष्णालाही चुकले नाहीत. पांडवांसमोर उभ्या ठाकलेल्या बऱयावाईट प्रसंगांना, आव्हानांना सामोरं जाताना त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांच्या आयुष्यात असलेली माणसं आणि स्वीकारलेल्या मार्गांनुसार त्यांचं प्राक्तन घडत गेलं. म्हणजेच त्यांची निवड आणि निर्णय हे त्यांचं विधिलिखित किंवा प्राक्तन घडवण्यासाठी कारणीभूत होते याची जाणीव ही कादंबरी वाचताना प्रकर्षाने होते. मनातील काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर आणि मद या षड्रिपुंवर संयम ठेवून हे महायुद्ध, हा संहार टाळता आला असता का? हा प्रश्न अशावेळी वाचकांच्या मनात आल्याशिवाय राहात नाही. युद्धातला संहार, रक्तपात मानवी संवेदना झाकोळून टाकतो. कुरुक्षेत्रावरच्या महायुद्धात विजय मिळवूनही त्यातल्या संहाराच्या स्मृतींच्या ओझ्याखाली दबलेला आणि पश्चात्ताप, निराशा आणि दुःखाने व्यथित अर्जुनही त्याचंच उदाहरण! आज एकविसाव्या शतकातही आजूबाजूला अस्वस्थ करणारी युद्धजन्य परिस्थिती असताना सामान्य माणसाची अवस्थाही अर्जुनापेक्षा निराळी नाही. अशा वेळी ‘वीर योध्दा अर्जुन’ या कादंबरीतील अर्जुनाचा जीवनप्रवास वाचकाला मनातल्या षड्रिपुंवर अंकुश ठेवून आयुष्यातले निर्णय डोळसपणे घेण्यासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल.
Comments are closed.