संस्कृतायन- मैत्रीची सप्तपदी

>> डॉ. समीरा गुजरजोशी

संस्कृत साहित्यात ‘उमा-बटू संवाद’ या नावाने प्रसिद्ध असलेला ‘कुमारसंभव’मधील हा संवाद. पार्वतीची श्रद्धा, निष्ठा तपासून पाहताना भगवान शंकर मैत्रीचा हात पुढे करतात. ही मैत्री कशी तर सप्तपदीच्या वचनांसारखी, असा सुंदर अर्थबोध यातून कालिदासांनी केला आहे.

आपण मागील लेखात पार्वती आणि बटूवेशातील भगवान शंकर यांची भेट झाली हे पाहिले. आज त्यांच्यात प्रत्यक्ष घडलेला जो संवाद तो पाहू या. संस्कृत साहित्यात हा संवाद ‘उमा-बटू संवाद’ या नावाने प्रसिद्ध आहे. “तू शरीराची काळजी घेऊनच तप करतेस ना? कारण शरीर हे आद्य धर्म साधन आहे,’’ हे सांगून या संवादाला सुरुवात तर झाली. आता भगवान शंकरांना तर तिची परीक्षा घ्यायची आहे. तिची निष्ठा, श्रद्धा तपासून पाहायची आहे. त्यामुळे ते साहजिक तिच्याशी सलगी करू पाहत आहेत. आता स्त्राrच्या सौंदर्याचे वर्णन केले की, ती प्रसन्न होणार हे नक्की, पण तापसी असणाऱया पार्वतीच्या सौंदर्याची स्तुती कशी करायची. मग हरिणं सुखात आहेत ना? अगदी निर्धास्तपणे तुझ्या हातून गवत खातात. तुझ्यासारखीच चंचल नजर आहे त्यांची, असे हळूहळू तिची स्तुती करणे सुरू होते. मग बटू म्हणतो, “सुंदर रूप असणारी माणसे आचरणानेसुद्धा सुंदर असतात हे तुझ्याकडे बघून पटावे. हा हिमालयाचा परिसर जसा सप्तर्षींमुळे आणि गंगेच्या प्रवाहाने पवित्र ठरला आहे, तसाच तुझ्यामुळेही.’’ अर्थात नुसती सौंदर्याची स्तुती पार्वतीला जिंकून घेऊ शकणार नाही हे जाणूनच बटू पुढे म्हणतो, “तिन्ही पुरुषार्थांमध्ये धर्म विशेष आहे हे आता माझ्या लक्षात येते आहे. कारण तू काम आणि अर्थ यांच्याकडे पाठ फिरवून धर्माचाच ध्यास घेतला आहेस…’’ आणि यानंतर एक फार सुंदर श्लोक येतो.

तुम्ही स्वतः वापरलेल्या विशेष व्याधी म्हणून मला प्रतिसाद देऊ नका.

कारण सत्पुरुषांचा सहवास ऋषीमुनींच्या सात दिवसांशी जोडलेला असतो.

मैत्री ‘सप्तपदी’ असते ही किती सुंदर कल्पना आहे. लग्नातील सप्तपदीचीसुद्धा यानिमित्ताने आठवण होते. आपलाही अनुभव असतो की अनेकदा मैत्री अशी पटकन होते. पहिल्या काही क्षणांत आपल्याला कळते की, आपले आणि या व्यक्तीचे सूर जुळणार की नाही. बटू तिला हेच सुचवतो आहे की, मला तरी वाटते आपली मैत्री नक्की होणार आणि त्याच मैत्रीचा आधार घेऊन मी तुला काही विचारले तर तुला राग तर येणार नाही ना? तुला जर योग्य वाटत असेल तर माझ्या प्रश्नांची उत्तर दे. तुझी इच्छा नसेल तर राहू दे.

संवाद कसा असावा याचे हे उत्तम उदाहरण आहे. पार्वतीकडून गुपित काढून तर घ्यायचं आहे, पण हे तिच्या अनुमतीने घडावे यासाठी किती छान भूमिका कालिदासाने तयार केली आहे.

आता बटू म्हणतो, “इतक्या उत्तम कुळात तुला जन्म लाभला आहे. असे अलौकिक सौंदर्य मिळाले आहे. तरुण वय आहे, धनसंपत्ती सर्व हाताशी आहे,  असे असताना  खडतर तप करून तुला काय बरं साध्य करायचं आहे?  तुला अगदी स्वर्ग जरी हवा असेल आणि त्यासाठी तू तप करत असशील, तर तुझे प्रयत्न व्यर्थच म्हटले पाहिजे. कारण तुझ्या पित्याची ही भूमी साक्षात देवभूमीच आहे आणि हो तू जर पतीसाठी हे तप करत असशील, तर मी काय बोलू? ‘न रत्नमन्विष्यति मृग्यते हि तत्।’ तुझ्यासारखे रत्न संपादन करण्यासाठी इतरांनी परिश्रम करायला हवेत. एखादा रत्नपारखीच रत्नाच्या शोधात येतो. रत्न काही त्याला शोधायला हिंडत नाही.’’

तुमच्या लक्षात आलं असेल की, अजूनही पार्वतीने काही उत्तर दिले नाही. तेव्हा तिला बोलते करण्याची जबाबदारी ओळखून बटू तिला आयुष्य दाखवतो की, तुला वश होत नाही असा कोण तो? मला तर फार कुतूहल वाटते आहे, पण तू काळजी करू नकोस. माझ्याकडेही माझे तपसंचित आहे. तुला तुझ्या मनाजोगता पती मिळावा म्हणून मी माझे तपही तुला देईन.

आता मात्र पार्वतीला बोलण्याचा मोह झाला, पण तितकीच लज्जाही वाटत होती. आपले प्रेम कोणावर आहे हे एखादी युवती स्वतच्या मुखाने कसे सांगेल म्हणून तिने आपल्या सखीकडे पाहून तिला खूण केली. आता या संवादात अतिशय मनोरंजक असा टप्पा येणार आहे. आपण पती म्हणून भगवान शंकरांची कामना करतो आहोत हे पार्वती सांगणार आणि ऐकणारा बटू हे स्वत भगवान शंकर आहेत हे मात्र बिचारीला ठाऊक नसणार आणि हे तिला कळेल तेव्हा काय होईल? या सगळ्याविषयी जाणून घेऊ या पुढील लेखात.

[email protected]

Comments are closed.