छेदन – सोयीसाठी उपाय

>> मेघना साने

रोग झाल्यावर मनुष्य औषधांकडे वळतो. पण रोग होऊच नये म्हणून योग शरीराचे रक्षण करतो. अशा या योगाचा प्रसार करण्याचे, समाजाची मानसिकता बदलण्याचे कार्य योगाभ्यासी मंडळाद्वारे केले जाते. स्त्राrपुरुषांचे, मुलांचे, वृद्धांचे जीवन निरोगी राहावे आणि एक बळकट देश तयार व्हावा हा ध्यास घेऊन जनार्दन स्वामी करत असलेले हे कार्य निरंतर आहे.

‘मनुष्याने आत्मनिरीक्षण करावयास हवे. आत्मनिरीक्षणानेच मनुष्य सुधारू शकतो. गुरू प्रत्येक दोष सुधारू शकेल असे नाही. शिष्याच्या उन्नतीच्या मार्गातील अडचणींचे निवारण फक्त गुरू करू शकतात. उद्धार ज्याचा त्यालाच करावा लागतो.’ असे स्पष्ट विचार मांडणारे योग प्रचारक परमहंस परिव्राजकाचार्य श्री.जनार्दन स्वामी यांनी नागपूर येथे 1951 साली योगाभ्यासी मंडळ स्थापन केले होते. त्या काळात समाजात योगाविषयी प्रेम नव्हते. नागपूर आणि परिसरात हिंदीचा प्रभाव असल्याने योगी माणसाला ‘जोगडा’ असेही संबोधत असत. पण जनार्दन स्वामींनी योगोपचाराचे आपले कार्य सुरूच ठेवले. ‘अब दवाई काम नहीं करेगी, दुवा काम करेगी’ असे डॉक्टर किंवा वैद्याने सांगितल्यावर रोगी जनार्दन स्वामींकडून उपचार घेत असत आणि बरे होत असत. हळुहळू लोकांच्या मनात योगाविषयी आदर उत्पन्न झाला. समाजाची मानसिकता बदलण्याचे मोठे कार्य जनार्दन स्वामींनी केले.

रामनगर, नागपूर येथे असलेल्या या मंडळाच्या कार्यालयाची बैठी वास्तू आज नव्या रूपात ‘पादुका भवन’ या नावाने पाच मजल्यांची झाली आहे. ही सुंदर गुलाबी आधुनिक इमारत केवळ योगाचे शिक्षण देण्यासाठी आहे. या वास्तूत शेकडो लोक योगशिक्षकांकडून विनामूल्य योगशिक्षण घेत असतात.

जीवनातील समाधान, आनंद आणि आरोग्यासाठी.

ज्ञानी माणसाने एकट्याने शक्य तितका योग साधला पाहिजे.

हा मंत्र प्रत्येकाला देत, स्त्राrपुरुषांचे, मुलांचे, वृद्धांचे जीवन निरोगी राहावे आणि एक बळकट देश तयार व्हावा हा ध्यास घेऊन जनार्दन स्वामींनी निरंतर कार्य केले. त्यांचा आयुर्वेदाचा अभ्यास फार मार्मिक होता. त्यामुळे निरनिराळ्या रोगांनी पीडित लोक औषधोपचारासाठी त्यांच्याकडे येत. आजही योगाभ्यासी मंडळाची वाटचाल तशीच जोमाने सुरू आहे.

पादुका भवन या इमारतीच्या तळमजल्यावर परमपूज्य जनार्दन स्वामींच्या समाधीचे दर्शन घेता येते. अनेक अनुयायी तेथे डोळे मिटून शांतपणे ध्यान करत असतात. या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर परमपूज्य जनार्दन स्वामींचे परमशिष्य, श्रद्धेय रामभाऊ खांडवे यांची भेट घेतली. गेली चाळीस-पंचेचाळीस वर्षे ते योगशिक्षण, योगोपचार यासाठी विनामूल्य सेवा देत आहेत. योगोपचारासाठी त्यांची कीर्ती दूरवर पसरली आहे. त्यांच्या गुरूने समाधी घेतल्यावर त्यांचे कार्य यथाशक्ती पुढे नेणे हे त्यांनी आपले कर्तव्य मानले. श्रद्धेय खांडवे गुरुजींच्या योगोपचाराने अनेक प्रकारचे रोगी बरे होतात. कधी कधी डॉक्टरांनी हात टेकले तर रोगी श्रद्धेय खांडवे गुरुजींना मार्ग विचारतो. ते योग्य ते योगासन सांगतात. रोग्याला त्याचा हळूहळू फायदा होऊ लागतो. कधी कधी स्वत डॉक्टरदेखील योगोपचार घ्यायला रामभाऊंकडे येतात. मात्र ही आपली योग्यता केवळ गुरूच्या आशीर्वादाने झाली आहे असे ते सांगतात. काही आसने अनुकरण करण्यासाठी रोग्यांना खूप कठीण जातात. म्हणून खांडवे गुरुजींनी त्यात बदल करून ती सुलभ करून दिली. जेणेकरून आजारी माणूस त्याच्या क्षमतेनुसार ती करू शकेल. आज पंच्याऐशी वर्षांचे असलेले गुरुजी एकदम फिट आहेत. दिवसभर काम करून त्यांना थोडाही थकवा येत नाही असे ते म्हणतात. योगगुरू रामभाऊ खांडवे गुरुजींचे ‘योगोपचार’ हे पुस्तक जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाने प्रकाशित केले आहे. त्यात गुरुजींचे अनुभवसिद्ध योगोपचार आहेत. या अनुभवांचे शब्दांकन डॉ. अनिरुद्ध गुर्जलवार यांनी केले आहे.

दरवर्षीप्रमाणे 2025मध्ये योगाभ्यासी मंडळाचा अमृत महोत्सव होईल. त्यासाठी वेगवेगळे उपक्रम आखलेले आहेत. पण सध्या मंडळाने सुरू केलेला एक उपक्रम मला अतिशय स्तुत्य वाटला. योगाभ्यासी मंडळात योगशिक्षण घेऊन काही साधक परीक्षा उत्तीर्ण करून आता योगशिक्षक बनले आहेत. आज जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाच्या 105 शाखांच्या माध्यमातून नागपुरात तीनशे ते साडेतीनशे योगशिक्षक विनामूल्य योगशिक्षण देत आहेत आणि समाजातील अनेक मान्यवर आपली जागा त्यांना हे वर्ग चालविण्यासाठी विनामूल्य देत आहेत. शिवाय अनेक शिक्षक मंडळातर्फे शाळाशाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना विनामूल्य योगशिक्षण देत आहेत. हे शिक्षण म्हणजे केवळ योगासनांचे अनुकरण नसून आसनांची माहिती व त्यामागील थिअरीसुद्धा मुलांना सांगितली जात आहे. मग विद्यार्थी लेखी आणि तोंडी परीक्षेला बसतात. विद्यार्थ्यांची अशी तयारी झाल्यावर नागपुरातील शाळांच्या योगासन स्पर्धादेखील होणार आहेत. दोनशे ते चारशे मुले मैदानावर रांगांमधे बसून एकत्र योगासनाचे धडे गिरवताना पाहून ही पिढी छान घडत असल्याचे समाधान वाटले. सांघिक योग ही कल्पना जनार्दन स्वामींनीच त्या काळात मांडली होती. 18 जानेवारीला नागपुरात ‘भानुताई गडकरी आंतरशालेय योगस्पर्धा’ असा एक मोठा इव्हेंट होणार आहे. यात बारा ते अठरा हजार मुले सहभागी होतील असा अंदाज आहे.

केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरी यांच्या मातोश्रींना म्हणजे माननीय भानुताई गडकरी यांना जनार्दन स्वामींबद्दल फार आदर होता. म्हणून आपल्या मातोश्रींच्या स्मरणार्थ मा. नितीन गडकरी या उपक्रमाला पाठबळ देत आहेत.

रोग झाल्यावर मनुष्य औषधांकडे वळतो. पण रोग होऊच नये म्हणून योग शरीराचे रक्षण करतो. अशा या योगाचा भारतभर प्रसार झाला तर भारताची पुढील पिढी निरोगी राहण्यास मदत होईल हे नक्की.

[email protected]

Comments are closed.