पाऊलखुणा – समर्थांच्या रामघळी

>> आशुतोष बापट, [email protected]

शुभमंगल सावधान’ हे शब्द कानावर पडताक्षणी राणूबाईंचा नारायण बोहल्यावरून जो पळाला, तो पसारच झाला. संसाराच्या या चक्रात अडकायचे नाही असे मनाशी पक्के ठरवून मागे वळून न पाहता नारायण अव्याहत धावत होता. मनी सदैव रामाचा ध्यास घेतलेला नारायण बलोपासना आणि आध्यात्मिक साधना यात पूर्णपणे रममाण झाला. देशभ्रमंती करून विविध ठिकाणी मठ, मारुतीची मूर्ती स्थापन करून समर्थ परत महाराष्ट्रात आले. सह्याद्रीचे आकर्षण त्यांना स्वस्थ बसू देईना. आपले यापुढील कार्यक्षेत्र या सह्याद्रीच्याच कुशीत असावे असे जणू त्यांनी मनोमन ठरवलेच होते. त्याच विचारधारेत समर्थ महाबळेश्वरी आले आणि तिथूनच त्यांनी आपली जय जय रघुवीर समर्थ अशी अभिनव गर्जना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवली.

बलोपासनेचे महत्त्व तरुणांना पटवून देणारे आणि त्यांच्यात राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग चेतवणारे समर्थ रामदास स्वत मात्र उदासी वृत्तीने गुहा, घळी अशा ठिकाणीच रमायचे. “दास डोंगरी राहतो। यात्रा देवाची पाहतो।।” या त्यांच्याच उक्तीप्रमाणे दाट जंगलात, अवघड जागी असणाऱ्या घळी, कपारी, कुहरे त्यांना विशेष प्रिय होत्या. ते कायम सांगत की माझा प्रभू राम हा कायम माझ्यासोबतच असतो. त्यामुळे त्यांनी वास्तव्य केलेल्या घळी या रामघळी म्हणून प्रसिद्ध पावल्या. अशाच काही अप्रसिद्ध रामघळींचा हा घेतलेला शोध. दुर्गांपलीकडील सह्याद्रीचा कानोसा घेताना समर्थांनी निवडलेल्या आणि त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या घळी अवश्य पाहायला हव्यात. सुप्रसिद्ध शिवथरघळी सोबतच हेळवाक, चंद्रगिरी, तोंडोशी, जरंडा, सज्जनगड, मोरघळ, चाफळची घळ अशा अनेक अनगड ठिकाणी वसलेल्या घळी पाहता येतात. निसर्ग आणि एकांत या समर्थांच्या अत्यंत प्रिय गोष्टी या इथे अनुभवता येतात. याच रामघळींचा घेतलेला मागोवा.

शिवथरघळ

गिरीचे मस्तकी गंगा. तेथुनी चालली बळे

ढाबा रोलिंग प्रवाह. ढाबा खेळणी आदळे।।

शिवथरघळीचे समर्थांनी केलेलं हे यथार्थ वर्णन तिथे गेले की शब्दश खरे वाटते. वरंधघाटातून शिवथर खोऱ्यातील सुनेभाऊ मार्गे शिवथरघळीत जाता येते. पाठीशी कावळ्या किल्ला आहेच सोबतीला. ही घळ म्हणजे समर्थ संप्रदायाची पंढरीच होती. दासबोधाचे जन्मस्थान आणि समर्थांना अतिप्रिय वास्तू. पुण्याहून जेमतेम 90 किमीवर हे रम्य स्थान आहे. या ठिकाणची सगळी व्यवस्था श्री समर्थ सेवा मंडळातर्फे पाहिली जाते. इथे मुद्दाम पावसाळ्यात यावे. प्रचंड कोसळणारा धबधबा आणि सर्वत्र हिरवेगार वातावरण असल्यामुळे प्रसन्न वातावरणाचा अनुभव घेता येतो. याच घळीच्या वर चंद्रराव मोरे यांच्या वाडय़ाचे जोते पाहायला मिळते. ‘अवघा ध्वनीकल्लोळ उठिला’ हे समर्थवचन इथे आल्यावर पूर्णपणे जाणवते. चहूबाजूंनी उंचच उंच डोंगर आणि त्यामध्ये वसलेली शिवथरघळ. दासबोध या सुप्रसिद्ध ग्रंथाचे जन्मस्थान असलेले हे ठिकाण अगदी न चुकता पाहायलाच पाहिजे, पण या शिवथरघळीबरोबर अजूनही काही घळींना समर्थस्पर्श झाला होता. समर्थांचे संपूर्ण आयुष्य हे राममय झालेले होते. ते स्वतःच म्हणत की, जे काही माझे आहे, माझे काव्य, माझे बोलणे, माझे निवास, माझे अस्तित्व हे पूर्णपणे प्रभू रामचंद्रांमध्ये विलीन आहे. त्याचमुळे त्यांनी वास्तव्य केलेल्या घळीसुद्धा राममय झाल्या आहेत.

मोरघळ

सज्जनगडच्या नैऋत्येस मोरबाग या गावाजवळ ही रामघळ आहे. पायथ्याच्या परळी गावात जावे. तिथली यादवकालीन प्राचीन केदारेश्वर आणि विरुपाक्ष मंदिरे पाहावीत. मग बनघर मार्गे नदी ओलांडून पलीकडे कूस खुर्दला जावे. तिथून डोंगर चढून वरती पुढे पळसावडे गाव व पुढे मोरबाग वस्ती येते. इथेच पुढे चढून गेल्यावर वर्तुळाकार मुखातून या रामघळीत जाता येते. तीन तोंडाची ही मोरघळ. मध्यभागी मोरोबाचे शिवलिंग आहे. तसेच काही कोरीव शिल्प, सतीचे दगड, वीरगळ व एक समाधीचा चौथरा आहे.

चाफळची रामघळ

अंगापूरच्या डोहात सापडलेली राममूर्ती समर्थांनी आपल्या डोक्यावरून चाफळ इथे आणली आणि रामाचा मोठाच महोत्सव सुरू केला. समाज प्रबोधन करायचे असेल, शक्तीची उपासना समाजात रुजवायची असेल तर त्या शक्तीचे, धैर्याचे प्रतीक मूर्तीच्या रूपाने लोकांसमोर उभे करायला हवे. रामराया ते प्रतीक होऊन चाफळ मुक्कामी उभे ठाकले. चाफळच्या याच रामरायाचे दर्शन घ्यावे आणि मग शिंगणवाडीचा खडीचा मारुती पाहून बोरगेवाडी गाठावी. इथूनच पुढे रामघळीचा डोंगर दिसतो. वाटेत काही शिळा दिसतात. इथेच समर्थांनी सदाशिवशास्त्री येवलेकरांचे गर्वहरण एका मोळीविक्याच्या हातून केल्याची कथा आहे. पुढे याच शास्त्रीबुवांना समर्थांनी आपल्या संप्रदायात सामील करून घेतले आणि कणेरी इथे मठ स्थापून तिथे मठाधीपती म्हणून नेमले.

बोरगेवाडीच्या इथून पुढे भैरववाडीचे पठार लागते. तिथे एक ध्वज फडकताना दिसतो. त्याच्याच खाली आहे रामघळ. ही घळ दुमजली आहे. बाहेरून वेगळी वाटणारी विवरे आतून एकमेकांना जोडली आहेत. कराड चिपळूण रस्त्यावरच्या पाटण गावातूनही इथे जाता येते. एका बाजूला गुणवंतगड तर दुसरीकडे दातेगड असलेल्या या गावात येरळा आणि कोयना या दोन नद्यांचा संगम आहे. पाटणहून खंडूआईच्या खिंडीतून पुढे एक रस्ता जातो तिथून या घळीत जाता येते.

Comments are closed.