तंत्रज्ञान – सर्जनशीलतेमध्ये ‘एआय’ची लक्ष्मणरेषा
>> शहाजी शिंदे
मानवी सर्जनशीलतेवर 'एआय'च्या आक्रमणाचे गंभीर धोके विविध क्षेत्रांत जाणवत आहेत. यामुळे सर्जनशीलतेच्या संदर्भात 'एआय'ची लक्ष्मणरेषा नेमकी कुठे असावी, हा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे.
सर्वच क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर वाढत असताना साहित्य आणि कला यांसारख्या सर्जनशील क्षेत्रांत तो किती प्रमाणात स्वीकारार्ह असावा? हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. मानवी सर्जनशीलतेवर होणाऱ्या ‘एआय’च्या आक्रमणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काळ आणि भौगोलिक परिस्थितीनुसार बदलत असला तरी जोपर्यंत ही तंत्रज्ञान प्रणाली एखाद्या नवीन कला प्रकाराला जन्म देत नाही, तोपर्यंत पारंपरिक कलेतील मानवी स्पर्श जपणे आवश्यक आहे.
अलीकडेच न्यूझीलंडमधील दोन पुरस्कार विजेत्या लेखकांच्या पुस्तकांना स्टेफनी जॉन्सन यांचा कथासंग्रह ‘ओब्लिगेट कार्निवोर’ आणि एलिझाबेथ स्मिथर यांचा ‘एंजेल ट्रेन’ यांना 2026 च्या प्रतिष्ठित ‘ओखम बुक अवॉर्डस्’साठी अपात्र ठरवण्यात आले. विशेष म्हणजे ही अपात्रता लेखनासाठी नसून पुस्तकांच्या मुखपृष्ठ डिझाईनमध्ये ‘एआय’चा वापर केल्यामुळे आणि त्यासंबंधीच्या नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे देण्यात आली. या घटनेने सर्जनशीलतेच्या संदर्भात ‘एआय’ची लक्ष्मणरेषा नेमकी कुठे असावी? हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला आहे.
मानवी रचनात्मकतेमध्ये ‘एआय’च्या समावेशाबाबत जागतिक स्तरावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. 2023 मध्ये जर्मन छायाचित्रकार बोरिस एल्डॅग्सन यांनी सोनी वर्ल्ड फोटोग्राफी अवॉर्ड स्वीकारण्यास नकार देऊन खळबळ माजवून दिली होती. कारण ते छायाचित्र ‘एआय’च्या मदतीने तयार केले होते. याउलट, बीजिंगमधील प्राध्यापक शेन यांग यांनी ‘एआय’च्या मदतीने अवघ्या तीन तासांत लिहिलेल्या पुस्तकाला विज्ञान कथा स्पर्धेत दुसरे पारितोषिक मिळाले. जपानी लेखिका री कुडन यांनी तर त्यांच्या ‘टोयो-टू डोजो-टू’ या कादंबरीतील 5 टक्के मजकूर ‘चॅटजीपीटी’चा असल्याचे कबूल करूनही ‘अकुतागावा’ हा मानाचा पुरस्कार पटकावला. हॉलीवूडमध्येही ही स्वीकृती वाढत असल्याचे दिसते. ‘द ब्रुटलिस्ट’ चित्रपटातील भूमिकेसाठी एड्रियन ब्रॉडी यांनी हंगेरियन भाषेचा उच्चार सुधारण्यासाठी ‘एआय’ची मदत घेतली आणि ऑस्कर जिंकले. ऑस्करसाठी नामांकित ‘एमिलिया पेरेझ’ चित्रपटातही गायिकेचा आवाज सुधारण्यासाठी ‘एआय लोनिंग’चा वापर करण्यात आला. हे सर्व संकेत पाहता हॉलीवूडने या तंत्रज्ञानाला सहचर म्हणून स्वीकारले असल्याचे स्पष्ट होत आहे.
मात्र, शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात ‘एआय’बाबत कडक भूमिका घेतली जात आहे. अनेक शोध निबंधांमध्ये ‘चॅटजीपीटी’ला सह-लेखक म्हणून स्थान देण्यास नियतकालिकांनी विरोध दर्शवला आहे. साहित्याच्या क्षेत्रात सलमान रश्दी आणि मार्गरेट अॅटवूड यांसारख्या ज्येष्ठ लेखकांनी या तंत्रज्ञानाबाबत फारशी भीती व्यक्त केलेली नाही. रश्दींच्या मते, जोपर्यंत ‘एआय’ मानवाप्रमाणे विनोदबुद्धी दाखवत नाही, तोपर्यंत लेखकांना धोका नाही. दुसरीकडे, केंब्रिज विद्यापीठाच्या एका अभ्यासात लेखक वर्गामध्ये मोठी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 51 टक्के लेखकांना वाटते की, ‘एआय’ भविष्यात त्यांच्या पेशाचे स्वरूप पूर्णपणे बदलून टाकेल. 59 टक्के लेखकांचा असा दावा आहे की, त्यांच्या संमतीशिवाय आणि कोणताही मोबदला न देता त्यांच्या साहित्याचा वापर ‘एआय’ मॉडेल्सना प्रशिक्षित करण्यासाठी केला गेला आहे.
जेव्हा 19 व्या शतकात फोटोग्राफीचा शोध लागला, तेव्हा चित्रकारांना वाटले की, कॅमेरा हा चित्रकलेचा शत्रू आहे. मात्र, फोटोग्राफीने चित्रकलेची जागा घेतली नाही, तर तिला वास्तववादाकडून अमूर्ततेकडे नेण्यास मदत केली आणि एक नवीन कला प्रकार जन्माला आला. ‘एआय’च्या बाबतीतही असेच काहीसे घडू शकते. तरीही मानवी सर्जनशीलतेचे पावित्र्य राखण्यासाठी आणि या तंत्रज्ञानाचा गैरवापर रोखण्यासाठी जागतिक स्तरावर एकसमान नियम आणि धोरणे आखण्याची गरज आहे.
(लेखक संगणक अभियंता आहेत)
Comments are closed.