पुरातत्व डायरी – संस्कृतीचे अदृश्य प्रवाह

>>

भारतातील संस्कृती व सभ्यतांचा वेध घेणारे हे सदर. सिंधू संस्कृतीचा उगम दर्शवणारी अनेक उत्खनने भारतात केली गेली, ज्यावर आजही संशोधन सुरू आहे. या उत्खननातून प्राप्त झालेल्या माहितीचा रंजक इतिहास मांडणारे सदर.

एखाद्या शांत गावाच्या कडेने वळणावळणाने जाणारा रस्ता… दोन्ही बाजूंनी पसरलेली ओसाड शेती…पावसाने थोडी उकरून टाकलेली माती…आणि त्या ओलसर मातीत चमकणारी एक लहानशी धातूची वस्तू. ती उचलली जाते अगदी सहजतेनं, कुतूहलानं आणि अचानक भूतकाळाचं एक दार उघडतं. ती वस्तू असते एक प्राचीन नाणं कधी एखाद्या व्यापाराच्या हातात फिरलेलं, कधी एखाद्या श्रमिकाच्या श्रमांचा मोबदला झालेलं, पण त्या नाण्यात आज शांतपणे विसावलेला असतो अख्खा इतिहास न बोलता खूप काही सांगणारा.

अशाच एखाद्या गावी, एखाद्या डोंगराच्या उतारावर, पडक्या मंदिराच्या छायेत, एखाद्या विसावलेल्या गुहेत किंवा एखाद्या विस्मृतीत गेलेल्या नदीच्या वाळवंटात, ही कहाणी पुनः पुन्हा घडत असते आणि अशा एका क्षणातून सुरू होतो एक विलक्षण प्रवास पुरातत्त्वाचा व नाणकशास्त्राचा.

आपण ज्या जमिनीवर उभे आहोत तिच्या गर्भात शतकानुशतकांचा इतिहास दडलेला असतो. जसं खोल समुद्रात खजिना लपलेला असतो, तसं आपल्या मातीत हजारो पिढ्यांचे जगणे, रडणे, हसणे, गढून गेलेलं असतं. पुरातत्त्व म्हणजे त्या लपलेल्या गाथांचा शोध. हा शोध केवळ खजिन्यासाठी नसतो, तो असतो आपल्या संस्कृतीचं प्रतिबिंब पाहण्यासाठी, आपल्या मुळांशी पुन्हा एकदा नातं जोडण्यासाठी.

उत्खननात सापडलेला तांब्याचा एक मोडका गाडा, काळसर रंगाचं मृदभांडं, विस्कळीत शिलालेखाचा एक तुकडा किंवा एखाद्या भिंतीवरची मूर्ती हे सगळं पाहताना असं वाटतं की, आपण वस्तू नव्हे तर त्या काळातल्या माणसांचं मौन ऐकत आहोत. त्यांच्या हातांनी घडवलेली ही साक्ष आहे नोंद न झालेल्या इतिहासाची. पुरातत्त्व हे केवळ मातीखालचं खोदकाम नाही, ती आहे काळाशी, स्मृतीशी आणि आपल्याच ओळखीशी साधलेली एक गूढ, पण जिवंत संवादकला. अशा क्षणांना जेव्हा एखादं नाणं हाती लागतं, तेव्हा जाणवतं की नाणं म्हणजे केवळ विनिमयाचं साधन नाही, ते आहे त्या काळाच्या सत्ता-संस्थेचं, श्रद्धा-विश्वासाचं, व्यापार-व्यवहाराचं आणि सौंदर्यदृष्टीचं बोलकं उदाहरण. त्यावर उमटलेले चिन्ह, लिपी, आकृती हे सगळं त्या काळातील मनाचा आरसा ठरतो. त्या क्षुल्लक वाटणाऱ्या वस्तूमध्ये एक मोठा ऐतिहासिक संदर्भ दडलेला असतो.

भारतीय नाणकशास्त्राचा प्रवास हादेखील तितकाच रंजक आहे. आजच्या 2 हजार 600 वर्षांपूर्वी पंचमार्क नाण्यांपासून सुरू झालेली ही वाटचाल, जिथं नाण्यांवर कोणत्याही राजाचा चेहरा नसायचा, फक्त चिन्हं असायची व ती हेच दर्शवते की, त्या काळात श्रद्धा आणि प्रतीकांचा मान किती रुजलेला होता. मौर्य साम्राज्यात नाण्यांवर राजसत्तेचा ठसा उमटू लागतो. पुढे कुषाण नाण्यांमध्ये ग्रीक आणि भारतीय देवतांची सुंदर सांगड दिसते, जी त्या काळातील सांस्कृतिक समन्वयाचं दर्शन घडवते. गुप्त राजांच्या नाण्यांमध्ये कलात्मकतेचा शिखरबिंदू प्रकटतो, तर मुघल कालखंडात उर्दू-अरबी शिलालेखांची दाट छाया जाणवते. ही केवळ नाण्यांची नव्हे, तर भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय प्रवासाची मूर्त रेषाच असते. आज इतिहास एका क्लिकवर मिळतो, पण तो केवळ अक्षरांनी समजत नाही. तो स्पर्शातून समजतो मातीचा, धातूचा, शिळेचा. म्हणूनच पुरातत्त्व आणि नाणकशास्त्र ही अभ्यासाची क्षेत्रं न राहता अनुभवाची वाट बनतात. त्या वाटांवर चालताना आपण भेटतो एक गुहा खोदणारा श्रमिक, एक नाणं घडवणारा कारागीर, युद्ध जिंकलेला राजा, बाजारात गडबड करणारा व्यापारी किंवा शिल्प घडवणारा एकांतवासी शिल्पकार. त्यांच्या जीवनाचा एखादा क्षण आज आपल्यासमोर एक अवशेष होऊन उभा राहतो.

ही लेखमाला मी का लिहितो आहे? कारण इतिहास केवळ सांगायचा नसतो, तो उभा करायचा असतो आणि तो उभा करायचा यासाठी की, त्यातून आपण वर्तमान समजून घेऊ शकतो व भविष्य घडवू शकतो. ही लेखमाला म्हणजे काळाच्या गाभ्यात जाण्याचा प्रयत्न आहे नाण्यांच्या आवाजातून, भग्न शिल्पांच्या स्पर्शातून, विस्मृतीत गेलेल्या स्थळांच्या शांततेतून. ही एक ओळख आहे आपल्या मुळाशी, आपल्या मातीशी, आपल्या संस्कृतीच्या अदृश्य, पण सतत वाहणाऱ्या प्रवाहाशी.

या लेखमालेत आपण भूतकाळाकडे फक्त रसिकाच्या डोळ्यांनी नाही, तर एका तटस्थ अभ्सासकाच्या मनाने पाहू. आपण त्या काळाचा फक्त इतिहास न वाचता त्याचं सौंदर्य, त्याची आशयगर्भता, त्याची मानवी बाजू जाणून घेऊ. कारण ज्या भूमीवर आपण उभे आहोत, तिचा प्रत्येक कण इतिहास सांगतो. आपल्याला फक्त थोडं थांबावं लागतं, थोडं वाकावं लागतं आणि त्या मातीच्या गंधामध्ये, त्या थंड धातूच्या स्पर्शात, त्या भग्नतेच्या शांततेत डोकावून पाहावं लागतं. तो भूतकाळ दूरचा नाही, तो आपलाच आहे.

[email protected]

(लेखक पुरातत्व अभ्यासक असून एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत.)

Comments are closed.