नवलच! – सूक्ष्म लेखन

>> अरुण

काही जणांचं अक्षर सुबक-सुंदर-सुवाच्य असतं, तर काही (किंवा अनेकांचं) किरटं, वाकडं-तिकडं, अक्षर कोणतं तेही न समजणारं असतं. आपलं अक्षर चांगलं नाही याचं गांधीजींना वाईट वाटत असे, परंतु त्यासाठी लेखन शिकतानाच ‘पुस्ती (वर्कबुक) चांगली गिरवायली हवी, नंतर पक्क्या मडक्याचे काठ वळत नाहीत’ असं ते म्हणत. पु.ल. देशपांडे यांनी एका तरुणाला सही देताना म्हटलं होतं “मित्रा, तुझं अक्षर एवढं सुंदर असताना माझी सही कशाला घेतोस?’’ हस्ताक्षर, स्वाक्षरी आणि स्वभाव, मानसिक स्थिती यांचीही ‘गणितं’ म्हणजे भाकितं मांडली जातात. कंपवात असेल, खूप ‘टेन्शन’ असेल तर अक्षर लेखनावरही परिणाम होतो. परंतु ‘अक्षर लेखन’ हाच विरंगुळा आणि आवड असेल तर एरवी ‘नर्व्हस’ असणाऱया व्यक्ती फार सुबक, एकसारखे, अगदी छापील वाटावे असे सुंदर लेखन करतात. सुवाच्य लेखन अर्थातच वाचावंसं वाटतं, प्रसन्नता देतं. अन्यथा ‘स्वयं लिखति, स्वयं न पठति’ म्हणजे आपण काय लिहिलंय ते आपल्यालाच वाचता येत नाही अशी परिस्थती निर्माण होऊ शकते.

शुद्धलेखन किंवा प्रमाण लेखन वेगळं आणि ‘सुवाच्य’ लेखन निराळं. शब्दरचना नीट ठाउढक नसली तरी अक्षरलेखन ‘वाचनीय’ असू शकतं. अशा अक्षरप्रेमी मंडळींपैकी काही जण ‘सूक्ष्म लेखन’ करण्याचा ध्यास घेतात. मोठं लेन्सर वापरून एखाद्या तांदुळावर किंवा तिळावरही काही अक्षरं नोंदणारे किंवा ‘चित्र’ चितारणारे कुशल कलाकार असतात.
स्थिर लेखन आणि तेजस्वी दृष्टीबरोबरच प्रचंड चिकाटी या त्रिगुणांचा समुच्चय झाला तर असे प्रयोग यशस्वी करता येतात. दंडगोलाकार आणि समान आकाराचा उत्तम तांदूळदाणा घेतला जातो. त्यावर अणकुचीदार सुईसारख्या वस्तूने काही अक्षरं किंवा वाक्यसुद्धा ‘कोरणारे’ कलाकार असतात. ही कला आपल्या देशात फार प्राचीन काळापासून आहे. म्युझियममध्ये असे ‘मिनिएचर’ लेखन पाहायला मिळते. अशा सूक्ष्म-धान्य लेखनासाठी तांदळाचा दाणा अधिक योग्य असतो. कारण त्यावरचं कोरीवकाम तुलनेने सहज होते. पूर्वी तांदळावर लिहिलेला संदेश ‘शुभ’ मानला जायचा. त्यातून असं लेखन सुरू झाले. सर्वसामान्यांना ते वाचण्यासाठी भिंगाची मदत लागते. डोळय़ांची आणि लेखनाची उत्कृष्टता असल्याविना असे लेखन शक्य नाही. यातील जागतिक रेकॉर्ड आपल्याकडच्या सुरेंद्रकुमारचा असावा. त्याने एका तांदूळदाण्यावर 1749 अक्षरांची नोंद केली. ही कमालच आहे.

Comments are closed.