नवल – लांबलचक मालगाडी

>> अरुण

आमच्या मुंबईतल्या घरालगतच देशातल्या पहिल्या मुंबई-ठाणे प्रवासी रेल्वेगाडीचा आता सहा पदरी झालेला मार्ग अव्याहत ‘वाहत’ असतो. बालपणापासून सतत धावणाऱया रेलगाडय़ा आणि डोक्यावर घरघरणारी विमाने बघण्याची सवयच आहे. त्यामुळे आता त्याचं काही विशेष वाटत नाही. काही पाहुणे मंडळी मात्र या दोन्हींची धाव कुतूहलाने पाहात असतात.
तसं कुतूहल आम्हाला बालपणी असायचं ते पन्नास-शंभर डब्यांच्या मालगाडीचे. एकच इंजिन एवढे डबे कसे ओढते याचेही आश्चर्य वाटायचे. आधी कोळशाची, मग डिझेलची आणि नंतर विजेवर चालणारी इंजिने मालगाडीला मिळाली. काही वेळा मालगाडीच्या उघडय़ा डब्यातून, ट्राक्टर, ट्रक वगैरेही जाताना दिसायचे. सुट्टीत मुलांमध्ये, वेगात जाणाऱया मालगाडीचे डबे अचूक मोजण्याची ‘स्पर्धा’ लागायची.

हे आठवले ते देशात प्रथमच साडेचार किलोमीटर लांबीची ‘रुद्राष्ट’ नावाची मालगाडी गेल्या आागस्टमध्ये सुरू झाली त्यावरून. जगात पहिली रेल्वेगाडी इंग्लंडमध्ये 1825 धावली. सुरुवातीला ते रुळ मालवाहतुकीसाठी आणि नंतर प्रवासी वाहतुकीसाठी वापरले गेले. हिंदुस्थानात पहिली प्रवासी रेल्वेगाडी 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणे अशी धावली. मात्र त्याआधी कोळशाचे इंजिन वापरून काही खाणींमध्ये रेल्वे मालवाहतूक होत होती. अशी पहिली मोठी मालगाडी 12 डिसेंबर 1851 या दिवशी ‘गंगा पानाल प्रोजेक्ट’साठी पिरन कलिमाय ते रुरकी रेल्वेमार्गावर धावली. याच वेळी सोलानी विद्युत प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली. मात्र ती स्मालगेज मार्गावरची ट्रेन होती.

आता देशातले सुमारे 99 टक्के मार्ग ब्राडगेज झाले असून ‘रुद्राक्ष’ ही आधुनिक मालगाडी 354 मालडबे (वागन) घेऊन धावते. एवढय़ा डब्यांसाठी या ट्रेनला 7 इंजिने लागतात. या ट्रेनची पहिली धाव गेल्या 7 आागस्टला उत्तर प्रदेशातील गंजखवाला ते झारखंडमधील गाऱहणा अशी झाली.

जगात यापेक्षा लांबलचक मालगाडी आास्ट्रेलियात आहे. 2001 मध्ये ती पश्चिम आास्ट्रेलियात खाण द्रव्याची ने-आण करण्यासाठी सुरू झाली. या ट्रेनची लांबी तब्बल सव्वासात किलोमीटर असून ती 682 डबे वाहून नेते. या ट्रेनचे वजन सुमारे 1 लाख मेट्रिक टन एवढं आहे. ही मालगाडी बीएचपी कंपनीच्या न्यूमन यान्डी खाणींकडून 275 किलोमीटर असलेल्या पोर्ट हेडलाण्डपर्यंत धावते.

Comments are closed.