19 वर्षांत धोनीलाही न जमलेलं संजूने करून दाखवलं! चौथ्याच सामन्यात सीएसकेसाठी ऐतिहासिक कामगिरी

राजस्थान रॉयल्सला सोडून प्रथमच चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कडून खेळणाऱ्या संजू सॅमसनने चौथ्याच सामन्यात धमाका करत इतिहास रचला. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्याने नाबाद 115 धावांची तुफानी खेळी साकारली. सुरुवातीचे तीन सामने त्याच्यासाठी निराशाजनक ठरले असले तरी या चौथ्या सामन्यात त्याने आपली खरी ताकद दाखवून दिली. 56 चेंडूंच्या या खेळीत त्याने 15 चौकार आणि 4 षटकार ठोकले.

या शतकासह संजू सॅमसन आयपीएलच्या 19 वर्षांच्या इतिहासात CSK साठी विकेटकीपर म्हणून शतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे. विशेष म्हणजे, एमएस धोनीच्या अनुपस्थितीत संजूने विकेटकीपिंगची जबाबदारी सांभाळत ही ऐतिहासिक कामगिरी केली. इतकेच नाही तर त्याने धोनीचा CSK कडून विकेटकीपर म्हणून सर्वोच्च धावसंख्येचा विक्रमही मोडला. यापूर्वी धोनीने 2019 मध्ये आरसीबीविरुद्ध 84 धावा केल्या होत्या.

आयपीएलमध्ये संजू सॅमसनने आता तीन वेगवेगळ्या संघांसाठी शतक झळकावले आहे. याआधी तो राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्सकडूनही शतक ठोकले आहे. या विक्रमात केएल राहुल आधीपासूनच आघाडीवर असून त्यांनी पंजाब किंग्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्ससाठी शतक झळकावले आहे.

सीएसकेची सुरुवात या हंगामात खराब राहिली होती. पहिल्या तीन सामन्यांत सलग पराभवांचा सामना करावा लागला होता. डेवाल्ड ब्रेव्हिसही काही सामन्यांत उपलब्ध नव्हता, तर एमएस धोनीही चौथ्या सामन्यात मैदानात उतरला नाही. मात्र दिल्लीविरुद्धच्या सामन्यात CSK ने दमदार पुनरागमन करत विजय मिळवत आपली ताकद दाखवून दिली. आता चेन्नई सुपर किंग्जचा पुढील सामना 14 एप्रिल रोजी कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध होणार आहे. हा सामना चेन्नईच्या घरच्या मैदानावर म्हणजेच चेपॉक स्टेडियमवर खेळला जाईल.

Comments are closed.