असारंबाबूचा जामीन वाढविला

ही अंतिम वाढ असल्याचा गुजरात उच्च न्यायालयाचा निर्वाळा

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

गुजरात उच्च न्यायालयाने बलात्कार प्रकरणातील आरोपी 86 वर्षीय आसारामबापूंचा जामीन कालावधी आणखी एक महिन्याने वाढवला आहे. मुदत वाढवतानाच उच्च न्यायालयाने ही आता आपल्याला शेवटची संधी देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे. बलात्कार प्रकरणात जोधपूर तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना सर्वोच्च न्यायालयाने त्यांना वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामीन मंजूर केला होता. तसेच पुढील सुटकेसाठी गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल करू शकतात असे निर्देश देण्यात आले होते. आतापर्यंत त्यांना दोनवेळा जामीन वाढवून देण्यात आला होता. ही मुदत 7 जुलै रोजी समाप्त होत असताना गुजरात उच्च न्यायालयाने पुन्हा 7 ऑगस्टपर्यंत जामीन वाढवला आहे.

एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात 15 ऑगस्ट 2013 रोजी आसारामबापूंविरुद्ध जोधपूरमध्ये खटला दाखल करण्यात आला होता. त्यानंतर  इंदूर येथून त्यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते जोधपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. सुमारे 11 वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर 7 जानेवारी 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना पहिल्यांदाच जामीन मंजूर केला. तेव्हापासून आसाराम जामिनावर आहेत.

Comments are closed.