हिंदुस्थानी संगीताचा दैदीप्यमान तारा हरपला; अंबादास दानवे यांनी आशा भोसले यांना वाहिली श्रद्धांजली
संगीत विश्वातील दिग्गज गायिका आशा भोसले यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. आपल्या चिरतरुण आवाजाने अवघ्या जगाला भुरळ घालणाऱ्या आशा भोसले काळाच्या पडद्याआड गेल्याने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने स्वरविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
स्वरांच्या दुनियेतील अखंड ऊर्जा आणि भारतीय पार्श्वगायनाचा देदीप्यमान तारा म्हणजे ‘आशाताई’! 🎤✨
शास्त्रीय बाजाची गाणी असोत किंवा रिदमिक पॉप, आशा भोसले यांनी आपल्या आवाजाच्या जादूने सहा दशकांहून अधिक काळ रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले आणि गाजवत राहणार. त्यांच्या संगीतातील… pic.twitter.com/vvGIjb9Nn9
— अंबादास दानवे (@iambadasdanve) 12 एप्रिल 2026
अंबादास दानवे यांनी एक्सवरील पोस्टमध्ये आशा भोसले यांच्या कार्याचा गौरव केला आहे. “स्वरांच्या दुनियेतील अखंड ऊर्जा आणि हिंदुस्थानी पार्श्वगायनाचा देदीप्यमान तारा म्हणजे आशाताई,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
आशा भोसले यांच्या अष्टपैलू गायनाबद्दल बोलताना दानवे म्हणाले की, शास्त्रीय बाजाची गाणी असोत किंवा रिदमिक पॉप, आशाताईंनी आपल्या आवाजाच्या जोरावर सहा दशकांहून अधिक काळ रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले आहे. आणि गाजवत राहणार. त्यांच्या संगीतातील अष्टपैलुत्वाला मानाचा मुजरा करत अंबादास दानवे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
Comments are closed.