Ashes 2025 – एक नंबर डावखुरा गोलंदाज! मिचेल स्टार्केने वसीम अक्रमचा ऐतिहासिक विक्रम काढला मोडित

Ashes 2025 मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याचा रोमांचक थरार ब्रिस्बेनमध्ये आजपासून (04 डिसेंबर 2025) सुरू झाला आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारल्यामुळे इंग्लंडचा संघ पराभवाचा वचपा काढण्यासाठी उत्सुक असेल. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला नामी संधी मिळाली. त्याने आपल्या गोलंदाजीची धार पुन्हा एकदा दाखवून दिली आणि इंग्लंडला तीन मोठे हादरे देत इतिहास रचला.

मिचेल स्टार्केने सलामीला बेन डकेटला भोपळाही फोडू दिला नाही आणि 5 या धावसंख्येवर इंग्लंडला पहिला हादरा दिला. त्यानंतर आलेल्या ओली पोपची सुद्धा स्टार्कने भंबेरी उडवून दिली आणि त्याचा त्रिफळा नेस्तनाबूत केला. ओली पोप सुद्धा शुन्यावर आल्या पावली तंबुत परतला. पाच धावांवर दोन विकेट अशी इंग्लंडची अवस्था झाली होती. जॅक क्रॉलीने 76 धावांची सलामी दिली त्यामुळे संघाचा डाव सावरला. क्रॉली बाद झाल्यानतंर जो रूट आणि हॅरी ब्रुक यांनी धावसंख्या वेगवान करण्याचा प्रयत्न केला. परंतू ब्रुकलाही स्टार्कने बाद केलं आणि ऑस्ट्रेलियायाला चौथा हादरा दिला. संघाजी चौथी विकेट आणि स्टार्काने आपल्या तिसऱ्या विकेटसह कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा डावखूरा वेगवान गोलंदाज होण्याचा बहुमान आपल्या नावावर केला.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांमध्ये वसीम अक्रम 414 विकेटसह पहिल्या क्रमांकावर विराजमान होता. मात्र, वसीम अक्रमच्या या सिंहासनाला आता मिचेल स्टार्कने सुरुंग लावला आहे. मिचेल स्टार्कच्या नावावर आता 415 विकेट झाल्या असून, तो आता कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक विकेट पटकावणारा डावखुरा गोलंदाज ठरला आहे. सध्याच्या घडीला डावखुऱ्या गोलंदजांच्या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर चामिंडा वास (355), चौथ्या क्रमांकावर, ट्रेंट बोल्ट (317) आणि मिचेल जॉनसन (313) या खेळाडूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे सर्व खेळाडू निवृत्त झाले आहेत. त्यामुळे मिचेल स्टार्क डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांचा हुकूमी एक्का ठरला आहे.

Comments are closed.