आशा भोसले – तुमच्याकडे माझे काही सामानही पडून आहे!- जोडा. आशिष शेलार
मोहम्मद रफी साहेबांच्या गाण्यांवर नितांत प्रेम असल्यामुळे 24 डिसेंबर या त्यांच्या जन्मदिनी आम्ही त्यांच्या नावे पुरस्कार देतो. ज्यांनी रफी साहेबांसोबत काम केलं अशा व्यक्तींना सन्मानित करतो. गेल्या 18 वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो. या पुरस्कारानं आशाताईंनाही सन्मानित करावं अशी आमची इच्छा होती. 2014 साली आम्ही ती त्यांना बोलून दाखवली. त्यांनी पुरस्कार स्वीकारण्याचं मान्य केलं. कार्यक्रमाला आल्या, सन्मान स्वीकारला आणि त्यांच्या येण्यानं आम्हीही सन्मानित झालो. ‘रफी साहेबांच्या नावाचा पुरस्कार मला द्यायला एवढा उशीर का केला?’ असा प्रेमळ सवाल त्यांनी त्यावेळी केला होता. त्यानंतरच्या म्हणजे 2015 च्या पुरस्कार सोहळ्याला एका सामान्य रसिकाप्रमाणे त्या आल्या. आमंत्रणाची वाट न बघता आल्या. रफी साहेबांच्या आठवणी ताज्या करणारा हा कार्यक्रम, आपण गेलं पाहिजे या भावनेनं आल्या. कुठलाही प्रोटोकॉल मनात न ठेवता दिलखुलासपणे कार्यक्रमात सहभागी झाल्या. आमचं कौतुक केलं. पुरस्कार घेणाऱयांचं कौतुक केलं. त्यांच्यातील साधेपणाचं दर्शन घडवलं. जमिनीवर पाय घट्ट रोवून उभा असलेला एक मोठा कलावंत पाहण्याची संधी आम्हाला त्यांनी दिली.
आशाताईंचा आणि माझा स्नेह बऱयाच वर्षांचा. खरं तर त्यांनी मला आपलं म्हणावं हा माझा बहुमानच. रक्षाबंधनाला घरी बोलावून राखी बांधायच्या. स्वतःच्या हातानं स्वयंपाक करून खूप प्रेमानं जेवायला वाढायच्या. माझी पत्नी आणि मुलगा ओंकारसह माझ्या कुटुंबाला त्यांनी आपलं कुटुंब मानलं आणि आपल्या प्रेमवर्षावात भिजवून टाकलं. भाऊबीजेसाठी त्या माझ्या घरी यायच्या. सोबत कणकेचा दिवा करून आणायच्या. ओवाळायच्या… अत्यंत निर्मळ मनानं त्या हे सगळं करायच्या. ‘सोनियाच्या ताटी, उजळल्या ज्योती, ओवाळीते भाऊराया रे…’ हे भाऊबीजेचं गाणं मराठी कुटुंबात दिवाळीत हमखास वाजतं. मीही लहानपणापासून ऐकत आलो, पण हे अजरामर गाणं गाणारी महान गायिका मला बहीण म्हणून प्रत्यक्षात कधीतरी ओवाळेल याची कल्पनाच केली नव्हती. हे नातं भगवंताचं देणं होतं.
ताईंनी एकदा मला माझी पत्नी प्रतिमासोबत आग्रहानं घरी जेवायला बोलावलं. माशांची लाजवाब बिर्याणी खाऊ घातली. त्या स्वतः बिर्याणी वाढत होत्या. आग्रह करीत होत्या. तो क्षण आणि ती चव आजही स्मरणात आहे. आशाताईंची भेट, मग ती माझ्या घरी काय किंवा त्यांच्या घरी काय, ती एक मैफलच असायची. त्यांच्या संगीत कारकीर्दीतील असंख्य आठवणी त्या सांगायच्या. त्यांच्या जीवन संघर्षातील कटू प्रसंग ऐकताना डोळे भरून यायचे. ‘भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले… एवढे भोगले की, मज हसावे लागले…’ हे त्यांचे अजरामर गीत आणि त्यांचे जगणे अगदी एकरूप होते, पण त्या कधी डगमगल्या नाहीत. त्या आनंदाचा सळसळता झरा होत्या. त्या स्वरातून जशा भेटतात तशाच प्रत्यक्ष भेटायच्या. तेव्हासुद्धा विलक्षण प्रेम, जिव्हाळा, लळा लावायच्या.
संगीत क्षेत्रातील त्यांचं योगदान मोठं आहेच, पण मराठी भाषेला त्यांनी दिलेलं योगदान त्याहीपेक्षा कितीतरी पटीनं मोठं आहे. आशाताईंनी सुरेश भट, आरतीप्रभू, शांताबाई शेळके, कवी यशवंत, ग. दि. माडगूळकर यांच्यापासून प्रवीण दवणे, सौमित्रपर्यंतच्या अनेक कवींच्या कविता आपल्या स्वरानं अजरामर केल्या. आशाताईंनी मराठी कविता खऱया अर्थानं जिवंत केली, घराघरांत पोहोचवली असं म्हटलं तर गैर ठरणार नाही. कविता गाता-गाता एक दिवस आपलं जगणंच कविता कसं होतं, हे आशाताईंना पाहिल्यावर कळतं.
काल अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा मला पह्न आला आणि काळजात धस्स झालं. मी सिंधुदुर्ग दौऱयावर होतो. रात्री विमानतळावर उतरलो आणि रुग्णालयात गेलो. त्यांना अत्यवस्थ पाहून खूप वाईट वाटले, पण याही धक्क्याला त्या हरवून ठरल्याप्रमाणे एका लाईव्ह कार्यक्रमासाठी पुन्हा उभ्या राहतील असे वाटत होते. त्यामुळे आज मी दिल्लीत भरलेल्या अखिल भारतीय प्रशासकीय महिला संमेलनाच्या समारोपाच्या नियोजित कार्यक्रमाला जाण्यासाठी निघालो. विमानतळावर सुरक्षा तपासणी करून आत गेलो आणि एक पह्न वाजला. तो पह्न होता मी एक प्रेमळ बहीण गमावल्याचा. तो पह्न होता माझ्या जगण्यातील श्रीमंती गमावल्याचा.
27 जून हा आर. डी. बर्मन यांचा वाढदिवस. गेल्या 27 जूनला त्या आम्हाला म्हणाल्या, ‘‘आपल्याला आर. डी. बर्मन यांच्या घरी जायचे आहे.’’ आम्ही त्यांना घेऊन गेलो. आर. डी. बर्मन यांच्या प्रतिमेसमोर उभं राहून स्वतःच्या सुरात अजरामर केलेलं ‘मेरा कुछ सामान आपके पास पडा है…’ हे गुलजार साहेबांचे गीत त्या गायल्या. आज या क्षणी खूप आठवणी आहेत. खूप बोलताही येईल… पण शब्द अबोल व्हावेत असा हा क्षण आहे. त्यामुळे गुलजार साहेबांच्या शब्दांत थोडा बदल करून आमचे ताईंना एवढेच सांगणे आहे, ‘‘ताई, मेरा भी कुछ सामान आपके पास पडा है!’’
आशाताईंची भेट, मग ती माझ्या घरी काय किंवा त्यांच्या घरी काय, ती एक मैफलच असायची. असंख्य आठवणी त्या सांगायच्या. त्यांच्या जीवन संघर्षातील कटू प्रसंग ऐकताना डोळे भरून यायचे. ‘भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले… एवढे भोगले की, मज हसावे लागले…’ हे त्यांचे अजरामर गीत आणि त्यांचे जगणे अगदी एकरूप होते.
आशाताईंनी मराठी कविता खऱया अर्थानं जिवंत केली, घराघरांत पोहोचवली असं म्हटलं तर गैर ठरणार नाही. कविता गाता-गाता एक दिवस आपलं जगणंच कविता कसं होतं, हे आशाताईंना पाहिल्यावर कळतं.
(लेखक हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य व माहिती-तंत्रज्ञान मंत्री आहेत.)
Comments are closed.