Maharashtra legislative council bypolls – राजूरकरांसाठी अशोक चव्हाणांची फिल्डिंग ‘फेल’
>> विजय जोशी
लोकसभा निवडणुकीत व पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव झाल्यानंतर तसेच राज्यसभेवर जिल्ह्यातून दोघांना संधी मिळाल्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी महानगराध्यक्ष अमर राजूरकर यांच्या नावासाठी लावलेली फिल्डिग अखेर अयशस्वी ठरली. निष्ठावंतांनी त्यांच्या नावाला विरोध केल्याने अखेर त्यांचा या यादीतून पत्ता कट झाल्याने चव्हाण गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी अमर राजूरकरांचा पत्ता कट करून गळाला लावून काँग्रेसमधून आणलेल्या अशोक चव्हाणांचा गेम केल्याची चर्चा नांदेड जिल्ह्यात चांगलीच रंगली आहे.
विधान परिषदेच्या पाच जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस असताना भारतीय जनता पक्षाने तीन जणांची यादी जाहीर केली. या यादीत संदीप जोशी, संजय केनेकर व दादाराव केचे यांचे नाव अंतिम करण्यात आले. मागच्या आठवड्यात दादाराव केचे, अमर राजूरकर आणि माधव भंडारी यांची नावे पक्षश्रेष्ठीकडे पाठविण्यात आली होती. त्यानंतर नांदेड जिल्हयातील निष्ठावंत गटाने राजूरकर यांच्या नावाला विरोध केला. अनेक वर्षांपासून पक्षात काम करणाऱ्या कार्यकत्यांना संधी देण्यात यावी, या मागणीसाठी प्रमुख कार्यकर्ते सक्रिय झाले होते. राजूरकरांचे नाव अंतिम होत असताना मागच्या आठवड्यात निष्ठावंत गटाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यात प्रामुख्याने चैतन्यबापू देशमुख, संजय कौडगे यांचा समावेश होता. नागपूर येथेही जाऊन त्यांनी राष्ट्रीय संघटन मंत्री बी.एल. संतोष, सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांचीही भेट घेतली होती. दिल्ली, मुंबई व नागपूर येथे जाऊन या मंडळींनी विधान परिषदेसाठी जुन्या निष्ठावंतांचा विचार व्हावा, अशी मागणी केली होती.
अशोक चव्हाण व डॉ. अजित गोपछडे या दोघांना राज्यातून राज्यसभेसाठी संधी
मिळाल्यानंतर सुध्दा नांदेड लोकसभा व त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाला. या निवडणुकीच्या दरम्यान अशोक चव्हाणांना मराठा समाजाच्या आंदोलनाला मतदारसंघात सामोरे जावे लागले होते. या निवडणुकीनंतर महानगराध्यक्ष म्हणून अमर राजूरकर यांची निवड करण्यात आली. ती देखील काही जणांना खटकली. निष्ठावंतांना पक्षात न्याय मिळत नाही असा सूर यानिमित्ताने उमटला. मराठवाड्याचे नेतृत्व करण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर घेण्यात आले. मात्र काठावर बहुमत असलेल्या भारतीय जनता पक्षाला एक एक जागा महत्त्वाची असताना नांदेड लोकसभेच्या निवडणूक व पोटनिवडणुकीसाठी जबाबदारी देण्यात आली. सुरुवातीच्या सामना काळात चव्हाणांनी पक्षातील स्वतः उमेदवारी घ्यावी, असे पोटनिवडणुकीच्यावेळी पक्षश्रेष्ठींनी ठरवले, मात्र विधानसभेच्या भोकर मतदारसंघात त्यांची कन्या श्रीजया चव्हाण यांच्या प्रचारासाठी वेळ मिळावा यासाठी त्यांनी अंग काढून घेतले. संतुकराव हंबर्डे यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी मिळाली. त्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीत मागील खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना पुन्हा संधी देण्यात आल्यानंतर चिखलीकर व चव्हाण यांच्यातील वाद अनेक ठिकाणी उफाळून आला.
पर्यायाने लोकसभेच्या निवडणुकीत चिखलीकर पराभूत झाले आणि कै. वसंतराव चव्हाण विजयी झाले. दुर्दैवाने चव्हाण यांचा मृत्यू झाल्यानंतर पुन्हा पोटनिवडणूक लागली. त्यातही भारतीय जनता पक्ष पराभूत झाला व चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण हे खासदार झाले. त्यामुळे पक्षश्रेष्ठी नाराज होती. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर अशोक चव्हाण यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र लोकसभा व पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याने पक्षश्रेष्ठींच्या नाराजीमुळे त्यांना संधी नाकारण्यात आल्याचे मानण्यात येते. तीन महिन्यांपूर्वी भाजपच्या महानगराध्यक्षपदी माजी आमदार अमर राजूरकर यांची नियुक्ती झाल्यानंतर नव्या व जुन्या कार्यकर्त्यांत वादाची ठिणगी पडली. याच दरम्यान राजूरकर यांच्या कुशल नेतृत्वाखाली नांदेड विभागाचा भाजपचा मेळावा बावनकुळे यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुका लागल्या. त्यात अमर राजूरकर यांना संधी मिळावी यासाठी चव्हाण गटाने मुंबई, दिल्ली, नागपूर गाठले आणि फिल्डिंग लावली.
पहिल्या यादीत त्यांचे नाव जाहीर झाले होते. मात्र पक्षातील निष्ठावंतांनी याबद्दल नाराजी व्यक्त करून वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यात विधान परिषदेसाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विचार व्हावा, अशी मागणी रेटून धरण्यात आली. राजूरकरांना संधी देण्यात येऊ नये, असा अट्टाहास धरण्यात आला. जिल्ह्यातील काही भाजप आमदारांनी देखील राजूरकरांच्या नावाला विरोध दर्शवला. या सर्व पार्श्वभूमीवर पहिल्या यादीत आघाडीवर असलेल्या अमर राजूरकर यांचा पत्ता अखेर कट झाला. त्यांच्यासोबत माधव भंडारी यांचेही नाव वगळण्यात आले. आज झालेल्या यादीत संदीप जोशी, संजय केनेकर व दादाराव केचे यांची नावे अंतिम करण्यात आली. राजूरकरांचे पुनर्वसन करण्यास चव्हाण व त्यांचा गट अयशस्वी ठरल्याने याबाबतची एकच चर्चा संबंध जिल्ह्यात सुरू होती.
Comments are closed.