..तेव्हाच खरातच्या पापाचा घडा फुटला असता; पतसंस्था, ट्रस्टमधील ‘राजीनामा नाट्य’

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

>> बाबासाहेब गायकवाड

भोंदू अशोक खरातच्या पापाची कुणकुण त्याच्या जवळच्या सहकार्‍याला वर्ष-दीड वर्षापूर्वीच लागली असावी, या पापाचे साक्षीदार व्हायला नको म्हणून त्याने खरातच्या शिवनिका ट्रस्ट विश्वस्तपदाचा त्याग केला. आपल्याही पापाचा घडा भरण्याआधीच फुटायला नको यासाठी खरातनेही ‘त्या’ पतसंस्थेच्या कारभारातून मुक्त होण्याचा शहाणपणा केला. त्याच्या कार्यकाळात ठेवींमध्ये झालेली वाढ ही काळा पैसा पांढरा करण्याची युक्ती होती. दोन्ही बाजूच्या बचावात्मक भूमिकेमुळेच ही भोंदूगिरी चव्हाट्यावर येण्यास विलंब झाला, अशी चर्चा आहे. या ‘राजीनामा नाट्या’चे खरे कारण चव्हाट्यावर आले असते तर तेव्हाच खरातच्या पापाचा घडा फुटला असता.

भविष्य सांगण्याच्या नावाखाली महिलांवर लैंगिक अत्याचार करणारा अशोक खरात याने सिन्नर-शिर्डी रस्त्यावर मिरगाव येथे शिवनिका ट्रस्टच्या नावाखाली भोंदुगिरीचा आलिशान अड्डा सुरू केला. सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीवर ताबा असलेल्या व कुंदेवाडीतील पतसंस्थेचा सर्वेसर्वा असलेल्या एका सहकार्‍याला त्याने शिवनिका ट्रस्टवर विश्वस्त म्हणून स्थान दिले. यातूनच खरात ‘त्या’ पतसंस्थेत ३० नोव्हेंबर २०२१ ला बिनविरोध संचालक झाला, ३ ऑगस्ट २०२२ला चेअरमन झाला. ३ सप्टेंबर २०२४ला त्याने चेअरमनपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सहा महिन्यांनी २५ फेब्रुवारी २०२५ला संचालकपदाचाही राजीनामा देवून तो पतसंस्थेच्या संपूर्ण कारभारातून मुक्त झाला. याच काळात खरातचा तो सहकारीही ट्रस्टच्या विश्वस्तपदापासून दूर झाला. या संस्थांमधून मिळणारे पद आणि प्रतिष्ठा एकमेकांना पूरक आणि सोयीची असताना हे ‘राजीनामा नाट्य’ अचानक सहजपणे झालेले नसावे, खरातची गैरवर्तणूक आणि आर्थिक वाद यातून हे घडले असावे, असे बोलले जात आहे.

शैक्षणिक, सामाजिक काम ट्रस्टमधून होत नव्हते, खरातचा एकतर्फी कारभार होता, आमच्यात तात्विक वाद झाले म्हणून आम्ही दोघे या संस्थांपासून दूर गेलो, असे कारण खरातच्या सहकार्‍याकडून सांगितले जात आहे. महिला अत्याचार व काळा पैसा पांढरा करण्याचे रॅकेट याची कुणकुण सहकार्‍याला लागली असावी, यातून मोठा वाद झाला, उगाच लचांड नको म्हणून हे ‘दुरावा नाट्य’ घडलेलं असावं, अशी चर्चा आहे. त्या विश्वस्ताच्या मते खरातचा जो अतात्विक, अविश्वासू, हुकूमशाही कारभार होता, त्याविरुद्ध त्याचवेळी आवाज उठविला असता तर हा भोंदूगिरीचा बुरखा तेव्हाच फाटला असता. वर्ष-दीड वर्षाच्या काळात अनेक महिला अत्याचारातून वाचल्या असत्या, अनेकांची आर्थिक फसवणूक टळली असती. आता खरातपासून दूर जाण्याची सोयीनुसार कारणे सांगितली जात असली तरी त्याचे काळे कृत्य दडपविण्यास या सहकार्‍याकडून जाणते-अजाणतेपणाने जी मदत झाली हा नैतिक दोषच आहे.

कुंदेवाडी पतसंस्थेतील ठेवींचा चमत्कार

आर्थिक वर्ष अखेर ठेवी आणि कंसात झालेली वाढ व घट पुढीलप्रमाणे : सन २०२० : २१ कोटी ८७ लाख ५० हजार २२७ (वाढ- २ कोटी १ लाख ६१ हजार ३७३ रु.). सन २०२१ : २४ कोटी ८० लाख ९८ हजार ३९१ (वाढ- २ कोटी ९३ लाख ४८ हजार १६४ रु.). सन २०२२ : २९ कोटी ६७ लाख ५७ हजार ५२५ (वाढ- ४ कोटी ८६ लाख ५९ हजार १३४ रु.). सन २०२३ : ३४ कोटी ८५ लाख ९ हजार ६८६ (वाढ- ५ कोटी १७ लाख ५२ हजार १६१ रु.). सन २०२४ : ३४ कोटी ३६ लाख २८ हजार ९३५ (घट- ४८ लाख ८० हजार ७५१ रु.). सन २०२५ : ३४ कोटी २४ लाख ६३ हजार ८०४ (घट- ११ लाख ६५ हजार १३१ रु.). सन २०२६ : ३४ कोटी ४५ लाख ८४ हजार ७१५ (वाढ- २१ लाख २० हजार ९११ रु.)

Comments are closed.