अशोक खरातच्या नाशिकमधील फार्महाऊसमध्ये सापडले पिस्तूल आणि जिवंत काडतूस, पोलिसांकडून तपास सुरू
तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात वावर असलेले कॅप्टन अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर आरोपांप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. धार्मिक श्रद्धा, दैवी शक्ती आणि मंत्रतंत्राच्या आडून महिलांचा विश्वास संपादन करून अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेत विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. या पथकाच्या प्रमुखपदी तेजस्वीनी सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली असून तपासाची दिशा अधिक व्यापक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. SIT स्थापन झाल्यानंतर या प्रकरणातील आणखी धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यापूर्वी नाशिक पोलिसांनी अशोक खरातच्या निवासस्थानी झाडाझडती घेतली होती. त्यानंतर मिरगाव येथील त्याच्या फार्महाऊसवर क्राईम ब्रँचकडून रात्री उशिरा छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान पोलिसांना महत्त्वाचे दस्तावेज मिळाले असून, मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. तसेच या फार्महाऊसमधून एक पिस्तूल आणि काही वापरलेले तसेच न वापरलेले काडतुसेही पोलिसांनी जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या शस्त्रसाठ्याबाबतही पोलिसांकडून स्वतंत्र तपास सुरू आहे.
अशोक खरात हा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहेत. खरात मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी असून, अंकशास्त्रज्ञ म्हणून त्याची ओळख आहे. 22 वर्षांच्या सेवाकाळात त्याने 154 देशांचा प्रवास केला असून विविध देशांतील धार्मिक परंपरा, संस्कृती आणि सामाजिक बाबींचा अभ्यास केल्याचा दावा त्याच्या संबंधित संस्थेच्या संकेतस्थळावर करण्यात आला आहे.
दरम्यान, अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक भविष्य जाणून घेण्यासाठी तसेच विविध उपायांसाठी अशोक खरातच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचे पडसाद राज्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Comments are closed.