खरात फाईल्स… फडणवीसांच्या निशाण्यावर अर्धे कॅबिनेट! त्या 58 व्हिडीओंचे मंत्रालयात टेन्शन

राजकीय नेत्यांचा बहुचर्चित ज्योतिषी भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्या कारनाम्यांची फाईल्स उघडताच महायुतीच्या नेत्यांत धाकधूक वाढली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अॅक्शन मोडवर येत कॅप्टन खरातभोवती फास आवळल्यामुळे या भोंदूबाबाच्या संपर्कात असणारे सर्वच जण संशयाच्या फेऱ्यात अडकले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खरातसोबतच्या सलगीमुळे मिंधे गटाचे टेन्शन वाढले आहे, तर रूपाली चाकणकर यांच्यामुळे अजितदादांची राष्ट्रवादीही चांगलीच अडचणीत आली असून फडणवीसांच्या निशाण्यावर शिंदे यांच्यासह अर्धे कॅबिनेट असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

नाशिकमधील एका महिलेने केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली झालेल्या अटकेनंतर भोंदूबाबा कॅप्टन खरात याचे कारनामे उघडकीस येऊ लागले आहेत. वास्तविक राजकीय नेत्यांशी जवळीक असणाऱ्या कॅप्टन खरात प्रकरणात दोन आठवडय़ांपूर्वीच मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष घालत पोलीस महासंचालकांनी कारवाईचे आदेश दिले. या प्रकरणातील सर्व महत्त्वाचे पुरावे आधीच गोळा करण्यात आले होते. पोलिसांनी खरातविरोधातील व्हिडीओ क्लिप्स आणि इतर संवेदनशील माहिती आधीच ताब्यात घेत अत्यंत कमालीची गुप्तता बाळगत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्देशानुसार केलेल्या या कारवाईमुळे कॅप्टन खरात याच्याशी सलगी असणाऱया नेत्यांची झोप उडाली आहे. खरात प्रकरणाचा तपास आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्याकडे सोपवत फडणवीस यांनी संबंधितांना एक प्रकारे सूचक इशारा दिला आहे.

खरात आणि चाकणकरांची वृत्तपत्राच्या मालकांना धमकी

एक वर्षापूर्वी एका स्थानिक वृत्तपत्रात, ‘कॅप्टन भोंदूबाबा’ या मथळ्याखाली अशोक खरात याच्या कारनाम्यांबाबत वृत्त छापून आले होते. त्यावेळी खरात याने वृत्तपत्राचे संपादक दत्तात्रेय खेमनर यांना 5 कोटींच्या अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली होती. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनीदेखील खेमनर यांना फोन करून माफीनामा सादर करण्यास सांगितल्याचा प्रकार समोर आला आहे. माफी मागा अन्यथा गुन्हा दाखल करायला लावते, अशी धमकीच चाकणकर यांनी दिल्याचा आरोप खेमनर यांनी केला आहे. महिला आयोगाकडून ‘स्युमोटो’ गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला पत्र दिल्याचा दावाही खेमनर यांनी केला आहे.

शिंदे गटाच्या अडचणीत वाढ

दोन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन मुख्यमंत्री फडणवीस आणि राज्यातील भाजप नेत्यांच्या तक्रारीचा पाढा भाजप श्रेष्ठीपुढे वाचला. ते दिल्लीतून परतत नाही तोच एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरू असलेल्या भोंदूबाबाबाबत कॅप्टन खरात याला अटक करण्यात आली. या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस थेट ऍक्शन मोडवर येत एकामागून एक कारवाईचे आदेश देऊ लागल्याने शिंदे गटाच्या अडणीत वाढ होताना दिसत आहे.

  • खरातच्या कार्यालयातून जप्त करण्यात आलेल्या पेन ड्राइव्हमधील 58 आक्षेपार्ह व्हिडीओ सापडले आहेत. ते व्हिडीओ कुणाकुणाचे आणि त्यामागे नेमके कोण? यामध्ये मंत्रालयातील कोण कोण आहेत? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यात यामागे असलेले मोठे रॅकेट, राजकीय-धार्मिक संबंध याचे रहस्य असण्याची शक्यता आहे.

रुपाली चाकणकरांना नारळ?

कॅप्टन खरात याच्या काही कारनाम्यांत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा थेट संबंध असल्याचे दिसून येत आहे. ‘कॅप्टन भोंदूबाबा’चे कारनामे वर्तमानपत्रांतून उघड करणाऱया संपादकांना महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी फोन करून धमकावले. एवढेच नाही तर खरात याच्याशी संबंधित ट्रस्टवरदेखील त्या आहेत. चाकणकर यांना पदावरून हटविण्याची मागणी जोर धरू लागली असून चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून गच्छंती अटळ आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चाकणकर यांना कधी नारळ देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तपासासाठी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात एसआयटी

अशोक खरात याच्यावर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात एका 35 वर्षीय महिलेवर लैंगिक शोषण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. वावी पोलीस ठाण्यात अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पाच कोटींची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल आहे, तर शिर्डी पोलीस ठाण्यात पीडितेचे वैयक्तिक फोटो सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा गुन्हा दाखल आहे. या तीनही गुह्यांचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. या पथकाच्या प्रमुखपदी आयपीएस तेजस्विनी सातपुते यांची नियुक्ती केली असून त्यांनी नाशिकमध्ये दाखल होत गुन्हे शाखेकडून तपास हाती घेतला आहे.

खरात प्रकरण एपस्टीन फाईल्सपेक्षाही भयंकर, खासदार संजय राऊत यांची टीका

अशोक खरातचं प्रकरण हे एपस्टीन फाईल्सपेक्षा भयंकर आहे. मुख्यमंत्री कान, तोंड, डोळे बंद करून बसले आहेत. या भोंदूबाबाकडे कोण जात होतं, अघोरी कृत्य कोण करत होतं, ते मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या गुप्तचर यंत्रणेकडून जाणून घ्यावं, असे शिवसेना नेते-खासदार संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्राने अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मंजूर केला आहे. मग असे असतानासुद्धा शासनातील मोठय़ा पदावरील बसलेल्या व्यक्ती मग त्यात महिला आयोगाच्या अध्यक्षा असू देत किंवा मंत्री, आमदार हे सगळे अंधश्रद्धेने त्या बाबाची पूजा करत आहेत. कोणी जादूटोण्याला बसले आहे, त्यांच्यासोबत ज्यांची ज्यांची छायाचित्रे आली आहेत, त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

मंत्र्यांना बडतर्फ करावे

महिला आयोगाच्या अध्यक्षांचे काम काय आहे की महिलांवर होणाऱया अत्याचारावर आवाज उठवणे, अशा गुन्हेगारांवर कारवाई करणे. मंत्री, नेते जर अशा लोकांच्या पायाजवळ बसत असतील तर महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि मंत्र्यांना देवेंद्र फडणवीस पदावर का ठेवतात? ज्यांचे संबंध तिथे उघड होत आहेत त्यांना पदावरून दूर केले पाहिजे. सत्तेत टिकण्यासाठी मंत्रीच असे करणार असतील तर गृह मंत्रालयाने यांना बडतर्फ करायला हवे, असे संजय राऊत म्हणाले.

रूपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा, राष्ट्रवादीच्या रूपाली ठोंबरे यांची मागणी

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर अशोक खरात याच्या ट्रस्टकर आहेत. या प्रकरणाची चौकशी कोणत्याही दबावाशिवाय आणि निष्पक्ष क्हाकी, यासाठी रूपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्याका, अशी मागणी अजित पवार गटाच्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी पत्रकार परिषदेत केली.

Comments are closed.