Beed News – दुष्काळावरून आष्टीचे राजकारण पेटले, सत्ताधारी राष्ट्रवादीकडून जनआक्रोश मोर्चा
बीड जिल्ह्यातील दुष्काळावरून आष्टीचे राजकारण पेटले आहे. सत्ताधारी राष्ट्रवादीचे माजी आमदार भीमराव धोंडे आणि माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढला. छावण्याऐवजी चार्याचे पैसे थेट शेतकर्यांच्या खात्यावर टाका अशी मागणी भीमराव धोंडे यांनी केली तर आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत लढायचं असा निर्धार बाळासाहेब आजबेंनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या या मोर्चाला मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग उपस्थित होता. दरम्यान या मोर्चावर भाष्य करताना विद्यमान भाजपा आमदार सुरेश धस यांनी नेहमीच्या स्टाईलमध्ये खिल्ली उडवली.
बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळाचे दशावतार पहाण्यास मिळत आहेत. आतापासूनच दुष्काळाच्या झळा शेतकर्यांपासून सामान्य जनतेला होरपळून काढत आहे. आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी सत्तेत असणार्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या दोन नेत्यांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढला.
माजी आमदार भीमराव धोंडे आणि माजी आमदार बाळासाहेब आजबे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणामध्ये बोलताना भीमराव धोंडे म्हणाले, यापूर्वीच्या दुष्काळात आष्टी, पाटोदा, शिरूर या तालुक्यामध्ये असंख्य चारा छावण्या सुरू केल्या होत्या. त्या छावण्यामध्ये जनावरांचे हाल होत होते. चारा आणि पाणी सुद्धा प्यायला नसायचे.
अधिकारी तपासणीसाठी जायचे, आमचं काही आहे का म्हणायचे आणि परत यायचे. चारा छावणी हे भ्रष्टाचाराचे कुरण आहे. त्यामुळे आता जनावरांसाठी छावण्याऐवजी थेट पशुपालक शेतकर्यांच्या खात्यावर पैसे टाका, प्रत्येक जनावरामागे शंभर रूपये द्या अशी मागणी भीमराव धोंडे यांनी केली तर माजी आमदार बाळासाहेब आजबे बोलताना म्हणाले, आमच्या मोर्चावर काही जणांकडून टिका केली जात आहे. आमचा मोर्चा राजकीय अस्तित्वासाठी असल्याचे सांगितले जात आहे. आम्ही तुमच्यासारखी गुत्तेदारी करत नाहीत.
कामात आडकाठी आणत नाहीत, आता कोणत्याही निवडणुका नाहीत, आमचा लढा शेतकर्यांसाठी आहे, आष्टीच्या पाण्यासाठी आहे असा आ.सुरेश धस यांचे नाव न घेता बाळासाहेब आजबे यांनी टोला लगावला. तळपत्या उन्हात काढलेल्या या मोर्चाला मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि शेतकरी उपस्थित होते. या मोर्चाबाबत प्रतिक्रिया देताना भाजपाचे विद्यमान आमदार सुरेश धस म्हणाले, आष्टी मतदारसंघाच्या हक्काचं पाणी आष्टी मतदारसंघाला मिळणार आहे. हा मोर्चा फक्त हम साथ साथ है दाखवण्यासाठी आहे असे म्हणत त्यांनी भीमराव धोंडे आणि बाळासाहेब आजबे यांच्या राजकीय एकीवर मत व्यक्त केले.
Comments are closed.