पाऊलखुणा – तिवऱ्याची गंगा

>> आशुतोष बापट, [email protected]

राजापूरची अकस्मात प्रकट होणारी प्रसिद्ध गंगा असो किंवा देवगड तालुक्यातल्या दहिबाव इथे प्रकट होणारी गंगा असो. या गंगेचे आगमन कायमच आनंददायी ठरले आहे. तशीच चिपळूणजवळ असलेल्या तिवरे इथे प्रकट होणारी गंगा, जी ठरावीक वेळी येतेच येते.

गंगेबद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनात अपार श्रद्धा भरून राहिलेली आहे. ‘काशीस जावे नित्य वदावे’ असे प्रत्येक जण म्हणत असतोच. प्रत्येकालाच काही काशीला जाऊन गंगेचे दर्शन होऊ शकत नाही, पण ही गंगासुद्धा आपल्या भक्तांना निराश करत नाही. वेगवेगळ्या गावी अकस्मात प्रकट होणाऱया पाण्याला गंगा असेच संबोधले जाते. मग ती राजापूरची केव्हाही अकस्मात प्रकट होणारी प्रसिद्ध गंगा असो किंवा ती आल्यावर देवगड तालुक्यातल्या दहिबाव इथेसुद्धा प्रकट होणारी गंगा असो. या गंगेचे आगमन कायमच आनंददायी ठरले आहे. राजापूर आणि दहिबावच्या गंगा बेभरवशी आहेत, पण चिपळूणजवळ असलेल्या तिवरे इथे प्रकट होणारी गंगा मात्र ठरावीक वेळी येतेच येते.

चिपळूणजवळ असलेल्या तिवरे गावात एक नवल आहे. पाटणजवळचे दातेगड-गुणवंतगड, मग पुढे कुंभार्ली घाटातून दिसणारा जंगली जयगड. घाट उतरल्यावर तसेच पुढे जाऊन चिपळूणच्या अलीकडे 6 कि.मी. वर उजवीकडे तिवरे गावचा फाटा आहे. इथून कळकवणे, दसपटी, दादर, आकले मार्गे रस्ता वळत वळत तिवरे गावी येऊन पोहोचतो. हे अंतर 20 कि. मी. चे आहे. हाच रस्ता पुढे चोरवणे गावी जाऊन संपतो. चोरवणे नाव वाचूनसुद्धा वासोटा आणि नागेश्वरची तीव्र आठवण होते.

हा सगळा परिसर हिरवागार आहे. तिवरे गाव सह्याद्रीच्या ऐन कुशीत वसलेले आहे. इथून पूर्वी तिवरे घाटाने बैलाच्या पाठीवरून वाहतूक चाले. कोयनेच्या खोऱयात असलेल्या माळदेव इथे याच वाटेने जाता यायचे. आता कोयना व्याघ्रप्रकल्प झाल्यामुळे घाटावरची ती गावेही उठली आणि हे घाटरस्ते बंद झाले, पण ऐन सह्याद्रीच्या कुशीत शिरणे म्हणजे काय हे अनुभवायचे असेल तर तिवरे इथे जायला हवे. आपल्या तीनही बाजूंनी उंचच उंच हिरवेगार डोंगर, त्यातून अजूनही काही धबधबे कोसळताना दिसतात. सह्याद्रीमधल्या अनगड घाटवाटा नजरेस पडतात. इतके सुंदर हे तिवरे गाव. गावची वस्ती बेताचीच. जेमतेम 200 उंबऱयाचे हे गाव.

या तिवरे गावात एक निसर्ग नवल दडले आहे. राजापूरला जशी अनपेक्षित आणि अनियमित काळानी गंगा येते, तशीच या तिवरे गावीसुद्धा गंगा येते. इथे गंगा येते म्हणजे काय तर त्रिपुरी पौर्णिमा झाली की, या ठिकाणी असलेला पाण्याचा प्रवाह दुधी रंगाचा होऊन वाहायला लागतो. पाण्याचा हा दुधी रंग जवळ जवळ देवदिवाळीपर्यंत टिकतो. देवदिवाळीच्या दिवशी गंगेची पूजा होते आणि गंगा विसर्जित केली असे समजले जाते. देवदिवाळीनंतर परत पाणी पूर्वीसारखे पारदर्शक दिसू लागते. हे नवल अनियमित नसून दर तीन वर्षांनी घडत असते. गावकऱयांच्या सांगण्यानुसार गेली अनेक वर्षे हे नवल घडत आहे. नियमित तीन वर्षांच्या कालावधीनंतर इथे गंगा येतेच येते.

या ठिकाणी एक छोटेसे गंगेचे मंदिर बांधले असून त्यात एक फूट उंचीची मूर्ती आहे. ग्रामस्थ याच मूर्तीची गंगा म्हणून पूजा करतात. पाण्याच्या प्रवाहाला दोन कुंडांमध्ये खेळवले आहे. एक कुंड आणि त्याच्या खालच्या अंगाला दोन कुंडे अशी इथे बांधीव कुंड दिसतात. दोन्ही कुंडांना गोमुखे केलेली असून त्यातून हे पाणी पुढे जाऊन मुख्य ओढय़ाला जाऊन मिळते. भूशास्त्राचा अभ्यास करणाऱया अभ्यासकांनी तसेच संशोधकांनी इथे अवश्य जावे. हे निसर्गनवल का होते याचे शास्त्राrय कारण लोकांसमोर यायला हवे.

एक चांगली गोष्ट इथे जाणवली ती अशी की, गावकरीसुद्धा याला चमत्कार मानत नाहीत. त्यांच्या मतेसुद्धा हे एक नवलच आहे. तीन वर्षांनी घडणारी ही घटना बघायला पंचक्रोशीतून माणसे येतात. इथल्या कुंडात स्नान करतात आणि तीर्थ म्हणून हे पाणी घेऊन जातात, पण या घटनेची माहिती खुद्द चिपळूणमधल्या मंडळींना पण फारशी नाही. स्वच्छ, सुंदर असे हे ठिकाण ऐन निसर्गात वसलेले असल्यामुळे इथून पाय हलत नाहीत. या गावात शिंदे आडनावाची मंडळी मोठ्या संख्येने आहेत. त्यातल्या काहींना तर आदिलशाहीपासून इनाम मिळाल्याचे एका शाळा मास्तरांनी सांगितले. जवळच असलेले दसपटी हे गाव महत्त्वाचे. या गावातला जवळ जवळ घरटी एक माणूस सैन्यात भरती झालेला आहे. शांत निवांत ठिकाण, चौफेर हिरवीगार वनश्री आणि पाठीशी सह्याद्रीचे अजस्त्र कडे. अशी पार्श्वभूमी लाभलेल्या या आडवाटेच्या तिवरे गावाला अवश्य भेट द्यावी. तीन वर्षांनी प्रकट होणारी गंगा बघण्याचा योग जुळवून आणलाच पाहिजे. त्रिपुरी पौर्णिमा ते देवदिवाळी एवढा काळ ही गंगा इथे असते. त्या काळात मुद्दाम या आडवाटेला असलेल्या निसर्ग नवलाचे दर्शन घ्यायला हवे. सोबतीला रांगडा सह्याद्री आणि इथला सदाहरित निसर्ग आपली भटकंती अजून समृद्ध करतो. मात्र तो अनुभव घेण्यासाठी मुद्दाम वाट वाकडी केली पाहिजे.

Comments are closed.