पुरातत्व डायरी – अधोजल पुरातत्वाचा मैलाचा दगड
>> प्रा. आशुतोष पाटील
भारतात अशी काही शहरं होती जी संपूर्ण पाण्याखाली गेलेली होती आणि त्या शहरांचा अभ्यास करावा म्हणून अधोजल पुरातत्व (Marine Archaeology) हे भारतात अमलात आणले गेले. गुजरातमधील द्वारका द दुसरे ‘बेट द्वारका’ येथील अधोजल उत्खननात कृष्णाशी संबंधित गोष्टींचा समावेश होतो.
अधोजल पुरातत्व ज्याला इंग्रजीत Marine Archaeology म्हटले जाते ही पुरातत्वशास्त्राच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची ज्ञानशाखा पुढे येत आहे. या ज्ञानशाखेला जागतिक महत्त्वदेखील प्राप्त होत आहे. जगातील बहुतांश देशांमध्ये अधोजल पुरातत्व हे जहाजांच्या झालेल्या अपघातामुळे पुढे आले आणि त्या अपघातातून लुप्त झालेल्या वस्तूंचा शोध हा अधोजल पुरातत्वात घेतला जाऊ लागला. पण भारतात अशी काही शहरं होती जी संपूर्ण पाण्याखाली गेलेली होती आणि त्या शहरांचा अभ्यास करावा म्हणून अधोजल पुरातत्व हे भारतात अमलात आणले गेले. अधोजल पुरातत्वज्ञ आजही अशा अनेक स्थळांच्या शोधात आहेत जी स्थळं समुद्राखाली गेली. या स्थळांचा शोध घेऊन, अधोजल उत्खनन करून नवीन माहिती जगासमोर आणण्याचा प्रयत्न आज ही पुरातत्वज्ञ करत आहेत.
भारतात असेच एक स्थळ शोधले गेले जे संपूर्ण समुद्राखाली गेले होते आणि ते म्हणजे ‘द्वारका.’ गुजरातमधील द्वारका या स्थळी इ.स. 1983 सालापासून पुढे अधोजल पुरातत्व अमलात आणून पाण्याखाली उत्खनन करणे सुरू झाले. दोन ठिकाणी मुख्यत हे उत्खनन झाले एक द्वारका आणि दुसरे बेट द्वारका. एकमेकापासून ही दोन्ही स्थळं तीस किलोमीटर अंतरावर आहेत. द्वारका हे अरेबियन समुद्राच्या किनारी तर बेट द्वारका हे कच्छच्या जवळ आहे. ही दोन्ही स्थळे एकमेकांशी अनेक गोष्टींनी जोडल्या गेलेली आहे त्यात मुख्यत कृष्णाशी संबंधित गोष्टींचा समावेश होतो. या दोन्ही स्थळांच्या मधल्या भागांमध्ये अनेक मंदिरदेखील आहेत जी की मुख्यत मध्ययुगीन काळातील आहेत. पुरातत्वज्ञ अनेक दशकांपासून यापेक्षा जुन्या पुराव्यांच्या शोधात इथे भटकत होते आणि त्यांना या समुद्राखाली गेलेल्या शहराचा शोध लागला.
पुरातत्वज्ञांनी या शहराच्या शोधात पाण्याखाली गेलेल्या मोठय़ा भूभागाचे अन्वेषण केले. त्यांना इसवी सन पूर्व पंधराशेमध्ये वसलेल्या एका बंदरी शहराचे अवशेष मिळाले. साधारण एक किलोमीटर परिघात पसरलेले हे शहर होते. या शहराला मोठमोठय़ा भिंतींचे आवरणे होते ज्यामुळे या शहराचे रक्षण होत असे. या भिंती किती उंच होत्या याबद्दल आपल्याला कल्पना नसली तरी त्यांची उपलब्धता हे महत्त्वाचे संकेत आहेत. त्यातील आज अगदीच थोडय़ा भिंती पाहायला मिळतात, कदाचित मोठमोठय़ा लाटांपासून या शहराचे रक्षण करण्यासाठी त्याचा वापर होत असावा. एकूण सहा बुरुज या शहराच्या भोवती होते. आज उत्खनन आणि अभ्यासानंतर या शहरात नेमके कुठे जहाज लावले जात होते हेदेखील सांगणे शक्य होत आहे, कारण अनेक भिंतींच्या जवळ आपल्याला जहाज अडकवण्याचे आकडे मिळालेले आहेत. या ठिकाणी बाकी पुरातत्त्वीय स्थळी मिळतात तसे पुरातत्वीय पुरावे कमी मिळाले, त्याचे कारण की समुद्राच्या पाण्यामुळे बहुतांश पुरावे हे नष्ट झाले असावेत. पण तरी द्वारका येथील उत्खननात आपल्याला विविध खिळे, जहाजांचे आकडे, भांडय़ांचे वेगवेगळे तुकडे सापडलेले आहेत. या शहराच्या भोवती मोठमोठी जहाजे येत असत असे उपलब्ध पुराव्यावरून सांगता येते. अगदी थोडय़ाच घरांचे अवशेष येथे मिळाले, बाकी सापडलेल्या काही भिंतीवरून आपल्याला शहराबद्दल बोलता येत असले तरी नेमक्या या शहराच्या आराखडय़ाबद्दल सांगणे थोडे कठीणच वाटते. बेट द्वारका हे महत्त्वाचे बंदरी शहर असावे असा अंदाज नक्कीच बांधता येऊ शकतो आणि येथून वेगवेगळ्या मोठय़ा ठिकाणी व्यापार होत असावा. या व्यापारामध्ये शंख शिंपल्यांच्या विविध वस्तू, मोती आणि धातू हे महत्त्वाचे भाग असावेत. पुरातत्व शास्त्रज्ञांना अशीही काही घर मिळाली जेथे मोठय़ा प्रमाणात शंख शिंपले सापडले. व्यापाराव्यतिरिक्त या शहरात जहाज बनवण्याचे कामही मोठे चालत असावे. येथील महत्त्वाची उपलब्धी म्हणजे एक मोठे लेख असलेले भांडे आणि शंखाचे बनवलेले एक सील ज्यावर तीन तोंडाचा प्राणी दाखवलेला आहे.
द्वारका आणि बेट द्वारका या दोनही ठिकाणी झालेली अधोजल उत्खनने महत्त्वाची असून येथे उत्तरकाळात अनेक वस्तू सापडलेल्या आहेत ज्यात प्रामुख्याने वास्तू, दगडी मूर्ती, लोखंड, तांब्याच्या वस्तू, होडय़ांचे आकडे यांचा समावेश होतो. या उत्तरकालीन वस्तूंचा काळ इ.स.पू. 200 ते इ.स. 200 हा मानलेला आहे.
द्वारका आणि बेट द्वारका पूर्णत पाण्यात कसे बुडाले हा आजही आपल्यापुढे प्रश्नच आहे, समुद्राची पाणी पातळी वाढून शहर पाण्याखाली गेले असावे. भारताला एकूण 6200 किमी चा समुद्रकिनारपट्टीचा प्रदेश आहे, विचार करा या अभ्यासाच्या माध्यमातून अजून किती लुप्त शहरं पुढे येऊ शकतात. मुख्यत जेव्हा मी अधोजल पुरातत्व यावर विचार करतो तेव्हा धरणं बांधताना त्याखाली गेलेल्या गावांचाही या दृष्टिकोनातून विचार झाला पाहिजे असे मला वाटते. कारण महाराष्ट्र व भारतात अनेक धरणं जेव्हा बांधली गेली व पाण्याला वाट दिली गेली तेव्हा शेकडो गावांचे स्थलांतर तर झालेच. पण त्यासह अनेक पुरातत्त्वीय स्थळ त्याखाली लुप्त झाली, त्यांचा अभ्यास झाल्यास मोठा ऐतिहासिक ठेवा पुढे येऊ शकतो.
अधोजल पुरातत्वाने पुरातत्त्व शास्त्रातील एक नवीन ज्ञानशाखा आपल्याला खुली करून दिलेली आहे आणि या ज्ञानशाखेतील एक मैलाचा दगड ठरले ते ‘द्वारका.’
[email protected]
Comments are closed.