‘निवृत्तीचा निर्णय एका रात्रीत घेतला जात नाही..’, विराटच्या कसोटी निवृत्ती मागे घेण्याच्या चर्चांवर अश्विनचं वक्तव्य
कसोटी क्रिकेटमध्ये सध्या भारतीय संघाची परिस्थिती अत्यंत खराब आहे. स्वतःच्या घरच्या मैदानावर टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेकडून लाजिरवाणी हार पत्करावी लागली. तब्बल 25 वर्षांनंतर प्रोटीज संघाने भारताला त्यांच्या घरातच 2-0 ने हरवण्याचा पराक्रम केला. दोन्ही कसोटी सामन्यांत भारतीय फलंदाज स्पिनर्ससमोर पूर्णपणे हतबल दिसले. फलंदाजांची ही दुर्दशा पाहता अशी मागणी होत आहे की बीसीसीआयने विराट कोहलीला कसोटीमधील निवृत्तीचा निर्णय परत घेण्यासाठी विनंती करावी. सोशल मीडियावर सुरू असलेल्या या चर्चेबाबत भारताचा माजी ऑफस्पिनर आर. अश्विननेही आपले मत व्यक्त केले आहे.
अश्विन यूट्यूबवर बोलताना म्हणाला,
यात विचार करण्यासारखं काय आहे? आम्ही जे काही निर्णय घेतो, ते पूर्ण विचार करूनच घेतो. निवृत्तीचा निर्णय हा एका रात्रीत घेतला जात नाही. मला खात्री आहे की विराटने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय तेव्हा घेतला असेल, जेव्हा ते त्या विषयी पूर्णपणे निश्चित झाले असतील. अचानक कोणीही असे निर्णय घेत नाही. आम्ही सगळ्यांनी हा टप्पा अनुभवला आहे. नक्कीच चाहत्यांना आणि आम्हालाही विराटला खेळताना पाहायला आवडेल.
अश्विन पुढे म्हणाला,विराटने पहिल्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जशी जबरदस्त फलंदाजी केली, ती पाहिल्यावर चाहत्यांना वाटतं की तो पुन्हा आपल्या उत्तम फॉर्ममध्ये आहे, मग आपण त्याला जास्त का पाहू शकत नाही? पण कसोटी क्रिकेट हे वेगळं स्वरूप आहे आणि त्याबाबत त्याने आपला निर्णय आधीच घेतला आहे.
विराट कोहलीने (Virat Kohli) या वर्षी मे महिन्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती आणि त्याचा हा निर्णय सर्वांसाठी धक्कादायक होता.
रांचीतील सामन्यानंतर जेव्हा त्याला कसोटीमधील पुनरागमनाबद्दल विचारलं, तेव्हा विराट म्हणाला की आता तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त वनडे फॉर्मेटमध्येच खेळू इच्छितो. या वक्तव्यावरून स्पष्ट होतं की कोहलीचा कसोटी क्रिकेटमध्ये परत येण्याचा कोणताही विचार नाही.
Comments are closed.